scorecardresearch

एखादी पणती, मिणमिणती…

दुर्गम ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून, त्यांच्यातून सामाजिक बांधिलकी मानणारे जबाबदार प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे मोलाचे काम काही संस्था नेटाने करीत आहेत. या उपक्रमांना ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

दुर्गम ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून, त्यांच्यातून सामाजिक बांधिलकी मानणारे जबाबदार प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे मोलाचे काम काही संस्था नेटाने करीत आहेत. या उपक्रमांना ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यातूनच उद्याचे प्रशासक निर्माण होणार आहेत, काही झालेही आहेत. त्याची ही कहाणी..
‘जालनिशी’च्या माध्यमातून जगाच्या पाठीवर मराठीच्या ‘पाऊलखुणा’ उमटू लागल्यामुळे, मराठी मातीत उमललेल्या नात्यांचे बंध आणखी घट्ट होऊ लागले आणि मराठीपण बहरू लागले. आजपर्यंत केवळ शहरी, नागरी आणि महानगरांच्या वाटय़ाला आलेली संपर्क यंत्रणा ग्रामीण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या रांगडय़ा मातीतही बुद्धीची खाण आहे, याचा प्रत्यय येऊ लागला. गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाच्या लाटा उसळू लागल्या आहेत. शिक्षण ही केवळ धनदांडग्यांची मक्तेदारी ठरावी इतका खर्च यत्तेच्या प्रत्येक पायरीगणिक वाढू लागल्याने शिक्षणाची कवाडे खुली झाली असली तरी गरीब, सामान्य माणसाला या कवाडांच्या किलकिल्या फटीतून केवळ आत डोकावण्याचेदेखील धाडस होणे अशक्य ठरेल की काय, अशी भीतीही वाढत चालली होती. एकेकाळी,  ‘विद्यादान हे श्रेष्ठ दान’ हा समज समाजात रूढ होता. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात महान काम करणाऱ्यांचा ‘तपस्वी’, ‘महर्षी’ अशा उपाधींनी सन्मान होत असे. त्यांना समाजात मान आणि आदराचे स्थानही मिळत असे. पण शिक्षणाचे बाजारीकरण वाढू लागले आणि ‘महर्षी’च्या जागा ‘सम्राटां’नी घेतल्या. आता शिक्षणमहर्षी काळाआड गेले आणि गावोगावी शिक्षणसंस्थांची साम्राज्ये उभी राहिली. शिक्षणसम्राटांचे पेव फुटले आणि शिक्षणसंस्थांचा पसारा जेवढा मोठा, तिथले शुल्क जेवढे मोठे, तेवढा तेथील शिक्षणाचा दर्जा महान, असे समीकरण होऊ लागले..
या कोलाहलात, ‘गुरू’ ही संकल्पना आमूलाग्र बदलत गेली आणि हाती पैसा नसेल तर शिक्षण घेणे शक्य नसल्याच्या गंडभावाने पछाडलेला गरीब वर्ग बुद्धिमत्ता असतानाही गरजेपुरते आणि पोटापुरते शिक्षण घेण्यासाठी नाइलाजाने संघर्ष करत राहिला. पैसा फेकून उच्च शिक्षणाच्या जागा बळकावणाऱ्या धनिकांशी स्पर्धा करण्याची शक्ती या वर्गाकडे नसल्याने, विशिष्ट पदव्या आणि अभ्यासक्रमांची कवाडे या वर्गासाठी केवळ किलकिलीच राहिली. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने अनेक शैक्षणिक योजना आखल्या आणि जाहीर केल्या. या योजनांतून गरीब, उपेक्षित आणि वंचित वर्गातील बुद्धिमंतांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा होती. पण तितक्या सक्षमपणे या योजना राबविल्या गेल्या नाहीत.
