News Flash

आगे पर्दे पर देखिए…

फार नाही, बारा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नागपाडय़ामधील अलेक्झान्ड्रा सिनेमागृहाच्या आत दर्शनी लाकडी खांबावर वहीच्या पानावर चालू असलेल्या इंग्रजी चित्रपटाची ‘वनलाइन’- थोडक्यात गोष्ट लिहिलेली असे.. इंग्रजी

| January 30, 2013 05:45 am

फार नाही, बारा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नागपाडय़ामधील अलेक्झान्ड्रा सिनेमागृहाच्या आत दर्शनी लाकडी खांबावर वहीच्या पानावर चालू असलेल्या इंग्रजी चित्रपटाची ‘वनलाइन’- थोडक्यात गोष्ट लिहिलेली असे.. इंग्रजी न येणाऱ्या प्रेक्षकांसाठी! आणि शेवटची ओळ हमखास असे- ‘आगे पर्दे पर देखिए।’
नवे इंग्रजी चित्रपट प्रथम दक्षिण मुंबईतील रिगल, इरॉस, स्टर्लिग आदी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आणि मग सेकंड रनसाठी मध्य मुंबईत येत असत. बऱ्याचदा मी घराशेजारी आणि स्वस्त म्हणून या थिएटरच्या वाऱ्या करीत असे. समोरच्या फूटपाथवर कोको- कोलासारखेच, पण त्याहून मस्त आणि ताजे मिळणारे ‘फालसा’ नावाचे पेय रुपया- दीड रुपयात पिऊन अख्खे सिनेमा प्रकरण मी दहा रुपयांत संपवत असे.
थिएटरच्या बाहेर सिनेमाच्या गोष्टीच्या हिंदी रूपरेषेला अनुसरून ‘हिंदीकरण’ केलेले नावही असे. ‘ब्लो हॉट, ब्लो कोल्ड’ चित्रपटाचे ‘कभी नरम, कभी गरम’, तर ‘कॅलिफोर्निया गर्लस्’चे ‘हसिनों की टोलीयाँ, बरसाये गोलीयाँ’ झालेले असे. ‘नेवाडा स्मिथ’चे ‘सस्ता खून, महेंगा पानी’ असे बारसे झालेले असे.
त्याकाळी बऱ्याचदा एकच प्रिन्ट पंधरा-वीस मिनिटांच्या अंतराने दोन थिएटर्समध्ये दाखवली जात असे. एका थिएटरमध्ये पहिली दोन रिळे झाली की बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा किंवा सायकलवर ती टाकून दुसऱ्या थिएटरमध्ये नेत असत आणि मग तिथला शो चालू होत असे.
आता अशी यातायात करण्याची गरज उरलेली नाही. कारण आज वाड तंत्रज्ञानाने एकाच वेळी शेकडो चित्रपटगृहांमध्ये असंख्य शोज् होऊ शकतात.
पूर्वी मुळातच हॉलीवूडचे चित्रपट वर्षां-सहा महिन्यांनी भारतात येत असत. त्यानंतर सेकंड रन. म्हणजे नवा म्हणवणारा चित्रपट दीड-दोन वर्षांनी आपणास पाहावयास मिळत असे. आजच्या पायरेटेड डीव्हीडीच्या जमान्यात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचणे फायद्याचे ठरते आणि तंत्रज्ञानही अशा गरजांना हातभार लावत असते.
कुठल्याही कलेमध्ये किंवा अभिव्यक्तीच्या माध्यमामध्ये आजूबाजूच्या सामाजिक, भौगोलिक, आर्थिक गोष्टींचे प्रतिबिंब पडत असतेच. वाळवंटी इजिप्तमधील पिरॅमिडची बांधणी सरळ रेषेत त्रिकोणाकृती असते, तर भारतातील- विशेषत: दक्षिणेकडील मंदिरे पशुपक्षी, वनस्पती, फुले-फळे आदींच्या शिल्पांनी नटलेली असतात. (इथे दक्षिण भारतीय निधडय़ा छातीच्या हीरॉइनची साक्ष काढण्याचा सिनेमाबद्दल लेख असल्यामुळे मोह होतोय. पण नको! मोह वाईट!) मुद्दा हा आहे की, गेल्या बारा-पंधरा वर्षांमध्ये आपल्या आजूबाजूला जे काही बदल झाले, त्यांचे परिणाम चित्रपटासारख्या आजच्या जिवंत कलेमध्ये पडणे अपरिहार्य आहे.
