महेंद्र दामले

आपल्याला अस्सल अनुभव कुठल्या तरी माध्यमातून, कौशल्याद्वारे देण्याचं काम कलाकृती करत असतात. पण काळाच्या ओघात या कलाकृतींच्या ‘कलावस्तू’ झाल्या. औद्योगिकीकरणानं कारागिरीच्या वस्तुकरणाची प्रक्रियाही पुढे नेली. पण दृश्य-कलाकृतीच्या वस्तुकरणाविरुद्ध मार्सेल दुशाम्प किंवा अँडी गोल्डस्वर्दीसारखे लोक उभे राहिले. मात्र, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या काळाची आव्हानं आणखी निराळी आहेत. इथं आपल्या अनुभवाचंच वस्तुकरण होत आहे. अस्सल म्हणजे काय, हेही आपल्याला पाहावंसं वाटत नाही..

मी तुमच्यासारखा- म्हणजे चारचौघांसारखा आहे. म्हणजे मी संगणक वापरतो, संगणकीय तंत्रज्ञान वापरतो; पण मला तंत्रज्ञान समजत नाही. ते गुंतागुंतीचं वाटतं. त्यामुळे मी या विषयात खोलवर जात नाही. पण मला मधे मधे क्षणिक भान येतं, की तंत्रज्ञानाने तयार केलेल्या वस्तूंमधून, त्या वापरल्यामुळे तंत्रज्ञान माझ्यात खोलवर घुसलंय! म्हणजे लिहिताना सवयीने इथे गालातल्या गालात हसणारी एक इमोजी टाकायची इच्छा झाली.

अर्थातच ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या सवयीने.

मला काही बघायचं झालं तर मी ते शोधण्यासाठी व्याकूळ होत नाही. मी लगेच इंटरनेटवर शोधतो आणि त्या वस्तूच्या डिजिटल स्वरूपातून तिचा अनुभव घेतो. इंटरनेटच्या माध्यमातून मी वस्तूच्या कितीही जवळ जाऊ शकतो आणि अनेक कोनांतूनही ती पाहू शकतो. माझ्यासारख्या अनेक लोकांनी इंटरनेटवर पाहण्यासाठी ठेवलेले फोटो, व्हिडीओ याद्वारे जगाचा अनुभव मी घेत असतो. त्यांच्या अनुभवांतून मी माझा अनुभव काही प्रमाणात तयार करतो. संगीत, गाणं आठवण्याचा मी प्रयत्न करत नाही, लगेच ते शोधतो आणि ऐकतो. अगदी पुन्हा पुन्हा! हवी असलेली वस्तूही त्यावर शोधतो आणि विकत घेतो. बऱ्याच प्रमाणात माझे दृश्य, स्पर्श आणि श्राव्य अनुभव हे तंत्रज्ञानाच्या आधारे मी घेतो. मी तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. परिणामी माझ्या अनेक अनुभवांच्या स्मृती या ‘डिजिटल टूल्स’च्या साहाय्याने घेतलेल्या अनुभवावर आधारित आहेत. मी हेही पाहिलंय की, अनेक लोक स्वत:ची प्रतिमादेखील हल्ली आरशापेक्षा त्यांच्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये पाहतात. आरसा हा जवळपास कालबाह्य़ झाला आहे.

तर तंत्रज्ञानाचं हे असं आहे. ते आपल्याला दृक्श्राव्य अनुभव देतं आणि त्याद्वारे आपल्या शरीरात, आपल्या स्मृतीमध्ये, सवयींमध्ये आणि आपल्या विचाराच्या पातळीवर भिनतं. ते संसर्गासारखं वाढतं आणि लवकर आपला पिच्छा सोडत नाही.