जेव्हा आर्थिक निकषांवरील सामाजिक दरी रुंदावत जाते, तेव्हा उपेक्षितांच्या वेदनांमुळे कळवळणारी मने सजग होतात. आणि आपली सारी शक्ती उपेक्षितांच्या पाठीशी उभी करतात, हा जगभरातील इतिहास आहे. समाजाच्या सर्व अंगांत, सर्व क्षेत्रांत, वर्तमानातही हेच घडताना दिसते. वंचितांवरील अन्यायाविरुद्धच्या संघर्षांतून, वंचितांच्या हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या लढय़ातून परिवर्तनाची क्रांती जन्म घेते आणि वंचितांना आत्मभान प्राप्त होते. आपल्या शक्तीच्या जाणिवेने त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि शहरी संस्कृतीत रुजलेल्या धनदांडग्या प्रवृत्तींशी बौद्धिक स्पर्धा करण्यासाठी हा वर्ग सहजपणे सरसावतो. शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून या परिवर्तनाचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटू लागले आहे. ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या अंगी हाच आत्मविश्वास रुजविण्याचे आणि फुलविण्याचे अनेक प्रयोग जागोजागी दिसू लागले आहेत.
आसपासच्या झगमगाटी रोषणाईतदेखील, एखाद-दुसरी पणती कुठल्या तरी कोपऱ्यात निरपेक्षपणाने संथपणे तेवत राहावी, तसे काहीसे शिक्षण क्षेत्रातील साम्राज्यांच्या पसाऱ्यातही उमटू लागले आहे. या पणत्या मिणमिणत्या आहेत, पण स्वयंप्रकाशी आहेत. त्यांच्या मंद प्रकाशाची तिरीप कुठल्या तरी कोपऱ्यावर स्थिरावते आणि तो कोपरा उजळून निघतो.. सम्राटांच्या साम्राज्यातदेखील आजही ‘महर्षी’, ‘कर्मवीर’ आहेत, याची जाणीव समाजातील या वर्गाला सुखावते आहे. आधाराच्या भावनेने  हा वर्ग आता आश्वस्त होऊ लागला आहे. ग्रामीण भागांतील, उपेक्षित समाजातील सामान्य कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या मुलांच्या अंगी आत्मविश्वास रुजविण्याचे असंख्य प्रयोग आता गावोगावी सुरू असून, या कुटुंबांची नवी पिढी शैक्षणिक सक्षमतेच्या दिशेने विश्वासाने वाटचाल करू लागली आहे.

‘ताई, मी कलेक्टर व्हयनू’ अशी एक अत्यानंदाची आरोळी ११ मे २००५ या दिवशी खान्देशातल्या राजेश पाटील नावाच्या तरुणाने ठोकली, तेव्हा ‘आयएएस’ परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी नोटीस बोर्डाभोवती जमलेली गर्दी अचंबित झाली होती. लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पाडून आपण एक इतिहास घडविला आहे, याचा अभिमान त्या शब्दांतून ओसंडून वाहात होता. जळगाव जिल्ह्यातील ताडे नावाच्या एका खेडय़ात, जगण्याच्या संघर्षांत रोजचा दिवस पणाला लावणाऱ्या एका गरीब कुटुंबात जन्मलेला राजेश ‘आयएएस’ होईल, असे त्याच्या आईबापाला, गावाला किंवा समाजाला राजेशच्या शालेय जीवनकाळात स्वप्नातही वाटले नसेल. लहानपणी शाळा शिकताना थंडीवाऱ्यातून आणि उन्हाच्या कडाक्यातून सकाळी घराबाहेर पडून पत्र्याच्या डब्यातून घरोघरी पाव विकणाऱ्या राजेशला विद्यार्थिदशेतच चोरीमारी, जुगारासारख्या गोष्टींचा नाद लागला. घरची गरिबी आणि दुर्मिळपणे दिसणारा पैसा हेच यामागचे कारण होते. राजेशने शाळेत केवळ उनाडक्या केल्या, त्यासाठी आईचा सपाटून मारही खाल्ला, पण आपल्या पोटच्या मुलाला योग्य मार्गावर आणण्याची जिद्दही त्या आईच्या मनात जिवंत होती. तिने राजेशच्या मनात शिक्षणाचे अंकुर उमलते ठेवले आणि राजेशच्या जगण्याला वळण मिळाले. उनाड, वाया गेलेलं पोर पुन्हा रुळावर आलं आणि शिकता शिकता केलेल्या अवांतर वाचनातून मनाचा विकास होत गेला. दहावीला चांगले गुण मिळाल्यानंतर राजेशचा आत्मविश्वास वाढला आणि हे उनाड पोर बघता बघता कलेक्टर झालं.. कुटुंबासाठी आईबापांनी खाल्लेल्या खस्तांची जाणीव त्याच्या मनात जिवंत ठेवण्याच्या आईच्या प्रयत्नांना आणि राजेशच्या जिद्दीला असं यश मिळालं..
