लॉकडाउनदरम्यान जर तुम्ही कर्जाच्या परतफेडीसाठी Moratorium सुविधा घेतली असेल आणि जर तुम्हाला आता दुसऱ्या बँकेत बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, Moratoriumच्या सुविधेमुळे तुमचा बॅलन्स ट्रान्सफरचा अर्ज कदाचित नाकारला जाऊ शकतो. विविध अर्थतज्ज्ञांनी हे मत व्यक्त केलं आहे. मिंटने याबाबत वृत्त दिले आहे.

कर्ज देणाऱ्या संस्थेचं पतधोरण आणि जोखमीच्या मुल्यमापन धोरणानुसार, बॅलन्स ट्रान्सफरसाठी विनंती केलेल्या ग्राहकाने जर याआधी Moratoriumची सुविधा घेतली असेल तर त्याची ही विनंती नाकारली जाऊ शकते. कारण, कर्ज देणारी संबंधित संस्था असं गृहित धरु शकते की, पैशाची चणचण असल्यानेच तुम्ही Moratoriumची सुविधा घेतली आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमची पैशाची अडचण सुटल्याची खात्री नव्या बँकेला देऊ शकत नाहीत तोपर्यंत तुमच्यासाठी बँलन्स ट्रान्सफर करणं अवघड जाऊ शकतं, अस मत बँक बझार डॉट कॉमचे सीईओ अधिल शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या बँकेकडून कमी व्याजदरात लोन घ्यायचं असेल त्यासाठी तुमचं सध्याचं लोन तुम्हाला या संस्थेत ट्रान्सफर करायचं असेल तर त्यामुळे तुमच्या व्याजाच्या रकमेत बचत होते. मात्र, Moratoriumची सुविधा ही प्रामुख्याने ज्या व्यक्तीला पैशाची चणचण आहे, त्यांनीच घेतलेली असू शकते. “तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि मिळकतीचा स्त्रोत या गोष्टी तुमच्या कर्जाच्या मंजुरीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे नवी बँक तुम्हाला कर्ज देण्यासाठी तुमचा Moratoriumचा काळ संपेपर्यंत वाट पाहू शकते. त्यानंतरच अशा ग्राहकांना कर्ज देऊ करेन,” असं फेडरल बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष के. ए. बाबू यांनी सांगितलं आहे. दरम्यान, सध्या अशा प्रकारची कुठलीही नियमावली तुम्ही Moratorium घेतलेल्या कर्जाच्या बँलन्स ट्रान्सफरसाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वसाधारणपणे फ्लोटिंग रेट होम लोन घेतलेले ग्राहकच बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी इच्छुक असतात. तसेच ज्या ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या बँकेकडून प्रिपेमेंटवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसेल तसेच नवी बँक त्यांना व्याजदर कमी करुन देण्यास तयार असेल तसेच ज्यांच्या कर्जाचा कालावधी कमीत कमी १० वर्षे राहिला असेल असेच ग्राहक यासाठी तयार होतात. कारण त्यांना व्याजावर चांगली बचत होऊ शकते.

दरम्यान, ज्यांनी ईएमआय Moratoriumची सुविधा घेतली आहे, त्यांचा कर्जाचा कालावधी देखील वाढणार असून या काळात चक्रवाढ व्याज लागणार असल्याने त्यांच्या व्याजाची रक्कमही वाढणार आहे. अशा ग्राहकांसाठी बॅलन्स ट्रान्सफर करताना व्याजावर बचत होऊ शकते. मात्र, त्यासाठी नव्या बँकेला तुमचे शिल्लक कर्ज पूर्णपणे Moratorium रहित झालेलं असायला हवं, अशी मागणी होऊ शकते.