मानवी इतिहासाचा विचार कला, कुसर आणि डिझाइन या अंगाने करताना तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण व त्याआधारे पारंपरिक मानवी कृतीतून निर्माण होणाऱ्या वस्तू यंत्राद्वारे बनवणे (हे त्या- त्या वेळी नवं) आणि मानवी पातळीवर, मानवी कृतीद्वारे वस्तू, कलानिर्मिती, त्याची परंपरा, व्यवसाय (हे त्या- त्या वेळी जुनं) या नव्या-जुन्यात उडालेले खटके, झालेले संघर्ष यांची अनेक उदाहरणे आहेत. ती इतिहासात पाहताना ती युरोपात घडली, या अंगानेच नकळत पाहत होतो. (म्हणजे आपलं काय जातंय असा भाव होता.) परंतु ‘लेथ जोशी’ हा सिनेमा आला आणि अनेक वर्षांपासून जाणवणारी गोष्ट एकदम समोर आली, की हे खटके, संघर्ष हा आपल्या अंगणात कधीच घुसलाय. आणि त्यापुढे जाऊन आपल्या सौंदर्यजाणिवेत ढवळाढवळ करतोय. हे लक्षात आल्यावर त्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे असं वाटू लागलं. अनेक उदाहरणांत मला वारंवार असा सूर दिसून येतो की, यंत्राने बनवलेली वस्तू ही गुणवत्तेमध्ये कमी दर्जाची आहे. म्हणजे तिचं सौंदर्यमूल्य हे तितकं अस्सल प्रकारचं नाही. या टीकेत अनेक स्तर आहेत. ते उलगडून पाहायला हवे.

कलाकृती- हॅण्डमेड आणि रेडिमेड

१९१७ साली मास्रेल दुशाम्पने ‘फाउंटन’ हे शिल्प मांडलं. त्याने अपेक्षित होती तशी खळबळ उडाली. एकतर त्या शिल्पात त्याने पुरुषांच्या मुतारीमधील भांडे शिल्प मांडतात तशा चबुतऱ्यावर मांडलं होतं. म्हणजे जी गोष्ट त्याज्य, कलाबाहय़ मानली जाते, ती कलादालनात मांडली. बर,ं ते सरळ हार्डवेअरच्या दुकानात मिळणारं युरिनल पॉट होतं, ते त्याने विकत घेतलं आणि मांडलं. त्यानं ते आपल्या हाताने बनवलेलं नव्हतं. दुशाम्प या प्रकारच्या कलाकृतींना ‘रेडिमेड’ असं म्हणायचा. ‘कलाकृती ही अद्वितीय असते’, ‘ती कलाकार आपल्या हाताने घडवतो’, ‘ती पुन्हा पुन्हा तशीच घडू शकत नाही’ असे जे पारंपरिक समज होते, त्यांना दुशाम्पने धक्का दिला. हा धक्का मानसिक आणि वैचारिक पातळीवर दिला होता. ‘ऊअऊअ’ चळवळीचा तो एक उद्देश होता. वस्तू- मग ती कलावस्तू का होईना- ती कोणीही बनवलेली असली तरी चालते. मग ती एखाद्या कारखान्यात बनवलेली असली तरी चालते. तिच्याबद्दल कलापातळीवर आपण कसा विचार करतो, आणि एकसारख्या बनवलेल्या वस्तूंपकी कलाकृती म्हणून कोणती वस्तू निवडतो, हा निर्णय खूप महत्त्वाचा असतो, हे दुशाम्पनं त्याच्या कृतीमधून अधोरेखित केलं.

यानंतर दुशाम्पने अनेक ‘रेडिमेड’ घडवली. त्यात बाटल्या, वाळत घालायचा स्टॅण्ड, स्टुलावर बसवलेलं सायकलचं चाक, माती उकरण्याचा हात अशा अनेक वस्तू होत्या.औद्योगिक क्रांतीनंतर जे वाद क्राफ्ट किंवा कुसरीबाबत घडत होते ते दुशाम्पने हाय आर्टच्या- ललित कलेच्या पातळीवर मांडले. त्याची अशीच एक कलाकृती म्हणजे ‘एअर दि पॅरिस’! दुशाम्पने औषधाच्या दुकानातून एक रिकामा काचेचा अँपूल खरेदी केला. तो पॅरिसमध्ये खरेदी केल्यामुळे त्यात पॅरिसची हवा होती. ती वक्रकुपी (सोयीसाठी मराठीत) त्याने आपल्या मित्राला पाठवली. हवा ही काही वस्तू किंवा कलावस्तू होत नाही; पण ती वक्रकुपी जेव्हा गॅलरीत मांडली जाते तेव्हा तिच्या आत लोक पाहतात आणि हवा, हवेची संवेदना कल्पितात. म्हणजे एरवी केवळ संवेदनेने जाणवणारी हवा ही इथे एक वस्तू बनते. त्यात तिच्या वेष्टनाचा भाग आहेच; पण कलाविषयक विचाराचा, कल्पनेचाही भाग त्याहून मोठा आहे.

