News Flash

आजपासून Google Photos ची मोफत सेवा बंद; जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

किती स्टोरेज वापरलं कसं कळणार?, आधीच्या फोटोंचं काय होणार? या प्रश्नांची उत्तरे...

गुगल फोटोजअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनलिमिटेड फ्री क्लाउड स्टोरेजवर १ जूनपासून म्हणजेच आजपासून बंधनं घालण्यात आली आहे. गुगलने मागील वर्षीच यासंदर्भातील घोषणा केली होती. आम्ही गुगल फोटो ड्राइव्ह मॉनेटाइज करणार आहोत म्हणजेच त्यासाठीही शुल्क आकारणार आहोत हे कंपनीने आधीच स्पष्ट केलं होतं. नव्या नियमांनुसार क्लाउड स्टोरेज सेवेसाठी आता वापरकर्त्यांना पैसे भरावे लागणार आहेत. आजपासून हा नियम लागू होत असून या नवीन नियमामुळे अनेकांना आता आपल्याला गुगल स्टोअरवरील फोटो आणि व्हिडीओ पाहता येणार नाही अशी भीती वाटत आहे. यापूर्वी गुगल फोटोवर सेव्ह होणाऱ्या फोटोंचं काय होणार असंही अनेकजण विचारत आहेत. जाणून घेऊयात काय आहेत हे नवे नियम

ज्या वापरकर्त्यांनी गुगल फोटोवर १५ जीबीपेक्षा कमी मीडिया कंटेंट स्टोअर करुन ठेवला आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही. ज्या वापरकर्त्यांनी १५ जीबीपेक्षा अधिक जास्त माहिती गुगल फोटोजच्या माध्यमातून स्टोअर केली असेल त्यांना आता डेटा परत न मिळण्याची चिंता वाटत आहे. मात्र यापैकी अनेकांनी गुगल फोटोजवरील आपले फोटो आणि व्हिडीओ खूप आधीपासूनच डाऊनलोड करुन सेव्ह करण्यास सुरुवात केलेली.

गुगल फोटोजची सुरुवात सहा वर्षांपूर्वी म्हणजे २८ मे २०१५ रोजी झाली होती. ही गुगलकडून देण्यात येणारी मोफत फोटो शेअरिंग आणि स्टोरेज सेवा होती. तेव्हापासून अगदी कालपर्यंत ही सेवा गुगलचं अकाऊंट असणाऱ्या प्रत्येकाला मोफत वापरासाठी देण्यात आली होती. यामध्ये हाय रेझोल्यूशोन फोटोंपासून व्हिडीओपर्यंतचा कंटेट अपलोड करुन क्लाउड स्टोरेजच्या माध्यमातून सुरक्षित ठेवता येत होता. मात्र या महिन्यापासून गुगल प्रत्येक वापरकर्त्याला केवळ १५ जीबी क्लाउड स्पेस मोफत देणार आहे. यामध्ये गुगलच्या सर्व प्रोडक्टसाठी समान वाटप करुन स्पेस उपलब्ध करुन दिली जाईल. यात अगदी फोटोंपासून ईमेलपर्यंत सर्व सेवांचा समावेश असेल. आधीच्या फोटोवर नवीन धोरणांचा काहीच परिणाम होणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

आजपासून १५ जीबीपेक्षा अधिक माहिती गुगल फोटोजच्या माध्यमातून सेव्ह करायची असेल तर वापरकर्त्यांना गुगल वन सेवेचं सबक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. गुगल वनचे प्लॅन्स कसे आहेत जाणून घेऊयात…

गुगल वन सबक्रिप्शन प्लॅननुसार १०० जीबी स्टोरेजसाठी वर्षाला १४९९ रुपये द्यावे लागतील. वापरकर्त्यांना मासिक शुल्क देण्याचा पर्यायही कंपनीने उपलब्ध करुन दिलाय. महिन्याला १४९ रुपये भरुन गुगल वनची सेवा घेता येईल. वापरकर्त्यांना खूप जास्त माहिती गुगल फोटोजवर स्टोअर करुन ठेवायची असेल तर २०० जीबीचा प्लॅन घेता येईल. यासाठी वर्षाकाठी २१९९ रुपये शुल्क आकारलं जाईल. तसेच २०० जीबी प्लॅनअंतर्गत महिन्याला २१९ रुपये भरुन सेवा घेण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आलाय.

याचसोबत २ टीबीच्या वार्षिक प्लॅनअंतर्गत साडेसात हजार रुपये किंवा मासिक ७४९ रुपये सबस्क्रिप्शनची ऑफर गुगलने वापरकर्त्यांना दिलीय. वापरकर्त्यांना १० टीबी स्टोरेजसाठी ३२४९ रुपये, २० टीबीसाठी ६५०० रुपये आणि ३० टीबीसाठी ९७०० रुपयांचा प्लॅनही कंपनीने देऊ केलाय.

गुगलवर लॉगइन करुन one.google.com/storage/management या लिंकच्या माध्यमातून किती स्टोरेज शिल्लक आहे हे वापरकर्त्यांना पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 10:58 am

Web Title: google photos ends free unlimited storage from 1 june plans how to check space and more scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?
2 EPFO खातेदारांसाठी मोठी बातमी! १ जूनपासून PF अकाऊंटवर लागू होणार ‘हा’ नियम; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान
3 Explained : आपल्या जेवणातलं तेल भरमसाठ महागलं! पण नेमकं असं झालं तरी का?
Just Now!
X