मारूती सुझुकीची सध्या बाजारात असलेल्या ए स्टार या छोटेखानी मोटारीची मर्यादित आवृत्ती ‘अक्टिव्ह’ या नावाखाली बाजारात आणण्यात आली आहे. नेदरलॅण्ड, इटाली, ब्रिटन, जर्मनी आदी युरोपातील देशांमध्ये ए स्टारने सुरुवातीच्या काळात आपला ठसा उमटविला होता. इंधनबचतीसाठी या मोटारीने युरोपात चांगलेच नाव कमाविले होते. स्टाइल, नियंत्रण, तरुणांच्या मनावर भुरळ घालणारे आरेखन आणि इंधनबचतीसाठी चांगले वाहन अशा गुणांमुळे ए स्टार ही ९९८ सीसी इंजिन असणारी मोटार शहरी भागांमध्ये लोकप्रिय ठरली. आता मारुती सुझुकीने या मोटारीचे नवे रूपडे बाजारात मर्यादित संख्येने भारतीय बाजारपेठेत आणले आहे. आकर्षक असा हा नवा अवतार खास तरुणांसाठी आहे. तारुण्यातील उत्साहाला भुरळ पाडू शकेल अशी ताकद या नव्या रुपात व त्यात देण्यात आलेल्या सुविधांमध्ये, रंगसंगतीमध्ये देण्यात आली आहे.
मोटारीच्या सर्व बाजूने असणारे बोल्ड ग्राफिक्स, ‘अॅक्टिव्ह’चा लोगो, लाल रंगाचे स्पॉयलर्स, बम्पर अशा वेगवेगळ्या आरेखनाबरोबरच एकंदर १४ नवी वैशिष्टय़े या अॅक्टिव्ह आवृत्तीमध्ये आहेत. तरुण वर्गाला समोर ठेवून हा ‘ए स्टार’ चा नवा अवतार ‘अॅक्टिव्ह’ करण्यात आला आहे.