कोणतीही वस्तू निर्माण होताना मानवी संवेदनांना वस्तुरूपात रूपांतरित केलं जात असतं. त्यातून वस्तूंचं वापरण्यायोग्य रूप तयार होतं. कलावस्तूमध्ये ते प्रकर्षांने केलं जातं. कारण कलावस्तूचा उपभोग संवेदनेपासून सुरू होतो. त्यामुळे संवेदनेला वस्तुरूप कसं केलं आहे ते कलाकृतीमध्ये  दिसतं.  हा सगळ्यात मूलभूत स्तर आहे.

कलावस्तू- संवेदनेचं अनुभव वस्तुरूप

तमिळनाडचे जगप्रसिद्ध समकालीन संगीतकार टी. एम. कृष्णा यांनी २०१५ साली जाहीर केलं, की ते त्या विशिष्ट वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या गाणं-नृत्य आदी कार्यक्रमांच्या ऐन हंगामात एकही कर्यक्रम करणार नाहीत. तमिळनाडमध्ये तमिळ कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यात सुरू होणारे कार्यक्रम- जे अगदी पोंगल म्हणजे संक्रांतीपर्यंत असतात- त्यांना ‘म्युझिक सीझन’ म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये नवीन तसेच दिग्गज दोन्ही गातात. वादन वा नृत्य सादर करतात. अर्थातच त्यात पंक्तीप्रपंच असतो, तो कार्यक्रमाच्या वेळांमध्ये. म्हणजे नवीन कलाकारांना सकाळच्या वेळा, श्रेष्ठांना संध्याकाळी प्राइम टाइम. (जेव्हा लोक तिकिटं खरेदी करून कार्यक्रमाला येतील.) या उत्सवात संधी मिळणे खूप महत्त्वाचे असते. पुढील कार्यक्रमांची सुपारी मिळणे, नाव चच्रेत राहणे, समीक्षक आणि रसिक यांच्यात लौकिक होणे, अशा अनेक अंगांनी ते महत्त्वाचे. गंमत म्हणजे या कचेरींसोबत (कला कार्यक्रमासोबत) या सभागृहाबाहेर टिफिन सíव्हस असते. त्यातील पदार्थाच्या गुणवत्तेवर आधारित अनेक लोक घरातील लग्नादी समारंभांसाठी आचारी ठरवतात. त्यामुळे हा कलाउत्सव अनेक पलूंनी महत्त्वाचा असतो. गाणं, संगीत ऐकणं, नृत्य पाहणं आदी प्रक्रियेत संवेदनांना सादरीकरणाद्वारे वस्तूमध्ये रूपांतरित केलं जातं आणि मग त्याआधारे व्यवहार केला जातो. या गोष्टीकडे कृष्णा यांनी त्यांच्या घोषणेने लक्ष वेधलं. या जाहीर होण्याने खळबळ माजली. कृष्णांचं म्हणणं असं की, एकदा कर्यक्रम ठरला की तो कार्यक्रम, त्यामुळे मिळणारी प्रसिद्धी, स्पॉन्सरशिप, पसे, बाकीची आमंत्रणं आदी गोष्टींत मन गुंतून जातं. आणि गाण्याची तयारी, संगीतातील विचार, गाण्याच्या संगीताचा आनंद आदी गोष्टींकडे लक्ष राहत नाही. कलेपेक्षा मन कलाव्यवहारात गुंतून जातं. परिणामी ते एक सीझन गाणार नाहीत. जे कृष्णा यांनी उलगडून दाखवलं ते प्रत्येक कलाकार करत असतो. पण या कारणमीमांसेला जास्त प्रतिसाद, प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. एकतर कृष्णा यांचा कलाकार म्हणून दबदबा आह. ते अशा ‘अपारंपरिक’ कृती व भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. कृष्णा यांना सहमती दाखवली तरी पंचाईत आणि विरोध केला तरीही..

