* मी सरकारी नोकरीत उच्चपदस्थ आहे. ५७ वय आहे. ३५ वर्षांपासून गाडी चालवण्याचा अनुभव आहे. मात्र, वयोमानपरत्वे पाठदुखीचा त्रास आहे. सलग न थकता २५० किमी चालवण्याचा स्टॅमिना अजूनही आहे. निवृत्तीनंतर घरगुती वापरासाठी चारचाकी घ्यायची आहे. बजेट आठ लाखांचे आहे.
– चंद्रशेखर हंगेकर
* सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. साठीतही तुमचा गाडी चालवण्याचा स्टॅमिना दांडगा म्हणावा लागेल. पाठदुखीचा त्रास असूनही तुम्ही गाडी चालवता हे अभिनंदनास पात्र असेच आहे. तुम्ही सध्या वॅगन आर चालवता. आणि तुम्हाला निवृत्तीनंतर घरगुती वापरासाठी गाडी घ्यायची आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या गाडय़ांमध्ये अर्टिगा, फोर्ड इकोस्पोर्ट, होंडा अमेझ किंवा मिहद्राची व्हेरिटो या गाडय़ा आहेत. शिवाय या गाडय़ा पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेतच. यापकी एखादी गाडी तुम्ही निवडू शकता. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानंतरच गाडी चालवण्याची जोखीम घ्या, असा सल्ला देणे अपरिहार्य आहे.
* मी एलआयसीमधून निवृत्त झालो आहे. मी साताऱ्यात राहतो आणि माझे फार्महाऊस २२ किमी अंतरावर आहे. मात्र, हा रस्ता घाटाचा आहे. अशा रस्त्यावर चालू शकणारी गाडी सुचवा. बजेट पाच लाखांचे आहे.
– लक्ष्मण शिंदे
* तुमच्या बजेटमध्ये बसू शकतील अशा दणकट गाडय़ांमध्ये टाटा व्हिस्टा आहे. हॅचबॅक प्रकारातील ही गाडी तुम्हाला साडेचार ते पाच लाखांच्या दरम्यान मिळू शकते. तुम्हाला टाटाची गाडी नको असेल तर मारुतीची स्विफ्ट आणि रिट्झ या गाडय़ा आहेत. शिवाय शेवरोलेची सेलही आहे. झालेच तर होंडाची ब्रायो हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो.
* मी बँकिंग क्षेत्रात कामाला आहे. चांगली इंधनस्नेही, चांगला मायलेज देणारी गाडी मला घ्यायची आहे. माझे बजेट साडेपाच लाखांचे आहे.
 – सागर वाईकर
* फोर्ड फिगो हा एक चांगला पर्याय आहे. तसेच फियाट पुंटोही तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. तुम्हाला हव्या असलेल्या सर्व बाबींची पूर्तता या दोन्ही कार करू शकतात.
* माझा रोजचा प्रवास २५ किमीचा आहे. घरात आम्ही पाच जण आहोत. मला फार नाही परंतु किफायतशीर गाडी हवी आहे. शहरात व कधी-कधी बाहेरगावी जाण्यासाठी वापरायची आहे. बजेट साडेचार ते पाच लाख आहे.
संजय जोशी
* नव्या स्वरूपातील वॅगन आर. आजच्या घडीला ही उत्तम फॅमिली कार आहे. तुमच्या बजेटमध्ये मिळू शकेल. शिवाय सिटी कार म्हणूनही तुम्हाला ती वापरता येईल. नाहीच तर मग इकोही आहेच.
* आमचे बजेट पाच लाखांचे आहे. आम्हाला फॅमिली कार पाहिजे आहे, शिवाय डिझेलवर चालणारी आणि चार जण बसू शकतील एवढय़ाच आकाराची गाडी हवी आहे.
– योगिता कावळे
* तुम्हाला चांगली दिसणारी आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारी डिझेल कार हवी आहे, तर मग तुम्ही निस्सान मायक्राचा विचार करा. कारण तुमच्या सर्व अटींची पूर्तता ही कार करते. शिवाय तिच्यातील फीचर्सही चांगले आहेत. तुम्हाला अगदीच पारंपरिक गाडी घ्यायची असेल तर मग मारुतीच्या वॅगन आर आणि रिट्झ या गाडय़ाही आहेत. फोर्ड फिगो, शेवरोले बीट, होंडा ब्रायो हेही पर्याय उपलब्ध आहेत.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.