एक एप्रिल या दिवशी सहसा लोक एकमेकांशी वागताना जरा सांभाळूनच वागतात. कारण, या दिवशी कोण, कोणाला, कधी आणि कशी टोपी घालेल अर्थात वेड्यात काढेल याचा काहीच नेम नसतो. पण हा दिवस नक्की काय आहे, याच दिवशी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी का उत्तेजन दिलं जातं अशा अनेक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? काय म्हणतात, नाही…. चला तर मग पाहुया एप्रिल फूलच्या दिवसाशी संबंधित असलेल्या काही मजेदार गोष्टी…

१. एप्रिल फूलच्या दिवसाची सुरूवात
याविषयी अनेक मतंमतांतरं आहेत. पण हा दिवस साजरा करायला १५८२ मध्ये सुरूवात झाली असं म्हणतात. आधुनिक काळात आपण जे कॅलेंडर वापरतो त्याला ग्रेगेरियन कॅलेंडर म्हणतात. पण हे कॅलेंडर पाश्चिमात्य देशांमध्येही आधी कायमचं रूढ नव्हतं. याआधी वापरण्यात येणाऱ्या कॅलेंडरला ज्यूलियन कॅलेंडर म्हणतात. युरोपमध्ये १५८२ मध्ये ज्यूनियन कॅलेंडर बदलून ग्रेगेरियन कॅलेंडर रूढ झालं. नवं कॅलेंडर रूढ होऊनसुध्दा युरोपमध्ये जे लोक जुनं कॅलेंडर वापरत होते त्यांच्या् होणाऱ्या गोंधळाचं मजेशीर वर्णन करण्याच्या हेतूने एप्रिल फूलचा दिवस रूढ झाला असं सांगण्यात येतं.

२. आणखी एक ‘फूल’ दिवस
स्पेन आणि दक्षिण अमेरिकेमध्ये परंपरागतरीत्या १ एप्रिलला हा दिवस साजरा केला जात नाही. तिथे २८ डिसेंबरला असा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.

३. ‘एप्रिल फूल’चा दिवस ब्रिटिशांनी लोकप्रिय केला
एप्रिल फूलचा दिवस लोकप्रिय करण्यामागे ब्रिटिश जनता आहे. अठराव्या शतकापासून ब्रिटिश जनतेत हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.

४. एप्रिल फूलचा ‘स्विडिश’ जोक
१९६० च्या दशकात स्वीडनमध्ये फक्त एकच टीव्ही चॅनल होतं. त्याचं प्रक्षेपण ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात केलं जाई. या चॅनलने एका वर्षी आपण रंगीत होणार असल्याचं जाहीर केलं. आपल्या टीव्ही स्क्रीनसमोर एक मोठा साॅक्स लावला की हे चॅनल रंगीत दिसणार असल्याचं चॅनलने जाहीर केलं. स्वीडनमधले कितीतरी लोक या जोकला बळी पडले.

५. बीबीसीवर ‘एप्रिल फूल’
१९५० च्या दशकात बीबीसीने स्वित्झर्लंडमध्ये नूडल्सची शेती होत असल्याची बातमी एप्रिल फूलच्या दिवशी प्रसारित केली होती.

६. ‘टाको लिबर्टी बेल’
भारतातल्या शहरांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ‘टाको बेल’ या अमेरिकन फास्टफूड चेनने अनेकदा आपण अमेरिकेची ‘लिबर्टी बेल’ खरेदी करत असून त्या बेलचं नाव आपण ‘टाको लिबर्टी बेल’ असं करत असल्याचं जाहीर केलं. लिबर्टी बेल ही एक खरीखुरी घंटा असून अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाच्या इतिहासाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे.

७. गूगल ‘माईक ड्राॅप’
गेल्या वर्षी गूगलने ‘माईक ड्राॅप’ हे मजेदार फीचर आणलं होतं. यावर क्लिक केल्याने तुम्हाला कार्टून कॅरेक्टरतं अॅनिमेशन असणारी ई-मेल पाठवण्यात येत होती. या फीचरचा वापर करत बिझनेस ई-मेल पाठवणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

८. जीमेल एप्रिल फूल
गूगलने ‘जीमेल’या त्यांच्या सर्व्हिसची सुरूवात १ एप्रिल २००४ साली केली होती. त्यावेळी ईमेल ‘इनबाॅक्स’ची क्षमता १० एमबी च्या आसपास असायची. अशावेळी १ जीही मेलबाॅक्स क्षमता देणारी जीमेल हा त्यावेळी गूगलने केलेला एप्रिल फूलचा जोक आहे अशी समजूत बऱ्याच जणांची झाली होती.

९. ‘नासा’चा एप्रिल फूल प्रँक
२००२ मध्ये ‘नासा’ने चंद्राचे काही फोटो प्रकाशित करत चंद्र हा चीजचा बनलेला असल्याचे पुरावे आपल्याला मिळाल्याचं जाहीर केलं होतं

१०. ज्वालामुखी जोक
१९७४ साली अलास्कामधल्या एका ज्वालामुखीमध्ये एका माणसाने ७० टायर्स आणून जाळले. त्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये हा ज्वालामुखी पुन्हा फुटत असल्याची समजूत पसरत घबराट माजली.

११. ‘एप्रिल फूल’ची पद्धत
उच्चभ्रू फ्रेंच लोकांनी आपल्या या अश्वानी देशबांधवांना ‘मूर्ख- फूल्स’ ही उपाधी दिली आणि जे लोक जुन्या कॅलेंडरनुसार १ एप्रिलला नववर्ष साजरे करत राहिले त्यांना ‘एप्रिल फूल’ संबोधल गेलं. अशा तऱ्हेने १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ करण्याची पद्धत हा हा म्हणता युरोपभर आणि कालांतराने इतर देशांत पसरली.

१२. ‘एप्रिल फिश’
आजही फ्रेंच मुले आपल्या शाळेतील मित्रांच्या नकळत त्यांच्या पाठीवर कागदाचा मासा करून चिकटवतात. जेव्हा त्या मुलाच्या हे लक्षात येते तेव्हा सगळी त्याला ‘एप्रिल फिश’ म्हणून चिडवतात.

१३. अंगावर पीठ फेकून खोडय़ा
पोर्तुगालमध्ये लेंटच्या (ईस्टरपूर्वीचा ४० दिवसांचा काळ) आधीचा रविवार आणि सोमवार हा एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. त्या वेळी ते एकमेकांच्या अंगावर पीठ फेकून खोडय़ा काढतात.

१४. १ एप्रिल नाही तर १ मे
डेनमार्कमध्ये १ मे हा विनोद दिवस मानला जातो व त्याला ‘मे कॅट’ असे म्हणतात. स्वीडन व इतर स्कॅन्डिनेव्हियन देशांत इतर देशांप्रमाणे १ एप्रिल हाच एप्रिल फूल म्हणून साजरा करतात.

१५. दोन दिवस ‘एप्रिल फूल डे’ 
स्कॉटलॅण्डमध्ये दोन दिवस ‘एप्रिल फूल डे’ साजरा केला जातो. दुसरा दिवस ‘टॅली डे’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी एखाद्याच्या पाठीवर कागदावर एखादी मजेदार गोष्ट लिहून चिटकवत हा दिवस साजरा केला जातो. यामध्ये ‘किक मी’, ‘आय एम मॅड’ असे संदेश असणाऱ्या चिठ्या एखाद्याच्या पाठीवर त्याच्या नकळत चिटकवल्या जातात.