टाटा मोटर्सची मालकी असलेल्या जग्वार लँड रोव्हरच्या जागतिक खपात २८ टक्के वाढ झाली असून ऑगस्टमध्ये २७ हजार ८५२ गाडय़ांची विक्री झाली आहे. चीनमध्ये या गाडीची विक्री ४३ टक्के इतकी वाढली, उत्तर अमेरिकेत ४० टक्के, ब्रिटनमध्ये ३६ टक्के, आशिया पॅसिफिकमध्ये ३५ टक्के इतकी वाढ विक्रीत झाली. इतर परदेशी बाजारपेठातील विक्रीत १८ टक्के वाढ झाली. युरोपात गाडीचा खप एक टक्का कमी झाला. प्रत्येक विभागात गाडीची किती विक्री झाली हे नेमके सांगण्यात आले नाही. ऑगस्टमध्ये जग्वारच्या ५४०५ गाडय़ा विकल्या गेल्या. एक्सएफ मॉडेलची विक्री जास्त झाली. लँड रोव्हरची विक्री १८ टक्के वाढली असून ती २२ हजार ४४७ इतकी झाली.

डिझेल नॅनो मार्चमध्ये
टाटांच्या नॅनो गाडीचे डिझेल मॉडेल मार्च २०१४ मध्ये बाजारात येत आहे. २००९ मध्ये टाटांची नॅनो ही सर्वात स्वस्त मोटार म्हणून बाजारात आली, पण ३१ मार्चअखेर संपलेल्या वर्षांत गाडीचा खप २७ टक्के कमी झाला होता. टाटा कंपनीच्या मोटार विक्रीत नॅनोचा वाटा एक चतुर्थाश असून सध्या सगळी भिस्त जग्वार लँड रोव्हर या गाडीवर आहे. भारतात पेट्रोलची किंमत जास्त आहे त्यामुळे डिझेल मॉडेलला जास्त मागणी असणार आहे. किंबहुना पेट्रोल दरवाढीचा काही प्रमाणात गाडय़ांच्या खपावर परिणाम झाला आहे, त्यावर मात करण्यासाठी नॅनोचे डिझेल मॉडेल आणले जात आहे.

सबमरिन मोटारीचा लिलाव
द स्पाय हू लव्हड मी या जेम्स बाँड चित्रपटात वापरलेल्या मोटारीचा लिलाव होणार असून तिला ९ लाख ५० हजार पौंड इतकी किंमत येण्याची अपेक्षा आहे. लोटस एस्प्रिट असे या गाडीचे नाव असून ती १९७७ मध्ये रॉजर मूरची भूमिका असलेल्या या चित्रपटात वापरली होती. खास या चित्रपटासाठी ती बनवली होती. फ्लोरिडातील पेरी ओशनोग्राफिकने ती बनवली होती व चित्रपटाच्या शूटिंगवेळी ती अमेरिकी नौदलाचे डॉन ग्रिफिन यांनी चालवली होती. तिची मूळ किंमत ६५ हजार पौंड होती. आज तिची किंमत ३ लाख ३० हजार पौंड आहे. चित्रपटापूर्वी ही मोटार अनेक प्रदर्शनात झळकली होती. क्षणात ती मोटार असते व क्षणात ती पाणबुडी बनते. बाँडपटातील अ‍ॅशटन मार्टिन डीबी ५ ही मोटार २०१० मधील लिलावात २९ लाख पौंडांना विकली गेली होती.

जस्ट लाँच..
जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे आज, गुरुवारपासून ऑटो शो सुरू झाला. २२ सप्टेंबपर्यंत चालणाऱ्या या शोमध्ये एक हजारांहून अधिक ऑटो कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. बुधवारी नामांकित कंपन्यांनी या शोमध्ये लाँच होत असलेल्या त्यांच्या गाडय़ांचे प्रदर्शन प्रसारमाध्यमांसाठी ठेवले होते. त्यातील पहिली गाडी लेक्ससची एलएफ-एनएक्स हे नवीन व्हेरिएंट. दुसरी गाडी निस्सानची एक्स-ट्रेल, फोक्सव्ॉगनची एक्सएल वन आणि व्होल्वोची नवी ड्रीम कार.