सुरुवातीपासून सुरुवात करायची म्हटलं तर आपण कथेपासून सुरुवात करू या. पूर्वी एका रेषेत जाणारी कथानकं प्रकर्षांने असत. काही ठोकळेबाज प्रतीकं, प्रसंग आणि क्लायमॅक्स ठरलेले असत. मराठी चित्रपटांमधील तुळशी वृंदावन हे फ्लॅट संस्कृती आल्यावर गायब झाले. मध्येच कुठेतरी ‘मुंबईचा जावई’सारख्या चाळीतील कथानकात डालडय़ाच्या डब्यात तुरळक प्रमाणात तुळस दिसे. याही गर्दीमध्ये ‘तेच माझे घर’सारखा अत्यंत सिनेमॅटिक कथा असलेला चित्रपट चमकून जाई. आजही या कथेवरील चित्रपट कालबाह्य़ ठरणार नाही. पण टी. व्ही. मीडियाचा प्रसार आणि त्यात काम करणाऱ्या दिग्दर्शकांसारख्या माणसावरचा प्रभाव एकूणच वाचनसंस्कृतीला घातक ठरत आहे. वाचन, क्लासिक साहित्याचे आकलन कमी झाले आहे. त्यामुळे तकलादू गोष्टींवर, नको त्या अंगावर भर देत चित्रपट निर्माण होऊ लागलेत. मराठीत गेल्या वर्षी १२० चित्रपट निघाले, हे खरे वाटत नाही. १२० चित्रकथा देणारे साहित्य खरे तर जागतिक पातळीवर वाखाणले गेले पाहिजे; पण तसे घडताना दिसत नाही.
‘श्वास’ चित्रपटानंतर खरं तर मराठी चित्रपटांच्या संख्येला सूज आली. ही सूज काही कामाची नसते. ती खरे दुखणे झाकणारी असते. ‘तुकाराम’, ‘बालगंधर्व’, ‘काकस्पर्श’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हे काही अपवाद! पण हे सर्व विषय मराठी माणसांची भूतकाळात रमण्याची भूक भागवणारे आहेत! मराठी मनाला आपले हरवलेले एकत्र कुटुंब, हरवलेले कोकण, विसरलेले संस्कार जाम आवडतात. रोजच्या धकाधकीतून ‘ताऱ्यांच्या बेटा’वर जाऊन आपल्या कोकणातली लाल माती बघायला प्रेक्षकांना आवडते.
‘जन्मगाठ’ या नाटकाच्या पलीकडे रचनेने जाणारा ‘काकस्पर्श’ हा चित्रपट- हे माध्यम दिग्दर्शकाचे आहे, हे अधोरेखित करतो. त्याचबरोबर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ची हाताळणी चॅप्लिनीस्टिक पद्धतीने करण्याची दिग्दर्शकाची भूमिका कलावंत म्हणून मान्य केली तरी एका मोठय़ा माणसाचे प्रचंड, गंभीर कर्तृत्व हसण्यावारी नेल्यासारखे होते. दादासाहेब फाळक्यांवर अजूनही एक उत्तम चरित्रपट निर्माण होऊ शकतो. नव्हे, तो त्यांचा हक्कच आहे!
आजच्या वास्तवाला हात घालणारे काही चित्रपटही दखलपात्र होते. टी.व्ही. माध्यमातून आलेला सतीश राजवाडे ‘गैर’सारखा उत्तम चित्रपट देतो. संजय जाधवसारखा छायालेखक आपल्या कॅमेऱ्याने ‘रिंगा रिंगा’ किंवा ‘चेकमेट’सारखा स्टायलिश टेकिंगचा नमुना पेश करतो. अर्थात चित्रीकरणाची अवजारे या सर्व प्रयोगांना हातभार लावत असतात. आता सोय म्हणायची की अडचण, अशा प्रकारचे ‘व्हिडीओ असिस्ट’ करणारे कॅमेरे येऊ घातल्यामुळे कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांचे माणूसपण, सृजनशीलता, आत्मविश्वास आणि चित्रीकरणाच्या परिणामाबद्दल असणारी उत्सुकता कमी झाल्यासारखी वाटते. या प्रगतीमुळे चित्रीकरण उत्तम होत असेल, त्यात कमी चुका राहत असतील; पण एकूणच गंमत, एक्साइटमेन्ट कमी झाल्यासारखी वाटते.
