भारतात रस्त्यावरून गाडी चालवताना चालकांना वाहतूक पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागते. पण, हे नियम मोडल्यास तुमच्याकडून दंडही वसूल केला जातो, तर अनेक वेळा वाहने जप्तही केली जातात. चालकांना वाहन चालवताना सर्वात आधी स्पीडबाबत काळजी घ्यावी लागते. यात देशात कार चालवताना सीट बेल्ट आणि बाईक चालवताना हेल्मेट बंधनकारक आहे. पण, तुम्हाला भारताच्या नियमांची माहिती असली तरी जगातील काही देशांमध्ये चालकांना वाहतुकीसंदर्भात अनेक विचित्र नियम पाळावे लागतात. ज्यामध्ये वाहनातील पेट्रोल संपल्यानंतर चालकांना दंड भरण्याची शिक्षा आहे.
भररस्त्यात गाडीतील पेट्रोल संपल्यास आकारला जातो दंड
जर्मनीमध्ये चालकांना हायवेवर हव्या तितक्या वेगाने गाडी चालवता येते; कारण इथे स्पीडबाबत चालकांना सूट देण्यात आली आहे. कितीही वेगाने गाडी चालवली तरी कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही, पण जर तुमच्या गाडीतील पेट्रोल, डिझेल भररस्त्यात संपले तर तो गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा किंवा दंड होऊ शकतो, पण भारतात तसे नाही. जर तुमच्या गाडीतील पेट्रोल संपले आणि आजूबाजूला कोणी नसेल तर कधी कधी पोलिसही तुम्हाला मदत करतात. जवळच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणून देत गाडीत टाकले जाते.




रशियामध्येही चालकांना पाळावे लागतात वेगळे नियम
जर तुम्ही रशियाच्या रस्त्यावर गाडी चालवत असाल आणि तुमच्या कारवर धूळ साचली असेल तर तुम्ही वाहतुकीचा नियम मोडला आहे, असे समजून जा. यासाठी तुम्हाला तिथे दंड भरावा लागू शकतो. वाहतूक नियमांनुसार, रशियामध्ये पोलिसांना वाहनांवरील क्रमांक स्पष्टपणे दिसणे बंधनकारक आहे.
त्यामुळे रशियामध्ये लोक स्वच्छ कार चालवण्यास प्राधान्य देतात. जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये रहात असाल आणि वीकेंडला तुमची कार धुवायची असेल तर तुम्ही तसे करू शकत नाही. रविवारी गाड्या धुण्यास बंदी आहे. जर कोणी असे केले तर त्याला दंड भरावा लागतो. जपानमध्ये पावसात गाडी चालवताना कोणाच्याही अंगावर पाणी उडणार नाही याची काळजी घेणे चालकाला बंधनकारक आहे.