कृष्णा यांनी कार्यक्रमासंबंधीच्या मानसिक प्रक्रियेवर प्रकाश टाकून संगीताच्या वस्तुरूपात रूपांतरण होण्याच्या मुळावर बोट ठेवलं. पण कोणी हेही म्हणेल, की त्यांच्या ध्वनिमुद्रित झालेल्या सीडी आदींबद्दल त्यांची भूमिका काय? कारण तिथेही हेच होतं की. संवेदनांचं वस्तुरूप बनणं!! तरीदेखील एक कलाकार या वस्तुरूपाबद्दल अशी भूमिका जाहीरपणे घेतो हे महत्त्वाचं आणि नवलाचं आहे.

यंत्राद्वारे निर्मिती आणि मानवी कृतीतून निर्मिती

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि आपल्याकडे त्याचे पडसाद उमटले. पण ते पुढे पाहू. औद्योगिक क्रांतीने तिथे शहरीकरण वाढले आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम दिसू लागले. त्याचबरोबर पारंपरिक कलाकृती, कलावस्तू आणि वस्तूनिर्मिती आणि यंत्राच्या साहाय्याने केलेलं वस्तू उत्पादन या गोष्टींत तिथं संघर्ष सुरू झाला. यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक निर्मितीच्या पद्धती, त्यातील लोक, त्यांचा रोजगार यांवर गदा आली होती. यंत्राने निर्माण केलेल्या वस्तू या मानवी प्रक्रियेने निर्माण केलेल्या वस्तूंपेक्षा खूप स्वस्त होत्या. परिणामी समाजात एक प्रकारे धुसफूस सुरू झाली होती. यातूनच जॉन रस्किनने सौंदर्य अभिरुचीचा मुद्दा उचलून या परिस्थितीवर हल्ला केला. मानवी प्रयत्न आणि श्रम याला जास्त महत्त्व दिलं आणि अगदी एकहाती ‘आर्ट अँड क्राफ्ट मूव्हमेंट’ सुरू केली. विलियम मॉरिससारख्या त्याचं धोरण अवलंबिणाऱ्या डिझायनर्सनी अनेक पातळ्यांवर ती चळवळ पसरवली.

गंमत ही की, मॉरिसने अनेक भारतीय वस्त्रं, अलंकरण आणि इतर कलापरंपरांचा अभ्यास केला आणि त्याचा वापर इंग्लंडमध्ये नवीन डिझाइन निर्माण करण्यासाठी केला. इथे मी मॉरिसला अगदी वाईट्ट ठरवू इच्छित नाही. पण (नकळत किंवा जाणीवपूर्वक, याचा अभ्यास करावा लागेल.) ज्या यांत्रिकीकरणाविरुद्ध इंग्लंडमध्ये चळवळ सुरू होती त्याच्या बरोबर उलट भारतात ब्रिटिश राजवट धोरणं अवलंबत होती आणि भारताच्या ग्रामीण भागातील कलाकुसर आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडण्यामागे हीच धोरणं होती. म्हणजे एकीकडे १८५१ साली झालेल्या ग्रेट एक्झिबिशनमध्ये आपल्या मालकीची वसाहत म्हणून ब्रिटिशांनी भारतीय कलेचं एक मोठं दर्शन घडवून आणलं. तिथे मॉरिसने भारतीय कला पाहिली. मग त्यातून पश्मिना शालींवरचं भरतकाम मॉरिसने छापायला सुरुवात केली. त्यामुळे कमी वेळात (इंग्लंडमध्ये कडाक्याच्या थंडीचे दिवस असतात तेव्हा), कमी किमतीच्या पश्मिना शालीसारख्या दिसणाऱ्या शाली तयार होणं शक्य झालं. त्याने ते केलं आणि आर्ट अँड क्राफ्ट मूव्हमेंटने (जी चळवळ यांत्रिकीकरणाविरुद्ध शड्ड ठोकून उभी होती.) इंग्लंडपासून खूप दूरच्या भारतातील एका कलेला आजारी केलं. जे पश्मिना शालींचं झालं, तेच  विणकामातून आणि भरतकामातून तयार होणाऱ्या इतर कलांचं झालं. स्वदेशी चळवळीचं हे एक न माहीत असलेलं स्वरूप असेल.

भारतात इंग्रजांमुळे यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण आलं आणि आपल्या समाजात मानवी कृती, परंपरा आणि औद्योगिकता यांची सांगड कशी घालावी, या अर्थाचे अनेक संघर्ष सुरू झाले.