शूटिंगनंतरचे तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे जाहिरातीच्या ३० सेकंदांच्या फिल्मसाठी प्रॉडक्ट चकाचक करणारे आणि ‘जाहिरात सुंदऱ्यां’ना अधिक आकर्षक बनविणारे, त्यांच्या केसांना, कपडय़ांना ‘चमकिले’ दाखविणारे डिजिटल प्रोग्रॅम आता संपूर्ण चित्रपटासाठी वापरले जातात. त्यामुळे पूर्ण चित्रपटच कचकडय़ाचा बनतो. याचे ‘झकास’ उदाहरण आपण पाहिले असेलच! ३० सेकंदांच्या जाहिरातीमध्ये १०० ग्रॅम श्ॉम्पू तरी असतो, पण अडीच तासांच्या चित्रपटामध्ये ५० ग्रॅम कथा सापडली नाही तर चित्रपट थिएटरपेक्षा टीव्हीवरच जास्त काळ चमकतो.
या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांमध्ये तत्पूर्वीच्या ८० वर्षांमध्ये झाली नाही तेवढी तंत्रज्ञानात क्रांती झाली. छपाईच्या तंत्रज्ञानात लायनो, मोनो, टाईप मशिन कालबाह्य़ झाली आणि नवीन फोटो कम्पोझिंग, इन्टरनेट आणि अनेक प्रकार आले. तसेच चित्रपटाच्या सर्व तांत्रिक अंगांमध्ये, संकलनाच्या टेबलावर नवीन मशिन्स आली. पूर्वी मुव्हीओलाच्या चार इंच बाय सहा इंचाच्या काचेवर क्लासिक्स एडिट झाली. फ्रेम टू फ्रेम कटिंग आणि लिप सिन्क होत होते. हातात कात्री आणि गळ्यामध्ये असंख्य शॉट्सच्या तुकडय़ांच्या माळा घातलेले हृषिदा किंवा वामन गुरूंचे फोटो आपण पाहिले असतील. साऊन्ड सिन्क करणे, इफेक्ट टाकणे, बॅकग्राऊन्ड म्युझिक मॅच करणे, आणि सगळ्यात शेवटी निगेटिव्ह कटिंग करणे- हे सर्व हाताने होत असे. निगेटिव्ह कटिंगचा तर मोठा मुहूर्त वगैरे बघून कार्यक्रम होत असे. काहीसा गृहप्रवेशासारखा! एवढा मोठा चित्रपट पूर्णत्वाला गेल्याचे समाधान.. त्याचे फोटो ट्रेड मॅगझिन्समध्ये झळकत आणि मग पिक्चर विकण्याच्या तयारीला प्रोडय़ुसर लागत असे.
आता सर्व गोष्टी माऊसच्या क्लिकवर कॉम्प्युटरवर होतात. पूर्वी फेड इन्, फेड आऊट इफेक्टसाठी निगेटिव्हला थ्रेडिंग करून, पुन्हा लॅबमध्ये पाठवून दोन दिवस वाट बघावी लागे. आता संकलनाच्या शेवटच्या पायरीपर्यंत निगेटिव्हला हातही लावावा लागत नाही. केवळ बटनांवर काम भागतं. पण त्यामुळे सबंध आयुष्यभर संकलनाचे काम करणारे, त्याबाबत अधिकारवाणीने चार गोष्टी सांगणारे, शिकविणारे ऋषितुल्य संकलक बाद झाले. मूव्हीओला किंवा स्टॅन्डबॅकवर ज्यांचा हात बसलेला आहे, ते तंत्रज्ञ वयाच्या पन्नाशीत कॉम्प्युटरला घाबरूनच असत. यात फायदा किती आणि तोटा किती? आणि कोणाचा? व्यक्तीचा की माध्यमाचा? याचाही विचार व्हावा.
आपण याला ‘ऑडिओ व्हिज्युअल मीडियम’ म्हणतो आणि नेहमी ध्वनीचे महत्त्व विसरतो. कॅमेऱ्यातील क्रांतीबरोबर ध्वनिलेखनाची तंत्रेही विकसित झाली आहेत. पूर्वी केवळ पायलट ट्रॅक म्हणून वापरले जाणारे ध्वनिमुद्रण सिंक साऊन्डच्या येण्याने अत्यंत महत्त्वाचे अंग झाले आहे. नुकतेच भारताला एक नव्हे, दोन ऑस्कर केवळ ध्वनीसाठी आणि संगीतासाठी मिळाले आहेत.