जळगाव जिल्ह्यातील एका खेडय़ात जन्मलेला, दररोज दहा-बारा किलोमीटर पायपीट करून शाळेला जाणारा, दप्तराच्या कोपऱ्यात ताईनं दिलेला एक रुपया जपून सांभाळणारा, पाव विकून कमाई करत शिक्षण पूर्ण करणारा आणि परिस्थितीच्या रेटय़ातून कधीतरी वाकडय़ा वाटेलाही वळलेला हा मुलगा आज ओरिसामधील कोरापूत जिल्ह्याचा कलेक्टर झाला आहे. आदिवासी लोकसंख्या असलेल्या या भागात नक्षली कारवायांनी टोक गाठले आहे. ग्रामीण जनतेच्या जगण्याशी नाळ जुळलेल्या राजेशने तेथील गरिबांशी नाते जोडले आणि जिल्ह्यात परिवर्तनाचे पर्व उजाडू लागले. तेथील आदिवासी पाडे आता राजेशच्या रूपाने तेवणाऱ्या एका पणतीच्या आधाराने उजळू लागले आहेत.
उण्यापुऱ्या तीस वर्षांच्या जगण्यातील ही अमाप अनुभवांची शिदोरी असंख्य मनांमध्ये आत्मविश्वास फुलविणारी ठरली आहे. आयएएस परीक्षेच्या निकालाच्या दिवशीचे त्याचे ते उद्गार आज ग्रामीण भागातील असंख्य तरुणांचे प्रेरणास्रोत बनले आहेत. ‘ताई, मी कलेक्टर व्हयनू’ या  राजेशने लिहिलेल्या पुस्तकाची आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून पारायणे होत आहेत. कलेक्टर राजेश पाटीलपासून प्रेरणा घेत ग्रामीण भागातील अनेक तरुण आज लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करण्यास सरसावले आहेत. गरिबी माणसाला कशी असहाय्य बनवते आणि चोहोबाजूंनी होणाऱ्या शोषणाचा तो कसा बळी ठरतो, हे जवळून अनुभवल्यामुळे; सामाजिक विषमतेत भरडून निघणाऱ्या गरीब आणि ग्रामीण मुलांमधील जगण्याची ऊर्जा नष्ट होऊ नये त्यांना दिलासा मिळावा, या उद्देशानं राजेशनं लिहिलेलं हे पुस्तक आज खान्देशातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासाचा मंत्र ठरले आहे.
सातवी ते दहावीपर्यंतच्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजावेत, स्पर्धेत उतरण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी जळगाव जिल्ह्यात आत्मविश्वास व प्रेरणा अभियान राबविले गेले आणि राजेशच्या पुस्तकाची पारायणे सुरू झाली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे ४० हजार मुलांना मूल्यशिक्षणाचे पाठ देणारी एक अभिनव योजना अलीकडेच राबविली गेली. राजेशचे ‘ताई, मी कलेक्टर व्हयनू’ हे पुस्तक मूल्यशिक्षणाचे पाठ देण्यासाठी निवडण्यात आले. मारवड येथील प्रदीप साळुंखे नावाच्या तरुणानेदेखील प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत देदीप्यमान शैक्षणिक यश संपादन केले. ‘धडपडणाऱ्या तरुणाईसाठी’ या त्याच्या पुस्तकाचीही या जिल्ह्यातील सुमारे ६०० शाळांमध्ये पारायणे सुरू झाली आणि मुलांना आत्मविश्वासाचा मंत्र गवसला..