मानवी कृती- कलाकृती

अँडी गोल्डस्वर्दी हा समकालीन शिल्पकार, फोटोग्राफर आणि पर्यावरणवादी आहे. तो जी कृती कला म्हणून करतो, ती विलक्षण आहे. ती एकाच वेळी लाखो र्वष मानव आणि त्याचा सभोवताल यांतील नात्याबद्दल बोलते आणि त्याच वेळी समकालीन ‘हाय आर्ट’ही ठरते. तिचं स्वरूप पाहिलं तर ती विकत घेणं अशक्य आणि जोखमीचं वाटेल. पण तरीही काही व्यक्ती आणि गॅलरी अँडीचं प्रतिनिधित्व करतात. अँडी खुल्या आसमंतात कलाकृती करतो. त्यासाठी तो केवळ नसíगक वस्तू किंवा वनस्पती, झाड, दगड, काटे, पानं, पाणी, लोकर, बर्फ अशा घटकांचाच वापर करतो. कोणत्याही रासायनिक, आधुनिक गोष्टी- उदाहरणार्थ खिळे, गोंद, दोर इत्यादी वापरत नाही. अगदी काही अपवाद वगळता जिथे तो क्रेन किंवा दगड फोडायची यंत्रं वापरतो. त्याची निर्मिती ही शेतामध्ये काम करावं तशी असते. तो कोणतीही केवळ ‘डोळ्याला आकर्षक वाटेल अशी’ अलंकारिक कृती करत नाही. ती एकदा केल्यावर तशीच सोडत नाही. त्याचे अनेक फोटो घेतो. कारण त्याच रूपात त्यांना काळाच्या ओघात पाहता येतं. कारण त्या निसर्गातील अनेक घटकांसारख्या काळाच्या ओघात आपलं रूप बदलतात. हो.. असंच म्हणावं लागेल त्यांना. ‘नष्ट होतात’ असं म्हणता येणार नाही. अर्थात त्याच्या काही कलाकृती या टिकाऊ आहेत. त्यांना तो पुन्हा पुन्हा जाऊन पाहतो.. एखाद्या नातलगाला भेटल्यासारखं.

अँडी ज्या पद्धतीने कला घडवतो त्यातून हे कळू शकतं की, मानव किती श्रम आणि वेळ कलानिर्मितीमध्ये घालवतो. कलाकृती बघताना आपण एका दीर्घ प्रक्रियेचा परिणाम बघतोय ही जाणीव होते. (उदाहरणार्थ अँडीचे व्हिडीओ पाहिले तर कळते, कीएका तुटलेल्या झाडाच्या खोडाच्या अंगाला लागून तो लहान-मोठय़ा दगडगोटय़ांची एक िभत उभारतो आहे. काही तासांच्या कामानंतर काही कारणाने ते दगडगोटे घरंगळून पडतात. अँडी काहीसा हताश होतो आणि पुन्हा काही वेळाने ती रचण्यासाठी तयार होतो.) आजकाल आपल्याला त्याची कल्पना येत नाही, कारण आपण कलाकृतीचं प्रदर्शन आणि त्यानंतरच्या सर्व गोष्टींवर भर देत असतो म्हणून.. पण ते असो. त्या श्रमांची कल्पना वस्तूची छापील किंवा डिजिटल प्रतिमा पाहताना येत नाही. ती कल्पना प्रत्यक्ष कलाकृती पाहताना येते. त्यामध्ये गुंतलेला वेळ आणि मानवी कृतीची कल्पना येऊ शकते. अशा पद्धतीने कलाकृतीमधून मानवीपणाच्या पातळीवर अनेक संवेदनांची देवाणघेवाण होते. अँडीचं काम पाहून या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतं की, मानव कलावस्तू म्हणून जे काही निर्माण करतो तेव्हा तो त्याच्या जाणिवा, संवेदना यांच्यानुसार आणि त्याच्या गरजेनुसार एका माध्यमात त्या संवेदनांना आकार देतो. त्यामुळे ती वस्तू पाहून, हाताळून काही विशिष्ट कृती करता येते किंवा कलावस्तूबाबत त्या संवेदनांद्वारे भावना, विचार यांचं प्रक्षेपण आणि ग्रहण होतं.