संगीताच्या क्षेत्रातही प्रचंड उलथापालथ होत आहे. पूर्वीचे शंकर-जयकिशन किंवा लक्ष्मीकांत-प्यारेलालचे शंभर-दीडशे वादकांचे रेकॉर्डिग सेशन दंतकथा बनून राहिले आहेत. आता गाण्यासाठी सगळे वादक, गायक क्वचितच एकत्र येतात. उलट, ए. आर. रेहमान चेन्नईवरूनच एखादा म्युझिक पिस मुंबईच्या स्टुडियोत मेल करतो आणि काम मार्गी लागते. पंधरा-वीस व्हायोलिनवादकांचे लाइव्ह वादन आणि डिजिटली मल्टिपल केलेले संगीत यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्या वीस वादकांचा प्रत्येकाचा श्वास त्या तारांवर खेळत असतो.. त्या संगीताला जिवंतपणा बहाल करीत असतो. पण याचा आस्वाद घेण्यासाठी आजकाल कोणाकडे वेळ आहे? प्रत्येकजण घाईत आणि पळत जाण्याच्या गतीमध्ये अडकलेला!
या गतीमुळेच आजची गाणी प्रचंड वेगवान तालाची झाली आहेत. पूर्वीच्या गाण्यांत एकूण ५० ते ६० शॉट्स असत. एका कोपऱ्यातून येणारी नायिका गाणे म्हणत, छोटासा लाकडी पूल ओलांडून दुसऱ्या टोकाला झुकलेल्या झाडाच्या फांदीला हाताने खेळवत किंवा आपला चेहरा झाकत लाडाने लाजत, मुरकत अख्खा अंतरा पूर्ण करीत असे. आता प्रत्येक गाण्यात निदान तीनशे-चारशे तरी शॉट्स असतात. शब्दा-शब्दाला जम्प कट् येतात. हीरॉइनच्या मागे ५० पोरं-पोरी नाचत असतात. एक ना धड भाराभर चिंध्या! आणि अंगावर काय येतं? तर लाऊड फास्ट पेसचं म्युझिक!
अर्थात हाही सभोतालच्या लाइफ स्टाईलचाच परिणाम! कलाकृतीमध्ये समाज, भवताल प्रतिबिंबित कसा होत असतो, याचं हे नाचरे उदाहरण!
महाराष्ट्र शासनही चित्रपट अनुदानाच्या बाबतीत साऊन्डच्या संदर्भात आंधळेपणाने (खरं तर बहिरेपणाने म्हणावयास हवे!) निर्णय घेत असते. सिनेमास्कोप आणि डॉल्बी डिजिटल साऊन्ड असला म्हणजे चित्रपट ‘अ’ वर्गाच्या ३५ ते ४० लाख रुपयांच्या अनुदानाला पात्र होतो. हा म्हणजे ‘सब घोडे बारा टक्के’ नियम झाला. काही विषय असे असतात, किंवा काही दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटाला डॉल्बी डिजिटल साऊंडची गरजच वाटत नसते. त्यांचे यात नुकसान होत असते. संवेदनशील दिग्दर्शक आपल्या विषयानुरूप फिल्म फॉरमॅट आणि साऊन्ड सिस्टम वापरत असतो. त्यांच्यावर सिनेमास्कोप आणि डॉल्बीची सक्ती करणे गैर आहे. एकूणच या सरकारी मदतीने चित्रपटाचा दर्जा किती उंचावला, हा वादाचा विषय आहे.
हिंदी चित्रपटांच्या संदर्भात विचार केला तर प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा गैरवापरच जास्त होताना दिसतो. सलमान खान किंवा अजय देवगणसारखे हीरो आपली अ‍ॅक्शन हीरोची इमेज जपण्यासाठी एका ठोकरीमध्ये दोन-चार जीप्स, टॅक्सी आदी वाहने हवेत चार-चार कोलांटय़ा उडय़ा मारण्यासाठी वापरतात आणि क्षणात वर्तमानातील चित्रपट चमत्कृतीपूर्ण पौराणिक होऊन जातो! कुठलेही तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे असते. अशा विनोदी, अशक्यप्राय गोष्टीला जर आपण क्रिएटिव्हीटी म्हणणार असू, तर आपलीच मान या दुधारी तलवारीने कापून घेण्यासारखे आहे.
