सायकल सदृश पर्यावरणस्नेही मोटार
मार्क स्टेवर्टने ‘एएलएफ बाइक’ म्हणजे सायकल वजा मोटार रस्त्यावर आणली तेव्हा तिच्या निळ्या दिव्यांनी सर्वाच्या नजरा वेधल्या गेल्या, पण ती दिसायला मोटार असली तरी प्रत्यक्षात सायकल आहे. स्टेवर्ट हा शाळेतील मानससल्लागार असून त्याने ही सायकलसदृश गाडी इस्टकोस्ट ग्रीनवे वरून १२०० मैल चालवली. डय़ुरहॅम येथून सुरू केलेला त्याचा प्रवास रेस्टन येथे संपला. रोज ६० मैल अंतर ते कापत होते. एएलएफ किंवा ऑरगॅनिक ट्रान्सिट व्हेइकल ही प्रदूषणमुक्त मोटार आहे व त्याला दुरूस्ती, निगा,विमा काही लागत नाही, काहीवेळा तिचा टायर बदलावा लागतो इतकेच. तिची किंमत ५००० डॉलर आहे.

वर्षांतील वैशिष्टय़पूर्ण गाडय़ा
सध्या मोटारींची विक्री कमी होत आहे. २०१३ मध्ये त्यात फार वाढ अपेक्षित असतानाही काही नवीन गाडय़ा बाजारात येणार आहेत. सुरूवातीला द सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेने २०१३ मध्ये १० ते १२ टक्के वाढीचा अंदाज दिला, पण नंतर तो सुधारून ०-१ टक्के करण्यात आला. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा मोटारींच्या विक्रीवर अनिष्ट परिणाम झाला आहे. यंदा फोर्ड इकोस्पोर्ट,होंडाची डिझेल मोटार होंडा अमेझ, दस्तुन गो , मर्सिडीझ बेंझ ए क्लास व शेव्हरोलेटची एंजॉय या गाडय़ा सादर होत आहेत. फोर्ड इकोस्पोर्ट गाडीसाठी १७ दिवसात ३० हजार गाडय़ांची नोंदणी झाली हे मोठे यश आहे. या गाडीची किंमत ५.५९ लाखांपासून पुढे आहे व ती एसयूव्ही गटातील आहे. कमी किंमत हे तिचे वैशिष्टय़ आहे. होंडा अमेझ ही डिझेल मोटार असून तिची २२ हजार इतकी नोंदणी झाली आहे. यात शेव्हर्ले एंजॉय गाडीसाठी २१७७ तर मर्सिडीझ बी क्लास या गाडय़ांची नोंदणी ४०० इतकी आहे.

बीएमडब्ल्यू महागणार
जर्मन मोटार उत्पादक कंपनी बीएमडब्लू त्यांच्या मिनी गाडीसह सर्व गाडय़ांच्या किमती सरसकट पाच टक्क्य़ांनी वाढवणार आहे, रूपयाची घसरण व त्यामुळे आयात किमतीत झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. बीएमडब्लूच्या भारतातील विभागाने असे जाहीर केले की, १५ ऑगस्टपासून गाडय़ांच्या किमतीत ही पाच टक्के दरवाढ लागू केली जाणार आहे. बीएमडब्लू इंडियाचे अध्यक्ष  फिलीप व्हॉन सार यांनी सांगितले की, दरवाढीचे निर्णय आम्ही काळजीपूर्वक घेत असतो. सध्या बीएमडब्लूच्या सेडान ३,५,६, ७ मालिकेतील गाडय़ा, एसयुव्ही एक्स१,३,५ मालिकेतील गाडय़ा, एम मालिकेतील स्पोर्टस मोटारी यांच्या किमती २८.६ लाख ते १.७३ कोटी दरम्यान आहेत. मिनी मालिकेतील आटोपशीर गाडीच्या किमती २६.६ लाख ते ३७.५० लाख दरम्यान आहेत. दरम्यान, मर्सिडीझ बेन्झ कंपनीनेही त्यांच्या मोटारींच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एबेरहार्ड केर्न यांनी सांगितले की, रूपया कमकुवत झाल्याने किं मती वाढवणे आवश्यक ठरणार आहे. जर्मन मोटार उत्पादक ऑडी कंपनीने त्यांच्या गाडय़ांच्या किमती १५ जुलैपासून ४ टक्के वाढवल्या आहेत. त्यांच्या आर ८ गाडीची किंमत ४.४२ लाख आहे.

मारूतीची ‘स्मॉल कार ऑन डिझेल’
टाटा मोटर्सची डिझेलवर चालणारी नॅनो मोटार बाजारात आणण्याची योजना अजून पूर्ण होत नसतानाच मारूती सुझुकीने डिझेलवर चालणारी छोटी मोटार बाजारात आणण्याचे निश्चित केले आहे. ही मोटार दोन सिलिंडरची असून तिची क्षमता ८०० सी.सी आहे. ही नवीन मोटार ग्राहकांसाठी मोठी संधी असणार असून छोटय़ा मोटारींना २१ टक्के बाजारपेठ आहे. पण त्यात डिझेल इंजिनवर चालणाऱ्या मोटारी फार कमी आहेत. ‘वायएल ७’ असे मारूती सुझुकीच्या मोटारीचे नाव असणार आहे व आगामी काळात उत्तरार्धात वाहन प्रदर्शनात मारूती सुझुकीची ८०० ही छोटी मोटार सादर केली जाणार आहे. ए स्टार व झेन एस्टिलो या मोटारींना वायएल ७ च्या रूपात नवा पर्याय मिळणार आहे. भारतात मोटारींचा ग्राहकवर्ग २७ लाख इतका असून त्यात या मोटारीला स्थान मिळेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे भारतातून या मोटारीची निर्यात केली जाणार आहे. भारतात ती नवीन अल्टो म्हणून विकली जाणार आहे. मारूतीची वायएल ७ ही मोटार जानेवारी -मार्च २०१४ दरम्यान सादर होईल, त्यानंतर डिसेंबरमध्ये तिची डिझेल आवृत्ती सादर होईल. ही गाडी एक लिटरला ३० कि.मी. अंतर कापेल. टाटा मोटर्सची ८०० सीसी डिझेल मोटर योजना लांबली आहे पण ह्य़ुंदाई कंपनी लवकरच छोटी मोटार सादर करणार आहे. सध्या देशात सर्वात लहान डिझेल इंजिनची मोटार शेवरोलेट बीट  ही आहे. जर्मनीची बॉस्च कंपनी टाटा व मारूती यांच्या ८०० सीसी डिझेल गाडय़ांची इंजिने पुरवणार आहे.