कला व वस्तूव्यवहार आणि मानवीपणा

कला आणि तिच्या वस्तुकरणाची गरज, निर्मिती/ विक्री हे एक चक्र आहे. उच्च कला आणि तथाकथित नीच कला यांमध्ये ती गरज सारखीच असते. या निर्मितीमध्ये मानवी पातळीवरील निर्मितीक्षमता आणि तिला दिलेलं औद्योगिक रूप या गोष्टी सारख्याच स्वरूपात काम करतात. औद्योगिक स्वरूपात यांत्रिकीकरण हे कमी-अधिक प्रमाणात येतंच. हेच आजच्या काळात डिजिटल वस्तूंबद्दल म्हणता येतं.

मानवी उपभोगाच्या पातळ्या असतात व त्यानुसार वस्तू, कला निर्माण होतात. त्यात भूक भागणं, शरीराचं रक्षण आणि मग नेटकं जगण्यासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टी (त्यात मनासाठी लागणाऱ्या गोष्टीही येतात.) अशा काही साधारण पातळ्या असतात. त्यामुळे अन्नपदार्थ, कपडे, दागिने आणि शरीरावर धारण करण्याच्या अनेक वस्तू, फíनचर, इमारती आणि वापरातील अनेक वस्तू या सर्वाचासुद्धा आपण कलाकृतींसोबत विचार करू, त्यांच्या उपभोगाच्या व्यवहाराकडे पाहू.

वस्तू किंवा कलावस्तूची गरज भासली तर आपण तिच्या विक्री केंद्रात किंवा निर्मिती केंद्रात जातो आणि ती घेऊन येतो. वस्तू एकतर तयार असते किंवा आपण आपल्याला हवी तशी बनवून घेतो. या बनवून घेण्यात आपण ती निर्माण करणाऱ्या निर्मात्याशी संवाद साधतो. त्याचं आणि आपलं मत, आपली गरज, सूचना आदींच्या साहाय्याने ती बनवून घेतो. उच्च कलांबाबत हा संवाद जास्त वैचारिक किंवा संवेदनांच्या, संकल्पनेच्या पातळीवर होतो. इथे इटालियन रेनेसाँ काळातील एक निरीक्षण मजेशीर आहे. त्याकाळी कलाकारांना ‘कलाकार’ असा दर्जा नव्हता. त्यांना कारागीर म्हणूनच वागवलं जायचं. आणि नावाची पाटी, वाढदिवसासाठी सजावट, पोट्र्रेट, कपडय़ाचं डिझाइन अशा अनेक प्रकारची कामं कलाकार करायचे. त्यांची कार्यशाळा असायची. हळूहळू लिओनार्दो, मायकेलँजेलो आदी लोकांमुळे कलाकार हे वैचारिक पातळीवर काम करणारे असतात अशी एक संकल्पना स्थापित झाली आणि कार्यशाळेचा ‘स्टुडिओ’ झाला. आणि कलाकार आणि कारागीर असे भेद आणि स्तर निर्माण झाले. कलाकृतीमध्येही त्यामुळे स्तर निर्माण झाले. कलेतील बौद्धिक गुंतवणुकीने कलाकृती किमतीमध्ये वरचढ ठरू लागली.

वस्तू किंवा कलाकृती यांच्या निर्मितीमध्ये एक अनुभव अपेक्षित असतो. विशेष करून वस्तूमध्ये त्याची वारंवारता अपेक्षित असते. तो अनुभव तिच्या निर्मितीप्रक्रियेशी, त्यातील टप्पे, त्यांची विशिष्ट अवस्था आदी गोष्टींशी घट्ट बांधलेला असतो. त्यामुळे अनुभवाचा अस्सलपणा हा त्या घट्ट बांधणीशी जुळलेला असतो. जेव्हा आपण वस्तू तयार घेतो तेव्हा तिच्या या निर्मितीप्रक्रियेबद्दल आपण खात्री करून घेतो. वस्तू अन्नपदार्थ असेल तर मग जास्तच खात्री करून घेतो. निर्मितीप्रक्रियेतील जरासे बदलही शंका निर्माण करतात. यंत्राचा वापर हा निर्मितीप्रक्रिया आणि तिचा अनुभव यामध्ये काही बदल घडवतो. हाती बनवलेली वस्तू ही जरी पुन्हा पुन्हा बनवली तरी अत्यंत परिपूर्ण नसते. कितीही घडीव असली तरी काही प्रमाणात एकसारखी नसते. ती भास निर्माण करते, की ती एकसारखी आहे. पण ती तशी नसते. तिचं एकसारखं नसणं हाच तिचा नसíगकपणा आहे. याउलट, यंत्राने बनवलेली वस्तू एकसारखीच बनते. त्यामुळे ती हाताने केलेल्या वस्तूसारखीच नसíगक (!) आहे असा भास त्यात निर्माण करावा लागतो. पुन्हा पुन्हा व संख्येने अधिक तसेच मानवी क्षमतेच्या पलीकडे निर्माण करण्याच्या वस्तूंमध्ये मानव यांत्रिकीकरण आणतो.