चित्रीकरणाची साधने, कॅमेरा आता अगदी सर्वसाधारण माणसांच्याही हाती आलेला आहे. मोबाइल फोनवरसुद्धा आता छोटय़ा फिल्मस् होऊ लागल्या आहेत. कॉलेजियन मुले-मुली प्रोजेक्ट प्रेझेन्टेशन लॅपटॉपवर करू लागले आहेत. यातूनच चित्रसाक्षरता वाढू लागेल. सिक्युरिटीसाठी लावलेल्या कॅमेऱ्याच्या अँगलने चित्रीकरण केलेला ‘लव्ह, सेक्स अ‍ॅन्ड धोखा’सारखा प्रयोग याच तंत्रज्ञानाचे फळ आहे. डिजिटल चित्रीकरणामुळे शूटिंगचा खर्च कमी झाला आहे. कमी लाइटस्, हलके उपकरण, छोटे आकार यामुळे नवनवीन प्रयोग करणे शक्य होत आहे. ‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’सारखे वास्तवदर्शी चित्रपट निर्माण होत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रामूसारखे दिग्दर्शक या उपकरणाच्या सहजतेचा नको तिथे कॅमेरे लावून चित्रीकरण करून अतिरेकही करीत आहेत. ड्रायव्हरच्या सीटखाली कॅमेरा, मोटारीच्या स्टीअरिंग व्हीलवर किंवा टॅक्सीच्या डिकीमध्ये कॅमेरे लावून गोष्ट सांगण्याचा द्राविडी प्राणायाम करीत आहेत. परंतु असे ‘प्रयोग’ प्रेक्षक नाकारत आहेत.
एक मात्र निश्चित, की या साधनांमुळे गोष्ट सांगण्याच्या, नॅरेशनच्या पद्धती बदलत आहेत. नवनवे फॉर्मस् शोधून काढले जात आहेत. आणि हे कलाप्रकार म्हणून चित्रपटाला साह्य़भूत ठरत आहे. असे म्हटले जाते की, कागद आणि पेनइतकेच चित्रपट माध्यम सहज आणि स्वस्त झाले म्हणजे त्याचा कलाप्रकार म्हणून विकास होण्यास वेळ लागणार नाही.
कलाप्रकारावरून आठवले- सिनेमाच्या साथीने गावा-गावांमध्ये थिएटर डेकोरेशनसाठी आणि प्रसिद्धीसाठी लागणारी होर्डिग्ज पेन्टर नावाची कलावंत पिढी निर्माण झाली होती. अजंठा आर्ट्स, व्हिनस आर्ट्स, बाळकृष्ण वैद्य, सोलापूरचे प्रसिद्ध यल्लादासी आदी कमालीचे गुणी कलावंत होते. माझ्या जे. जे. स्कूलमधून आम्हाला खास मिनव्‍‌र्हा टॉकिजवर लावलेला ‘दाग’ चित्रपटामधील राखीचा कटआऊट पाहण्यासाठी पाठवले होते. आकाशी निळ्या शिफॉन साडीवर केवळ पांढऱ्या रंगाच्या ड्राय ब्रशने स्ट्रोक मारलेले होते. ते आजही डोळ्यांसमोरून जात नाहीत. हे खरे मास्टर स्ट्रोक होते. आज डिजिटल प्रिन्टिंगच्या जमान्याने या कलावंतांना देशोधडीला लावले आहे आणि गल्लीबोळातील तथाकथित दादा, भाईंना आपल्या माथ्यावर ‘नेते’ म्हणून आदळले आहे! त्यांची शुभेच्छा वगैरे देणारी होर्डिग्ज् याच डिजिटल तंत्रज्ञानाने सहज व स्वस्त झाली आहेत.
पण ‘डिजिटल’ हा फार फसवा शब्द आहे. आपल्या हातातील मोबाइल फोनपासून सिने-कॅमेऱ्यासाठी हा शब्द सर्रास वापरला जातो.