महाराष्ट्रातील तरुणाईने तर राजेशच्या पुस्तकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. परिस्थितीला शरण न जाता संघर्ष करण्याची जिद्द बाळगणारा राजेश पाटील हा ग्रामीण भागातील गरीब मुलगा तमाम तरुणाईचा ‘आयकॉन’ बनला..

धनदांडग्यांच्या जोरावर उघडली गेलेली शिक्षणाची साम्राज्ये फोफावत असतानादेखील या क्षेत्रात काम करणारा एखादा तपस्वी अशा समाजाचा आधार बनतो. जळगाव जिल्ह्यात अशी एक संस्था गेल्या काही वर्षांपासून उपेक्षित, वंचित आणि गरीब मुलांना शैक्षणिक आधार देत आहे. राजेश पाटीलच्या यशात या संस्थेचाही मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील बुद्धिमत्ता शोधून ती घासूनपुसून लख्ख करण्याचे आणि सम्राटशाहीच्या झगमगाटातही ती बुद्धिमत्ता उजळलेली दिसावी, यासाठी ही संस्था झटून काम करते. ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ हे या संस्थेचे नाव गेल्या काही वर्षांतील कामातून सार्थ ठरले आहे. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये स्पर्धा परीक्षा, ग्रामीण विकास, मनोविकास आदींचा अनुभव घेतलेले यजुर्वेद्र महाजन हे या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. माहितीचा आणि प्रेरणांचा अभाव, आर्थिक स्थिती अशा कारणांमुळे ग्रामीण-आदिवासी भागातील हुशार मुलेही गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतात, ही जाणीव खेडय़ातून पुण्यात आल्यानंतर फारच बोचू लागली. आणि सधन कुटुंबांतील मुलांना मिळणारं शिक्षण ग्रामीण गरिबांनाही मिळावं, यासाठी काहीतरी करायचं ठरवून ते पुन्हा जळगावात आले. गरिबीमुळे येणारा मानसिक न्यूनगंड हा ग्रामीण भागातील मुलांच्या विकासातील मोठा अडसर असल्याने, मुलांच्या मनात आत्मविश्वास जागविण्याची गरज आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि यजुर्वेद्र महाजन हा तरुण झपाटल्यासारखा खेडोपाडी प्रवास करू लागला. मुलांनी शिकावे, त्यांच्या पालकांनी मुलांमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागी करावी, यासाठी खान्देशातील शाळाशाळांमध्ये आजवर जवळपास एक हजार व्याख्याने त्यांनी दिली. अगदी पाचसहाशे वस्तीच्या गावातही प्रत्येक कुटुंबापर्यंत यजुर्वेद्र महाजन हे नाव पोहोचलं आणि शिक्षणाचं महत्त्व, आत्मविश्वास, सरकारी योजना इथे कुणाच्या गावीही नाही, हे महाजन यांना जाणवलं. आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या वडील पिढीकडून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणे शक्य नाही, हे ओळखून पालक आणि विद्यार्थ्यांशीही संवाद सुरू झाला आणि जळगाव जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील एक पणती उजळू लागली..
आदिवासी समाजातच शिक्षणाचा अभाव असल्याने, मुलांची तयारी करून घेणे गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांची उमेद जागी झालेल्या आदिवासी मुलांना पाचवीपासूनचे शिक्षण देऊन त्यांचा पाया पक्का करण्यावर ‘दीपस्तंभ’ने भर दिला. उद्या याच विद्यार्थ्यांमधून जबाबदार अधिकारी निर्माण होतील. कारण त्यांचे पाय जमिनीवरच असतील.. केवळ यशस्वी होणे पुरेसे नाही, तर ते ‘बांधिलकी’ही मानतील, कारण परिस्थितीचे चटके सोसणाऱ्यांची मनेच संवेदनशील असतात. या मनांची मशागत करण्याचे काम दीपस्तंभने हाती घेतले आहे. दीपस्तंभच्या निवासी मार्गदर्शन शिबिरांमध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून अनेक गरीब, आदिवासी मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. दर वर्षी या संस्थेत जवळपास दोन हजार मुले शिकतात, त्यापैकी शंभर-दीडशे मुले आदिवासी समाजातील असतात. आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलांचा निवास, भोजन आणि अन्य खर्च संस्थेतूनच केला जातो. अनेक मुलांना शैक्षणिक शुल्क भरणेदेखील परवडत नाही. अशा मुलांसाठी दीपस्तंभने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली. शंभर आश्रयदात्यांकडून त्यासाठी सुमारे ४० लाखांचा निधी उभा राहिला. यजुर्वेद्र महाजन यांना ठिकठिकाणी व्याख्यानांसाठी मिळणारे मानधनही या निधीतच जमा होते.
