20 November 2017

News Flash

विकासाचा एक्स्प्रेस वे..

इंधनाचे वाढते दर, वाहन नोंदणीसाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ, अबकारी कर, पथकर अशा विविध

विनय उपासनी | Updated: December 27, 2012 1:05 AM

इंधनाचे वाढते दर, वाहन नोंदणीसाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ, अबकारी कर, पथकर अशा विविध गतिरोधकांमुळे आगामी काळात ऑटो क्षेत्राची विकासाची टक्केवारी मंदावलेली असेल असे चित्र आहे. मात्र, येत्या काही वर्षांत हे क्षेत्र झपाटय़ाने विकास साधेल यात शंका नाही..

तीनचाकी वाहनांच्या निर्मिती क्षेत्रात जागतिक बाजारपेठेत तिसरा क्रमांक.. दुचाकी वाहनांच्या निर्मिती क्षेत्रात दुसरा क्रमांक.. प्रवासी कारच्या निर्मितीत दहावा क्रमांक.. ट्रॅक्टर निर्मितीत चौथा क्रमांक.. व्यापारी वाहनांच्या निर्मितीत आणि बस-ट्रकच्या निर्मितीत पाचवा क्रमांक..
संख्येला अधिकाधिक महत्त्व असलेल्या या जगात भारताची वाहन निर्मिती क्षेत्रातली ही आकडेवारी. हर प्रकारच्या वाहन निर्मितीत जागतिक बाजारपेठेत भारत किमान पहिल्या पाचात आहे हे यावरून सिद्ध होतं. बरं ही आकडेवारी आहे भारतीय औद्योगिक महासंघाने (सीआयआय) प्रकाशित केलेली, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या वाहन निर्मिती क्षेत्राला (ऑटो सेक्टर) २०१२ हे वर्ष कसे गेले आणि आगामी वर्षांत या क्षेत्राची वाटचाल कशी असेल याचा घेतलेला हा आढावा..
ऑटो सेक्टरची चार भागांमध्ये विभागणी केली जाते : दुचाकी वाहने (मोपेड्स, स्कूटर्स, मोटरसायकल्स आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर्स), प्रवासी वाहने (प्रवासी कार, युटिलिटी व्हेइकल्स आणि मल्टी पर्पज व्हेइकल्स), व्यापारी वाहने (हलकी व मध्यम प्रकारची जड वाहने) आणि तीनचाकी वाहने (प्रवासी वाहक आणि मालवाहक). ही चारही प्रकारांतली वाहने देशाचा अर्थव्यवस्थेचा गाडा चालवणाऱ्या महत्त्वाच्या क्षेत्रांपकीच एक आहेत. १९९१मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी लायसन्स व परमिट राजला तिलांजली देत जगाला भारतीय अर्थव्यवस्थेची कवाडे सताड उघडी करून दिल्यानंतर ऑटो क्षेत्रात गेल्या दोन दशकांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. ऑटो क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीलाही याच काळात परवानगी मिळाली. आजच्या घडीला जगातील सर्व मोठमोठय़ा ऑटो कंपन्यांची वाहने भारतीय रस्त्यांवर धावताना दिसतात.
गेल्या दोन वर्षांत ऑटो सेक्टरने २६ टक्के विकास साधला आहे. मात्र, २०१२मध्ये विकासाचा हा वेग थोडा मंदावलेला दिसतो. या वर्षांत या क्षेत्राला फक्त १२ टक्क्यांनीच विकास साधता आला असून आगामी वर्षांत म्हणजेच २०१३मध्ये हा वेग आणखी मंदावून १० टक्क्यांपर्यंत येण्याचा तज्ज्ञांचा होरा आहे. या क्षेत्राच्या विकासमार्गात इंधनाचे वाढते दर, वाहन नोंदणीसाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ, अबकारी कर, पथकर अशा विविध बाबींचे गतिरोधक लागलेले असल्यामुळे आगामी काळात विकासाची टक्केवारी मंदावलेली असेल असे चित्र आहे. मात्र, येत्या काही वर्षांत हे क्षेत्र झपाटय़ाने विकास साधेल यात शंका नाही. त्यासाठी दीर्घ कालावधीसाठीची गुंतवणूक, सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीतील वाहनांची निर्मिती, बाजारपेठेतील संधी शोधणे, ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिकाधिक आकर्षति करेल अशा प्रकारच्या वाहनांची निर्मिती करणे अशी पावले या क्षेत्राला टाकावी लागणार आहेत. एका संशोधनानुसार येत्या चार वर्षांत प्रवासी वाहनांची भारतातील मागणी दुपटीने वाढणार आहे. म्हणजे या मागणीमुळे कार निर्मिती क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत झालेल्या १६ टक्के वाढीचा वेगही फिका पडणार असून चार वर्षांतच १६ टक्के वाढीचा हा आकडा पार केला जाणार असल्याचा निष्कर्ष आहे. कारची मागणी वाढत असतानाच मात्र दुचाकीच्या खपात येत्या चार वर्षांत घट होणार आहे. त्याला बहुधा कमी किमतीतील कारची उपलब्धता हेच कारण कारणीभूत असेल.