मानवी क्षमतेने करायच्या कृती या जास्त जलदगतीने आणि सोयीने, सहजतेने करण्यासाठी यंत्राचा वापर माणूस करतो. त्यामध्ये जर संगणकाची ‘विचारशक्ती’ आली तर यंत्र ती कामं अमानवी वाटेल अशा कुशलतेने, वेगाने आणि नेटकेपणाने करतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात आपल्याकडे यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण आलं आणि तेव्हापासून आपल्या समाजात या बदलाबद्दल अनेक संघर्षांचे मुद्दे आले आहेत. उदाहरणार्थ. चटणी बनवायला पाटा- वरवंटा वापरायचा की मिक्सर, कपडे शिवून घ्यावे की तयार, चपला बांधून घ्याव्या की तयार, पीठ तयार घ्यावं की दळण दळून घ्यावं, फíनचर बनवावे की तयार विकत घ्यावे, असे अनेक. हे मुद्दे चíचले जात असताना चव, वस्तूचा घोटीवपणा, सफाई, हाताने केलेल्या वस्तूची गुणवत्ता आणि यंत्राने केलेली वस्तूची गुणवत्ता अशा अनेक मुद्दय़ांची चर्चा झाली. पण हळूहळू शहरीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या रेटय़ापुढे हे वादसुद्धा काळाच्या ओघात मागे पडले. त्यामुळे हे लक्षात आलं नाही, की वर दिलेल्या उदाहरणांत ‘कृती करण्याच्या पद्धतीबद्दल आणि त्यामुळे तिच्या परिणामामध्ये होणाऱ्या बदलाबद्दल’ बोललं जातंय. अनुभवाची गुणवत्ता ही आपण कुठेतरी मनात पद्धतीशी जोडतोच. त्यामुळे सोय म्हणून खायचे तयार पदार्थ आणतो बाहेरून. पण खोलवर मनात तिच्या चवीबद्दल काहीतरी खट्ट होतंच. काही शंका येत राहतात. भूक भागते, पण समाधान झाल्यासारखं वाटत नाही. कारण तयार वस्तूमध्ये मानवीपणाचं, कृतीचं प्रतििबब सहज दिसत नाही.

एकंदरीत असं लक्षात येतं की, आपण परंपरेने अनुभवाच्या अस्सलपणामध्ये मुरलेले आहोत. आपल्याला अस्सल अनुभवाच्या समांतर अनुभव आला तर त्याचं काय करायचं, या प्रश्नाशी आपण झगडतो आहोत. म्हणजे आपल्याला दागिन्यांमध्ये, कपडे, फíनचर, कला आदी गोष्टींमध्ये इमिटेशन चालतं. ते किमतीमध्ये स्वस्त असतं म्हणून अधिकच चालतं. पण खाण्याच्या पदार्थात नाही चालत.

डिजिटल टेक्नॉलॉजीने आपल्या प्रतिमाविश्वात प्रचंड घोळ घातला आहे. त्या प्रतिमांनी आपल्याला वेढा घातला आहे. त्या फोन, टीव्ही, संगणक, जाहिराती सगळीकडून आपल्यामध्ये घुसतात. अस्सल प्रतिमांचा एक समांतर अनुभव या डिजिटल प्रतिमा निर्माण करतात. तो अनुभव फसवा वाटणारा असतो. काहीसा मूळ वस्तूपेक्षा जास्त आकर्षक असा असू शकतो. तो जाणीवपूर्वक तयार केलेला असू शकतो. आपल्याला जर का ते लक्षात आलं, तर आपण प्रतिमेचा अस्सलपणा तपासून पाहण्यात गुंतून जातो. या प्रतिमा बनवण्यासाठीची अवजारं ‘डिजिटल टेक्नॉलॉजी’ आपल्याला देते. या हत्यारांचा आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर समजून झाला तर ठीक, नाहीतर केवळ यंत्राने बनवलेले सौंदर्यानुभव तयार होतात. त्यामध्ये आपल्या सौंदर्यनिकषांचं प्रतििबब पडत नाही. आणि तेच आपल्याला खटकतंसुद्धा.