गेल्या सात वर्षांत दीपस्तंभच्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बदल दिसू लागला. संस्थेचे ५० कार्यकर्ते समर्पण भावनेने या कामात उतरले आहेत. हे कार्यकर्ते शहर सोडून गावात परतल्याने, ग्रामीण भागातील वास्तव्यामुळे तरुणांमध्ये येऊ पाहणारे नैराश्य पुसले जात आहे. आता संस्थेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या पदांवरील शंभर अधिकारी दर वर्षी संस्थेत येतात. मुलांशी संवाद साधतात, शिकवतात आणि व्याख्यानेही देतात.
‘दीपस्तंभ’च्या या भक्कम आधारामुळे गेल्या सात वर्षांत सुमारे साडेचारशे मुले राजपत्रित अधिकारी दर्जाच्या सेवेत दाखल झाली आहेत. खान्देशाच्या खेडय़ापाडय़ातील मुलंमुली स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भविष्याची स्वप्ने पाहू लागली आहेत. आर्थिक अडचण ही अनेकांची सामायिक समस्या आहे. कुणाचे आईबाप मोलमजुरी करणारे, घरातले कुणी आजारपणाने अंथरुणाला खिळलेले, कुणी व्यसनात बुडालेले, कुणी आणखी काही कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेले किंवा कुणाची कुटुंबव्यवस्थाच विस्कटल्याने, उमेद हरवलेले अनेक तरुण आता या स्वप्नांच्या आधाराने उभारी घेऊ पाहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची िहमत बाळगणाऱ्या या ‘नाही रे’ वर्गातील तरुणांना ‘आहे रे’ वर्गाच्या जवळ आणण्याचे काम ग्रामीण भागात उभे राहिले आहे..

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातलं सामोडे या गावाबाहेरचं इंदिरा नगर, म्हणजे स्थानिक भाषेत ‘भिलाटी’! एका लहानशा गावापासूनही दूर असलेली ही वस्ती शिक्षण आणि सुविधांपासून तर आणखीनच दूर होती. दिवसभर कुणाची तरी चाकरी आणि रात्री पोटातली भूक मारण्यासाठी दारू पिऊन झोप, असा दिनक्रम! याच वस्तीत ७ जानेवारी १९८८ ला राजेंद्र भारुडचा जन्म झाला. तो आईच्या पोटात असताना वडिलांचा मृत्यू झाल्याने, ‘पोर पाडून घे’ असा सल्ला घरच्यांनी दिला, पण राजेशच्या मावशीने राजेंद्रच्या आईला आधार दिला. ‘हे पोर देवाची देणगी आहे, त्याला मी सांभाळेन’ , असा शब्द तिने दिल्याने राजेंद्रला जग दिसले. राजेंद्रची आई तेव्हा संसार चालवण्यासाठी वस्तीतच दारू विकायची. लहानगा राजेंद्र रडायला लागला, की गिऱ्हाईकेच त्याच्या तोंडात दारूचे थेंब टाकून गप्प करायची.. पुढे जिल्हा परिषदेच्या शाळेत हेडमास्तरांना त्याची हुशारी जाणवली आणि त्याला शिक्षणासाठी मदतीचा हात मिळाला. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्याच्या हुशारीची चमक दिसू लागली आणि हे पोरगं देवाची देणगी आहे, हे मावशीचे शब्द खरे ठरणार या भावनेने आई सुखावली.. त्याला खूप शिकवायचं, हेही तिनं मनोमन ठरवून टाकलं.
