सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी क्रिकेट कर्णधारपदही सोडल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एकाएकी नेतृत्वपोकळी निर्माण झाल्यासारखी दिसते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नसली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक संस्मरणीय कसोटी विजय विशेषतः परदेशी मैदानांवर मिळवले. त्यामुळे जगात कोणत्याही मैदानावर भारतीय कसोटी क्रिकेट संघ उतरतो, तेव्हा दडपण प्रतिस्पर्धी संघावर अधिक असते. मात्र त्याच्या अनुपस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करणार कोण याची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत. काही उत्तराधिकाऱ्यांचा हा थोडक्यात आढावा :

रोहित शर्मा?

कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकला नाही हा भाग वेगळा. गेल्या वर्षी मूळचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेची फलंदाज म्हणून कामगिरी ढासळू लागल्यानंतर रोहित शर्माला कसोटी उपकर्णधार म्हणून बढती मिळाली. कारण याच काळात सलामीचा फलंदाज म्हणून रोहितची कामगिरीही अधिक आश्वासक होऊ लागली होती. तोच यंदाही विराटचा स्वाभाविक उत्तराधिकारी मानावा लागेल. आयपीएलच्या निमित्ताने रोहितमधील नेतृत्वगुणही दिसून आले आहेत. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व आणि कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व या भिन्न बाबी आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित विराटच्या तोडीचे नेतृत्व करू शकणार की नाही हा मुद्दा नाही. परंतु विराटच्या तोडीची तंदुरुस्ती रोहितकडे नाही हे मात्र नक्की. मोक्याच्या मालिकांमध्ये रोहित जायबंदी असल्यामुळे उपलब्ध नसणे हे अनेकदा घडलेले दिसते. अशा मालिका विशेषतः त्यांतील कामगिरी कसोटी अजिंक्यपदासाठी अजिंक्यपदासाठी गृहित धरली जात असताना, रोहितसारखा फलंदाज-कर्णधार मैदानावर नसणे हा हार-जीतमधील निर्णायक घटक ठरू शकतो. रोहितने आयपीएलमध्ये सर्वाधिक अजिंक्यपदे पटकावलेली असल्यामुळे त्याच्या फ्रँचायझी मालकांची ‘गुंतवणूक’ मोठी आहे. ही बाब विराटला लागू होत नव्हती हे लक्षात घ्यावे लागेल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे महत्त्वाचे दौरे नोव्हेंबर-फेब्रुवारी असे चालतात. इंग्लंडचा तितकाच महत्त्वाचा दौरा जून-सप्टेंबरदरम्यान सहसा होत असतो. या दोहोंच्या मध्ये मार्च ते मे दरम्यान कधीही आयपीएल खेळवली जाते. तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व करण्यासाठी आवश्यक तंदुरुस्ती रोहितकडे नाही हे कोणीही मान्य करेल. तो ३४ वर्षांचा आहे, तेव्हा पुढील किमान तीन वर्षांसाठी त्याच्याकडे नेतृत्व सोपवायचे की आणखी तरुण उमेदवाराला संधी द्यायची हे बीसीसीआय आणि निवड समितीला ठरवावे लागेल.

ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमरा?

साक्षात सुनील गावस्करांनी ऋषभ पंतकडे नेतृत्वगुण असल्याचे मध्यंतरी म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने स्वतःची विकेट फेकल्यामुळे समाजमाध्यमी त्याच्यावर सध्या खूप संतप्त झालेले दिसतात. परंतु तात्कालिक चुकांच्या पलीकडे जाऊन ऋषभ पंतच्या गुणांचे विश्लेषण करावे लागेल. गुणवत्ता आणि जिगर या दोन्ही आघाड्यांवर तो कोणालाही हार जाणार नाही हे निश्चित. ऑस्ट्रेलियात गॅबा मैदानावर त्याची सामना आणि मालिका जिंकून देणारी खेळी संस्मरणीयच होती. कसोटी संघात त्याचे स्थान निश्चित आहे आणि २४ वर्षे हे वयही त्याची जमेची बाजू ठरते. कदाचित नेतृत्वाची जबाबदारी शिरावर आल्यावर तो सध्या आहे तितका निर्धास्त किंवा काही बाबतीत बेफिकीर दिसतो तसा राहणारही नाही. पण हा दुहेरी जुगार ठरू शकतो. कारण नैसर्गिक ऊर्मी आवरून खेळणारा ऋषभ कदाचित वेगळाही निपजू शकतो!