दरम्यान, ऑटो क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता ‘ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन २०१६’ हा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ानुसार ऑटो क्षेत्राने एकंदर ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) दहा टक्के योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून त्यानुसार या क्षेत्राला विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने आगामी वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑटो क्षेत्राच्या विकासाला कारणीभूत ठरणारे घटक
भारतीयांची क्रयशक्ती वाढली तर ऑटो क्षेत्राला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच त्यांना परवडतील अशा प्रकारच्या गाडय़ांची निर्मिती झाली तर परस्परपूरक अशा या परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढेल, विशेष म्हणजे लहान कारच्या मागणीत प्रचंड वाढ होईल.
इंधनाचे वाढते दर हा चिंतनाचा विषय आहे. तसेच तो सर्वव्यापी आहे. वाहननिर्मिती क्षेत्राचा तर थेट संबंध इंधनाशी येतो, त्यामुळे इंधनाच्या दरात झालेली वाढ या क्षेत्रावर बरा-वाईट परिणाम करते. यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीतून हे दिसून आले. इंधनाचे दर वाढले की त्याचा परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर होतो तसाच तो वाहनांच्या खपावरही होतो. त्यामुळेच अधिकाधिक मायलेज देणाऱ्या गाडय़ांच्या निर्मितीकडे ऑटो क्षेत्राचा ओढा वाढला आहे. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या निर्मात्यांकडून विविध क्लृप्त्याही रचल्या जात आहेत. तसेच गाडय़ांच्या संरचनेत बदल करून गाडी अधिकाधिक इंधनस्नेही (फ्युएल फ्रेण्डली) कशी होईल याकडे वाहन निर्मात्यांचा कल वाढू लागला आहे. सीएनजी आणि विजेरीवर (इलेक्ट्रिक) चालणाऱ्या गाडय़ांचा पर्यायही निर्माते आणि ग्राहक यांच्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात याच गाडय़ांच्या निर्मितीला अधिक महत्त्व येण्याची चिन्हे असून युरोप-अमेरिकेत तर त्या दृष्टीने पावलेही पडायला लागली आहेत. त्यामुळे आगामी वर्षांत या गाडय़ा आपल्याकडच्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात दिसायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.
आगामी ट्रेण्ड्स
भारतात आपला संशोधन आणि विकास (आर अँड डी) विभाग स्थापन करून त्याच्या माध्यमातून भारतातील बाजारपेठेची नस ओळखण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांची संख्या आताशा वाढू लागली आहे. ह्य़ुंडाई, सुझुकी, जनरल मोटर्स यांसारखे जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्स आता आपल्याकडे आर अँड डी विभाग स्थापन करू लागले आहेत. केंद्र सरकारचे या बाबतीतले आíथक धोरणही त्यासाठी अनुकूल आहे. तसेच टाटांच्या नॅनोला मिळालेला लोकांचा प्रतिसादही या क्षेत्रातील ‘बिग प्लेअर्स’च्या नजरेसमोर आहेच. त्यामुळे येत्या काही काळात नक्कीच या क्षेत्रात बूिमग होणार आहे हे निश्चित.
रोजगाराच्या संधी
सध्या ऑटो क्षेत्रात ७८ लाख ७७ हजार ७०२ जणांना रोजगार आहे. त्यातील ५८ टक्के कर्मचारी हे प्रवासी कार निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. येत्या काळात या क्षेत्रात कुशल कामगारांची मागणी वाढणार तर आहेच, शिवाय या क्षेत्राशी निगडित असलेल्या इतर क्षेत्रांतही रोजगाराच्या संधीचा आलेख चढताच असेल असे सीआयआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकंदर आगामी वर्ष आणि काळ ऑटो क्षेत्रासाठी विकासपथावरून जोरदार मुसंडी मारण्याचा आहे यात शंका नाही.

First Published on December 27, 2012 1:05 am

Web Title: development express way