16 February 2019

News Flash

तुझ्या-माझ्या ‘लिव्ह इन्’ला आणि काय हवं..?

गेल्या १५ वर्षांपासून आम्ही ‘लिव्ह इन्’मध्ये राहतो. तेव्हा तर आपल्या समाजात ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ची ओळखदेखील व्हायची होती. असे काही संबंध असतात, याची चर्चाही कधी ऐकली

| February 20, 2013 05:24 am

गेल्या १५ वर्षांपासून आम्ही ‘लिव्ह इन्’मध्ये राहतो. तेव्हा तर आपल्या समाजात ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ची ओळखदेखील व्हायची होती. असे काही संबंध असतात, याची चर्चाही कधी ऐकली नव्हती. लग्नाचा विधी करून कुटुंबं जशी एकत्र राहतात आणि वाढतात, तसंच माझं ‘लिव्ह इन्’मधलं कुटुंब आहे. मी अनुपमा नारनवरे, पती (?) विजय पारसे, मुलगा, मुलगी आणि माझी आई असं आमचं पंचकोनी कुटुंब आहे. लग्न झालं नाही म्हणून ना आमचं कुठे अडलं, ना आम्हाला काही कमी पडलं. आम्ही अगदी आनंदाने आमचा हा ‘लिव्ह-इन्’मधला संसार करतो आहोत.
नातं म्हणून, कुटुंब म्हणून आम्हालाही सगळी व्यवधानं पार पाडावी लागतात. सामाजिक, कार्यालयीन, कौटुंबिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्हीदेखील हिरीरीनं पार पाडतो. अगदी माझी नोकरीसुद्धा रीतसर सुरू आहे. केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर कार्यालयात मी नोकरी करते, तर विजय खासगी कंपनीत काम करतात.
मूळची मी राऊत. विनोद नारनवरे या उच्चशिक्षित तरुणाशी १९९६ साली माझं रीतसर लग्न झालं. पण लग्नाच्या काही दिवसांतच विनोदशी माझं पटेनासं झालं. त्याला कारणही होतं- त्याची दारू. माझे वडील कधी कधी दारू प्यायचे. त्यांच्या कार्यालयातील मित्रांनी मिळून केलेल्या पार्टीत एकदा ते दारू प्यायले आणि त्याच दिवशी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा दारूमुळं गेलेला जीव माझ्या जिव्हारी लागला होता. त्याचवेळी आजूबाजूला दारूपायी उद्ध्वस्त होणारे संसारही याची मला जाणीव देत होते. त्यामुळेच दारू आणि दारू पिणाऱ्यांविषयी माझ्या मनात किळस व घृणा निर्माण झाली. विनोदच्या दारू पिण्यानं लग्नाच्या काही दिवसांतच आमचे खटके उडू लागले. दोघांचं पटत नसल्याचं लवकरच आमच्या लक्षात आल्यानं एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घ्यायचं आम्ही ठरवलं. सब-रजिस्टारच्या कार्यालयात जाऊन आम्ही घटस्फोटाची रीतसर प्रक्रिया पूर्ण केली. लग्नाच्या चार महिन्यांतच आम्ही विभक्त झालो. माझी आई सोडली तर घटस्फोटामुळं जवळची सगळी नाती दुरावली. माझा घटस्फोट अनेकांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे एकाकीपणा माझ्या वाटय़ाला आला. स्वत:च्या कार्यालयात, घरात वावरताना मी सतत नाराज, उदास असायचे. आईला माझी खूपच काळजी वाटायची. आई (नर्मदा राऊत) सेवानिवृत्त शिक्षिका असल्यानं भल्याबुऱ्याची तिला जाण होती. मी आनंदी राहावं, स्वत:चा संसार करावा असं तिला मनोमन वाटत होतं. तिनं मला हिंमत दिली. ती कायम माझ्या पाठीशी कणखरपणे उभी राहिली.
आम्ही दोघंही त्यावेळी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळात सरकारी नोकरीत होतो. दोन-तीन दिवसांच्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने विजय पारसे नागपुरात आले होते. माझ्या चेहऱ्यावरची उदासी त्यांनी टिपली. माझ्या कहाणीने त्यांचं मन हेलावलं. विजयच्या वैवाहिक आयुष्यात तेही सुखी नसल्यानं साहजिकच माझ्याविषयी त्यांना सहानुभूती वाटू लागली. कार्यशाळा संपल्यावर ते मुंबईला निघून गेले, पण फोन आणि पत्रांच्या माध्यमातून आमचा संपर्क त्यानंतरही होत राहिला. दोघांचाही पहिल्या जोडीदाराकडून अपेक्षाभंग झाल्यानं दोघांच्याही जीवनात एक रितेपण होतंच.