जसप्रीत बुमराने मध्यंतरी एका मुलाखतीत ‘संधी मिळाल्यास’ कसोटी संघाचे नेतृत्व करण्यास आवडेल असे म्हटले होते. बुमरा भारताचा आघाडीचा गोलंदाज आणि हुकमी एक्का आहे. परंतु तेज गोलंदाजाने नेतृत्व करण्याचे प्रयोग कसोटी क्रिकेटमध्ये तरी फारसे यशस्वी ठरलेले नाही. भारताच्या बाबतीत कपिलदेव यांच्यानंतर असा पर्याय दीर्घकाळासाठी विचारातच घेतला गेलेला नाही. शिवाय कपिलदेव किंवा पाकिस्तानचे इम्रानखान हे अष्टपैलू होते. ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कर्णधार पॅट कमिन्सच्या बाबतीतही हे म्हणता येईल. तो उत्तम गोलंदाज असला, तरी बऱ्यापैकी फलंदाजी करू शकतो. तसे बुमराच्या बाबतीत अजिबात म्हणता येणार नाही. गोलंदाजी हे त्याचे एकमेव कौशल्य. शिवाय तेज गोलंदाजाची तंदुरुस्ती फलंदाजापेक्षाही अधिक बेभरवशाची. तेव्हा बुमरा हा तूर्त हुकमी गोलंदाज राहिलेलाच बरा.

के. एल. राहुल?

चार सामने, चार पराभव! राहुलमध्ये अलीकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटबरोबरच कसोटी क्रिकेटमध्येही सातत्य फलंदाजीतील सातत्य दिसून येते. परंतु नेतृत्वाच्या बाबतीत त्याच्यावर जरा मेहेरनजरच होते असे दिसते. आयपीएलमध्येही तो कर्णधार म्हणून कधीही प्रभाव पाडू शकला नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वाच्या मर्यादा अधिकच अधोरेखित झाल्या आहेत. नेतृत्वासाठी आवश्यक जरब आणि कल्पकता हे दोन्ही गुण त्याच्याकडे नाहीत. निव्वळ वैयक्तिक चांगली कामगिरी करून तो कर्णधार बनू शकत नाही. उलट नेतृत्वातील अपयशाचा विपरीत परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊ शकतो.

अजिंक्य रहाणे…?

खरेतर इतर काही क्रिकेटपटूंना नेहमी मिळते, तशी माफीरूपी सहानुभूती अजिंक्य रहाणेच्या वाट्याला कमीच आली. पण आजही देशात विराटनंतरचा उत्कृष्ट कसोटी कर्णधार तोच ठरतो. परंतु त्याच्या ढासळत्या कामगिरीबाबत बीसीसीआयची सबुरी संपुष्टात आलेली दिसते. पण हे चित्र विराटने तडकाफडकी नेतृत्व त्यागण्यापूर्वीचे होते. प्राप्त परिस्थितीत कायमस्वरूपी आणि दीर्घकाळासाठी कसोटी कर्णधार निश्चित होेईपर्यंत एक वर्षासाठी ‘ग्रेस पिरियड’ म्हणून अजिंक्यकडे नेतृत्वाची धुरा सोपवायला काहीच हरकत नाही. पुढील वर्षभरात भारताचे बहुतेक कसोटी सामने घरच्या मैदानांवर आहेत. या काळात फलंदाजीतील त्रुटी दूर करतानाच नेतृत्व सांभाळणे ही बाब अजिंक्यसाठी फार आव्हानात्मक ठरू नये. परंतु सध्या रोहित श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी सिद्ध झाल्यास अजिंक्यची ती संधीही संपल्यात जमा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained who will be the next indian test cricket team captain after virat kohli exp 0122 sgy
First published on: 24-01-2022 at 08:13 IST