डोकलाम सीमा प्रश्नावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे संदेश समाजमाध्यमांमधून गेल्या काही महिन्यांपासून फिरत असले तरी दिवाळीच्या सणानिमित्ताने मुंबईतील बाजारपेठांमध्ये चीननिर्मित वस्तूंचाच भरणा मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. विद्युत दिवे, तोरणे, कंदील आणि भेटवस्तूंची पाकिटे, पिशव्या या चिनी वस्तूंनी बाजारपेठा काबीज केल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने विकल्या जाणाऱ्या विविध चिनी वस्तूंचा खप या वर्षी सुमारे ४०-४५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज असोचेम संस्थेने व्यक्त केला असला तरी यंदा तरी मुंबईतील बाजारपेठांवर चिनी वस्तूंचे वर्चस्व कायम राहिल्याचे चित्र आहे.
दिवाळी अगदी आठवडय़ावर आली असल्याने क्रॉफर्ड मार्केट विविध शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी गच्च भरले आहे. दिवाळीच्या निमित्ताने कोटींची उलाढाल होत असल्याने कमी किमतीत उत्पादने उपलब्ध करून चिनी उत्पादकांनी इथल्या बाजारपेठांमध्ये माल पाठवून चांगलाच जम बसविला आहे. डोकलाम सीमा प्रश्नावरून चिनी मालावर बहिष्कार घालण्याची भूमिका गेल्या काही महिन्यांपासून डोके वर काढत आहे. समाजमाध्यमामधून याला चांगलाच प्रतिसाद मिळत असून दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच कोणत्याही प्रकारचा चिनी माल विकत घ्यायचा नाही, असे आवाहन करणारे संदेशही फिरत आहेत. त्यातच द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचाम) या संस्थेने दिवाळीनिमित्ताने भारतीय बाजारपेठेत दाखल होणारा चिनी मालाचा खप सुमारे ४०-४५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे; परंतु बाजारपेठांमधील चित्र याच्या नेमके उलट असून कंदिलांपासून ते विद्युत तोरणांपर्यंत चीननिर्मित दिवाळीच्या वस्तू सर्रास विकताना आढळून येत आहेत.
तोरणांमध्ये भारतीय बनावटीच्या तोरणांना विशेष मागणीही नसते. हातावर मोजण्याइतके लोक भारतीय बनावटीचे तोरण विकत घेतात. महाग माल ठेवणे आम्हालाही परवडणारे नसल्याने म्हणून मग आम्हीही मागणीप्रमाणेच चिनी मालच बहुतांश प्रमाणात ठेवतो,’ असे विद्युत तोरण विक्रेते आनंद साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
चीननिर्मित विद्युत दिवे आणि तोरणांचे वैशिष्टय़ म्हणजे दर वर्षी नवीन रंगाढंगांत येणाऱ्या नव्या पद्धतीच्या माळा. या वर्षी बाजारात नियॉन रंगातले पट्टी तोरण, गोल्डन, मेटल, बॉल्स, स्टार अशा विविध पद्धतीची आरजीबी रंगातली एलईडी तोरणे दाखल झाली आहेत.
‘ग्राहक या वर्षी प्रथमच भारतीय बनावटीच्या विद्युत तोरणांची मागणी करीत आहेत. मात्र वर्षांनुवर्षे एकाच पद्धतीची भारतीय बनावटीची विद्युत तोरणे पाहून नाके मुरडतात. त्यामुळे चीनच्या विद्युत दिवे आणि तोरणांच्या स्पर्धेमध्ये भारतातला माल टिकणे अवघड आहे, असे मत विक्रेते समीर खान यांनी व्यक्त केले आहे.
छोटेसे बटण फिरवले की पेटणाऱ्या चिनी बनावटीच्या पणत्याही लोकांना विशेष आवडलेल्या दिसून येतात. कंदील, भेटवस्तूंची पाकिटे यांसाठी प्रसिद्ध असलेली क्रॉफर्ड बाजारातील सुतार गल्ली तर चिनी मालाची खाणच आहे.
‘चिनी बनावटीचे कंदील अगदी साठ रुपयांपासून आहेत. भारतीय माल इतक्या स्वस्त दरात उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे ग्राहकांचीही चिनी मालाला विशेष मागणी असते. आम्हालाही यात नफा जास्त मिळतो. कागदी कंदील भारतीय बनावटीचे आहेत. प्लॅस्टिक आणि कापडी कंदिलांच्या किमती इथल्या तुलनेत चिनी मालाच्या कमी असल्याने या कंदिलाचा चीन बनावटीचा माल विकणे आम्हाला परवडते,’ असे कंदील विक्रेते रिहान यांनी सांगितले आहे.
आमच्याकडे कागदी पाकिटे, पिशव्यांचा माल भारतीय बनावटीचा असला तरी इतर माल चिनी बनावटीचाच आहे. कापडी आणि प्लॅस्टिकच्या विविध आकर्षक भेटवस्तूंचे बॉक्स आणि पाकिटे यामध्ये चिनी माल तुलनेने खूप स्वस्त येतो. मोठय़ा व्यापाऱ्यांपासून ते कंपनी मालकांच्या ऑर्डर असतात. त्यांना स्वस्त मालच घेणे जास्त परवडणारे असते. त्यामुळे चिनी मालाइतका स्वस्त पर्यायी भारतीय माल आला तरच इथल्या बाजारपेठांमध्ये चालणार, अन्यथा लोक चीन मालच विकत घेणार, असे मत विक्रेते गौरव गाला यांनी व्यक्त केले आहे.
तोरण, दिवे, भेटवस्तू..
विद्युत रोषणाईच्या बाजारामध्ये ९० टक्के विद्युत तोरणे, दिवे हे चीननिर्मितच आहेत. भारतीय बनावटीची विद्युत तोरणे जवळपास दहा पटीने महाग असल्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही क्रॉफर्ड बाजारातील लोहार गल्ली ही चीननिर्मित विद्युत तोरणे, दिव्यांनीच झगमगलेली दिसत आहे. ‘चिनी विद्युत तोरणांची किंमत भारतीय बनावटीच्या तोरणांपेक्षा जवळपास दहा पटीने कमी आहे. १०० दिव्यांचे भारतीय बनावटीचे तोरण पाचशे रुपयांना आहे, तर तेवढय़ाच दिव्यांचे चिनी तोरण साठ रुपयांना उपलब्ध आहे. भेटवस्तू देण्यासाठी वापरात येणाऱ्या विविध आकाराच्या आकर्षक पिशव्या, पाकिटे, बॉक्स यामध्येही चिनी मालाचाच प्रभाव मोठय़ा प्रमाणावर आहे.