त्यातच मला घटस्फोटानंतर एकूणच नागपूर परिसर आणि मला समजून न घेणाऱ्या तिथल्या लोकांविषयी उद्विग्नता आली होती. त्याचं सतत एक मानसिक दडपण मनावर राहायचं. इथून कुठेतरी दूर जायला हवं, हा विचार त्यातून तीव्र होत गेला. त्याचवेळी पदोन्नतीच्या रूपात मला जयपूरला जायची संधी मिळाली. आई आणि मी यापूर्वी कधीच नागपूरच्या बाहेर गेलो नव्हतो. बरोबर कुणाला घेऊन जायचं, हा प्रश्न होताच. दोघींनीच अनोळखी ठिकाणी कसं जायचं? कुणीतरी पुरुष सोबतीला असावा असं त्यावेळी वाटलं. भावाची व्यक्तिगत अडचण असल्यानं तोही सोबत येऊ शकत नव्हता. त्यामुळं विजय पारसे यांना विचारलं. ते राजी झाले. आम्ही तिघं ऑगस्ट १९९७ मध्ये जयपूरला गेलो. काही दिवसांसाठी गेलो आणि तब्बल नऊ वर्षे सोबत राहिलो. त्या काळात एकमेकांना जाणून घेण्याची आम्हाला मोठी संधी मिळाली. त्यातून आम्ही आणखी एकमेकांच्या जवळ आलो.
जयपूरमधल्या नऊ वर्षांच्या काळात विजयनं दिलेला दिलासा आणि आईनं आम्हा दोघांच्या नात्याला दिलेली संमती यामुळे आम्ही कायमचं ‘लिव्ह इन्’मध्येच राहण्याचा निर्णय घेतला. लग्न का केलं नाही, याचं कारण हा निर्णय घेतला तेव्हा विजय मुंबईत केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळात कार्यरत होते. एकत्र राहायचं म्हणजे एकाला नोकरी सोडावी लागणार होती. मात्र, विजय यांनी मोठय़ा मनानं नोकरी सोडण्याची तयारी दर्शविली. त्यांच्या मते, ‘पुरुषाला खासगी नोकरी स्वीकारणं स्त्रीपेक्षा सोपं आहे. स्त्रियांसाठी मर्यादित जागा आणि त्याच त्या प्रकारची कामं वाटय़ाला येतात.’ विजय यांनी मुंबईतील सरकारी नोकरी सोडली. जयपूरहून दिल्लीला माझी बदली झाली तेव्हाही विजय यांनी आपल्या उत्तम अशा खासगी नोकरीचा राजीनामा दिला. एकूणात स्त्रीच्या समायोजनापेक्षा पुरुषांना समायोजन करणं सोपं असतं, असं आम्हा दोघांचं मत बनलं. त्यामुळंच अनेक ठिकाणच्या नोकऱ्या सोडून विजयनं आमच्या संसाराला भक्कम आधार दिला.
विजय यांच्याबरोबरच्या या नात्यामध्ये मी सुखी आहे. आनंदी आहे. कारण नेहमी फक्त स्त्रीच तडजोडी करते, त्याग करते असं म्हटलं जातं; पण आमच्या बाबतीत विजय यांनी ही जबाबदारी पार पाडलीय, असं मी म्हणेन. विजय यांच्या मोठेपणाचे अनेक किस्से आहेत. त्यातलं नाव न बदलण्याचा किस्सा सांगायलाच हवा. तसं पाहिलं तर ‘नारनवरे’ हे माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव. विनोद नारनवरे याच्याशी लग्न झाल्यानंतर ‘अनुपमा विनोद नारनवरे’ असं कार्यालयीन रेकॉर्डमध्ये मी नाव बदलून घेतलं. तेच नाव आजही मी लावते. विजय यांचा माझ्या या नावाविषयी अजिबात आक्षेप नाही. किंबहुना, आमच्या राहत्या घराच्या आजूबाजूला ते ‘नारनवरे’ या नावानेच ओळखले जातात. लोकही त्याला ‘नारनवरे’च म्हणतात. इतकंच काय, मुलांनाही ते ‘नारनवरे’ असल्याचंच माहिती आहे. लग्न झाल्यावर बाईचं नाव बदलायला पुरुष जेवढी तत्परता दाखवतात, तेवढय़ा सहजपणे ते स्वत:चं नाव बदलायला तयार होत नाहीत. मात्र, स्वत:ची ओळख विसरून पत्नीच्या पहिल्या पतीच्या नावानं आपली ओळख दाखवणं, हे किती पुरुषांना शक्य होईल?
गेली १५ वर्षे आमचा सुखी संसार सुरू आहे. आमची दोन मुलं- मोठा मुलगा ‘उत्कर्ष विनोद नारनवरे’ नववीत, तर मुलगी ‘आकांक्षा विनोद नारनवरे’ दुसरीत शिकते आहे. माझ्या घटस्फोटाचं कारण त्यावेळी नातेवाईकांना रुचलं नव्हतं. तेव्हा ते दुरावले होते. ‘लिव्ह इन्’मुळं तर त्यांना आणखीनच धक्का बसला. विजयच्या पहिल्या कुटुंबानंही गेल्या १३-१४ वर्षांत त्यांची कुठलीही विचारपूस केलेली नाही. त्यामुळे आता आम्हीही कोणाचा फारसा विचार करत नाही.
आम्हाला एकमेकांविषयी प्रचंड विश्वास असून कोणतीही असुरक्षिततेची भावना मला वाटत नाही. ‘लिव्ह इन्’मध्ये राहण्याने कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आर्थिक पातळीवर आम्हाला कोणतेही उणेपण वाटत नाही. इतरांसारखंच आम्हीही व्यवस्थित जीवन जगतो आहोत. आमचं पाचजणांचं कुटुंब अतिशय सुखी कुटुंब आहे, असं मला वाटतं.

First Published on February 20, 2013 5:24 am

Web Title: live in relationship story of anupama narnvare