सध्या भारतात 2 K म्हणजे १०२४ किलो बाइटचा कॅमेरा फिल्मिंगसाठी वापरला जातो. हॉलीवूडमध्ये 4 K म्हणजे ४०९८ किलो बाइटच्या कॅमेऱ्याचा वापर होतो. S.M.P.T.E. नावाची संस्था जगभरात (‘सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इंजिनीअर्स’) या तंत्रज्ञानाचे प्रमाणिकरण करण्यात गुंतलेली आहे. एरी नावाची नावाजलेली कॅमेरा कंपनी ‘अ‍ॅलेक्सा’ नावाचा आणि ‘रेड’ नावाची दुसरी कंपनी वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे कॅमेरे बनवीत आहेत. याचबरोबर D. I. म्हणजे डिजिटल इंटरमिजिएट हे तंत्रज्ञानही वापरले जात आहे. पण या तंत्रज्ञानाच्या धरण फुटल्याप्रमाणे धो-धो वाहणाऱ्या प्रवाहाचा आपले तंत्रज्ञ फक्त २० ते ३० टक्केच वापर करीत आहेत. कारण या नव्या तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण त्यांना मिळत नाही. हे काहीसं आपल्या मोबाइल फोनसारखंच आहे. आपल्या फोनमध्ये काय काय प्रोग्रॅम्स आहेत हे बऱ्याचजणांना माहीतच नसते. मोबाइल फक्त फोन करणे आणि फोन घेण्यापुरताच वापरला जातो.
अर्थात हा प्राथमिक काळ गेला की झपाटय़ाने प्रगती होईल. तंत्रज्ञान येणे थांबणार नाही. त्याचा पूर्णपणे वापर करून त्याच्या सर्व ताकदीचा आवाका लक्षात घेऊन नवे विषय, नवे प्रयोग, नव्या नॅरेशनच्या पद्धती हाताळल्या गेल्या तर आपण नव्या युगाला नव्या दमाने तोंड देऊ शकू. आणि मग सारे जग मार्केट प्लेस बनू शकते.
या सर्वाची शेवटची साखळी म्हणजे थिएटर आणि प्रेक्षक; ज्यांच्यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला असतो. पूर्वी जेथे एक स्क्रीन होता तिथे आता चार-चार स्क्रीन्सचे मल्टिप्लेक्स झालेले आहेत. चार पडद्यांवर चार- चार शोज् दररोज चालवण्यासाठी तेवढे सिनेमेही निर्माण होऊ लागले आहेत. अंधेरी या मुंबईतील उपनगराचे उदाहरण घ्यायचे झाले तर दहा वर्षांपूर्वी तिथे मोजून तीन थिएटर्स होती. आज त्याच परिसरात निदान २२ स्क्रीन्स आहेत. थिएटरचा लूक बदलला, माहौल बदलला, मोठय़ा प्रमाणात प्रेक्षक बदलला, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या. एवढेच नव्हे, तर दीड-दोन वर्षांनी येणारे इंग्रजी चित्रपट हॉलीवूडच्या बरोबरीने आता इथे प्रदर्शित होऊ लागले आहेत. तिकीट दरही भरमसाट वाढलेत. थिएटरमधील खाण्यापिण्याच्या गोष्टी भयानक महाग झाल्यात. पाच-दहा रुपयांत मिळणारा समोसा आणि पॉपकॉर्न साठ ते ऐंशी रुपयांत हाती येऊ लागलाय. पूर्वी थ्री-डी पिक्चर बघण्यासाठी फुकट मिळणारे लाल, निळे चष्मे आता २०० रुपये अमानत ठेवून घ्यावे लागतात. शुद्ध पाणी दुर्मिळ झाले आहे. त्याची तहान कोक, नाहीतर पेप्सीवर भागवावी लागतेय. ‘हाऊसफुल्ल’ ही पाटी दिसेनाशी झालीय. कारण ‘येईल त्याला तिकीट’ ही नीती झालीय. एका चौकोनी कुटुंबाला वीकएण्डला चित्रपट बघायचा असेल तर आज किमान दोन ते अडीच हजार रुपये लागतात. आणि तरीही प्रेक्षक गर्दी करतच असतात. कारण नवनवीन तंत्रज्ञानाने ही मायानगरी पुढेसुद्धा प्रेक्षकांसमोर नवनवी स्वप्नं उलगडत जाईल आणि प्रत्येक जण शेजारच्या प्रेक्षकाला म्हणेल- ‘जनाब! आगे पर्दे पर देखिए!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 5:45 am

Web Title: hindi title for english movie outside cinema hall in mumbai
Next Stories
1 ‘गँग्स ऑफ वासेपुर’ आणि सिनेमाचे बदलते विश्व
2 एक अस्वस्थ वादळ!
Just Now!
X