नवीन येणाऱ्या काही कार्समध्ये ‘ऑटोमॅटिक गीअर ट्रान्समिशन’ अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम आली आहे. काय असते ही प्रणाली पाहू या.. अमेरिका आणि इतर देशांमध्ये साधारणत: सर्वच गाडय़ा ऑटोमॅटिक गीअर ट्रान्समिशन या प्रणालीवरच चालतात. ही प्रणाली आता कुठे भारतात सादर झाली आहे. आपल्याकडे आतापर्यंत मॅन्युअल गीअर ट्रान्समिशन या पद्धतीवरच गाडय़ा चालायच्या.. म्हणजे अजूनही चालतात. मात्र, आता हळूहळू हा ट्रेण्ड बदलू लागला आहे. मॅन्युअल गीअर सिस्टीममध्ये चालक गरजेनुसार हाताने गीअर बदलतो आणि त्याच सुमारास पायाने क्लचचा वापर करतो. मात्र, ऑटोमॅटिक गीअर ट्रान्समिशनमध्ये गीअर्स वेगानुसार स्वयंचलित प्रणालीने बदलत असतात. या प्रणालीत एक सेन्सर असतो की जो गाडीच्या वेगानुसार गीअरची संख्या निश्चित करतो. म्हणजे गाडी सुरू होताना पहिल्या गीअरमध्ये असते. क्लच स्वयंचलित असल्याने आपण फक्त अ‍ॅक्सिलेटर आणि ब्रेक यांचाच वापर गाडीवरील नियंत्रणासाठी करत असतो. गाडीने थोडा वेग घेतला की स्वयंचलित क्लच दाबला जातो आणि गाडीने विशिष्ट वेग घेतला की सेन्सर अधिक गतिमान होऊन कार्यक्षम होतो आणि पुढचा गीअर टाकला जातो. ही क्रिया अवघ्या काही सेकंदाचीच आहे. अशा प्रकारे गाडीच्या वेगानुसार मग त्यात चढउतार केले जातात. यामुळे ड्रायिव्हगमधील जोखीम कमी होत असली, तरी त्याचा इंधनाच्या वापरावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ऑटोमॅटिक गीअर प्रणालीमुळे इंधनाचा वापर जास्त होऊन मायलेज कमी होते. तसेच भारतातील शहरांमध्ये वाहतूककोंडीचे प्रमाण जास्त असल्याने ही प्रणाली आपल्याकडे कितपत यशस्वी ठरेल, याविषयी आताच सांगणे कठीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Automatic gear transmission
First published on: 10-04-2014 at 02:34 IST