अक्कलकुवा, जालना, जयपूर असा प्रवास करत राजेंद्रनं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि बारावीच्या गुणांच्या आधारावर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. एमबीबीएस झाल्यानंतर एक वर्ष ग्रामीण भागात काम करताना त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि कठोर परिश्रम, जिद्द आणि जाणीव यांच्या जोरावर डॉ. राजेंद्र भारुड नावाचा भिल्ल समाजातील हा तरुण ‘आयपीएस’ झाला. आता दीपस्तंभच्या मार्गदर्शन वर्गात आपल्यासारख्या अनेक तरुणांची जिद्द फुलविण्याच्या कामात त्याचाही वाटा असतो..
नावाला ओळख मिळाली की आत्मविश्वास वाढतो, कर्तृत्वाचे पंख भराऱ्या घेऊ लागतात. तोवर नावालादेखील न्यूनगंडाची काजळी धरलेली असते.. ग्रामीण भागातील अनेक तरुण या काजळीमुळे काळवंडले आहेत. अशा वेळी एखादा दीपस्तंभ दिसू लागतो आणि पुढच्या प्रवासाला दिशा सापडते. धरणगाव तालुक्यातील दोनगाव या खेडय़ात अत्यंत गरिबीत जगणाऱ्या शेतमजूर कुटुंबातील लीलाधर नावाचा तरुण बी.ए. झाला आणि अथक प्रयत्नांनंतर पोलीस उपनिरीक्षक झाला. अशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या लीलाधरने मराठी व्याकरणावर पुस्तक लिहिले.. शेतमजूर शिवाजी पाटील यांचा मुलगा- लीलाधर लेखक झाला.. पीएसआय झाला. आपल्या आयुष्यातील एक सुंदर क्षण गवसला, ही भावना त्याला नेहमीच सुखावत असते..
धरणगाव तालुक्यातीलच रेल नावाच्या हजारभर वस्तीच्या गावातील भारती पाटील या महिलेला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, पण जिद्द जागी होती. आज समाजकल्याण खात्यात अधिकारीपदावर काम करताना त्यांना आत्मविश्वासाचीही साथ असते..
ग्रामीण भागाच्या या शैक्षणिक यशोगाथेमध्ये अशी अनेक नावे झळकली आहेत, आणि झळकणार आहेत..

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असंख्य तरुणांच्या मनात आज स्पर्धा परीक्षांच्या यशाची जिद्द डोकावताना दिसते. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या लोकसेवा आयोग परीक्षांच्या निकालात मराठी तरुण झळकला. महानगरांतील आर्थिक सुस्थितीतील मुलांबरोबरच ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब, उपेक्षित समाजातील तरुणांनीही सेवा परीक्षेतील यशाची शिखरे संपादन केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या यशाला आता ग्रामीण चेहरादेखील मिळू लागला आहे. हिमायत नगर, फलटण, पाचोरा, जळगाव, भुसावळ, हिंगणघाट, सटाणा, कळवण, धडगाव अशी गावे स्पर्धा परीक्षांच्या नकाशात दिसू लागली आहेत.. अनेक तरुण मुले सेवेत दाखलही झाली आहेत, अनेकांची तयारी सुरू आहे..
ग्रामीण महाराष्ट्राचा बुद्धिमान चेहरा आता उजळला आहे. लोक प्रशासनातील सामान्यांचा सहभागही वाढतो आहे. गरिबी आणि उपेक्षेच्या अनुभवातून संघर्ष करत येथवर पोहोचलेल्या या तरुणांना जबाबदारीचे नेमके भान असेल, आणि त्यामुळेच लोकाभिमुख प्रशासन या सरकारी शब्दाला यापुढे खरा अर्थ प्राप्त होईल.

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ ( Ls-2012-diwali ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Some social organisations are creating responsible government administrative officer from the rural maharashtra

ताज्या बातम्या