यंत्र अस्सल मानवी निर्मितीसारखा अनुभव निर्माण करतं आणि तो ‘सौंदर्यानुभव’ या क्षेत्रातला अनुभव असेल तर आपली पंचाईत होते. कारण मानवी कृती, श्रम, प्रयत्न यांनी निर्मित सौंदर्यानुभव हाच आपण अस्सल मानत आलो आहोत. त्याला समांतर अनुभवाचं काय करायचं, हे आपल्याला कळत नाही.

‘थ्री-डी िपट्ररने मानवी अवयवाची निर्मिती’ अशा आशयाची बातमी आपल्याला आनंद व आश्चर्याचा अनुभव देते. पण त्यातून कोणी शिल्प निर्माण केलं तर त्याकडे आपण सौंदर्यानुभव म्हणून पाहू का, हा प्रश्न आहे.

मानवी उत्क्रांतीत असे अनेक टप्पे आले असतील- जेव्हा आपल्याला नवीन साधनं, माध्यमं मिळाली आणि आपले पहिले निकष आपल्याला सोडावे लागले. पण डिजिटल टेक्नॉलॉजीचा सर्वात गंभीर परिणाम हा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमाविश्वाचा आहे. हे प्रतिमाविश्व बऱ्याच वेळा  ‘अस्सल प्रतिमेपेक्षा जास्त आकर्षक’ प्रतिमा बनवतं. त्या आकर्षकपणाचे आपले निकष हे अशाच डिजिटल माध्यमातून पाहिलेल्या प्रतिमेतून निर्माण झालेले असतात, असू शकतात. परिणामी ‘अनुभवासाठी वास्तव हा एक मुख्य आणि महत्त्वाचा स्रोत आहे’ ही गोष्ट कळत नाही.. लक्षात राहत नाही. आणि डिजिटल प्रतिमा तर झपाटय़ानं वास्तवाची जागा घेत आहेत.. अनुभवाचा स्रोत होत आहेत. वास्तविक डिजिटल टेक्नॉलॉजी ही मानवी नात्यांवर कसा परिणाम करत आहे याची नेहमी चर्चा होते. तिथेही हे लक्षात घ्यायला पाहिजे की, प्रत्यक्षातील मानवी संवाद हा ‘वास्तव’ आहे- त्याकडे पाठ फिरवून डिजिटल टूल्सच्या द्वारे मिळणाऱ्या अनुभवात आजचा संवाद बुडून गेलाय, ही तक्रार असते. म्हणजे मुद्दा तोच आहे- ‘वास्तव की डिजिटल?’ (पर्यायानं वास्तवाचं आज सहज उपलब्ध असलेलं ‘इमिटेशन’!) यांतून निवड करायची गरज आहे.

आपल्या नकळत डिजिटल प्रतिमा या आपल्या मनात भावनांद्वारे शिरतात आणि त्यांची जागा आपल्या अनुभवविश्वात पक्की करून घेतात. यामुळे प्रतिमांचा ‘अस्सलपणा’ हा मुद्दा आता महत्त्वाचा राहिलेला नाही. त्यांचा ‘आकर्षकपणा’ हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू लागला आहे. आणि त्यामुळे प्रत्यक्षातील अस्सल अनुभवासारखा दिसणारा हा समांतर, काहीसा फसवा अनुभव हा अस्सल म्हणून समोर येतोय. मला माझ्या मनातल्या अस्सल अनुभवाच्या ओढीचं काय करायचं, हे कळत नाही. अस्सल अनुभव कलेतून मिळावेत या इच्छेचं काय करायचं, ते कळत नाही. कदाचित डिजिटल पिढी यात भेद करू शकत असेल आणि मी डिजिटल पिढीच्या आधीचा असेन. आता निर्णय मला करायचाय.