प्रत्येक गाडीच्या ग्रिलवर किंवा मागच्या पॅनलवर त्या गाडीच्या कंपनीचा लोगो असतो. या लोगोची किंमत कारवेडय़ांसाठी सौभाग्यवतीच्या भाळावरील कुंकवाएवढीच अमूल्य असते. पण या लोगोचो अर्थ काय, असा प्रश्न कोणी विचारला तर?.. जगातील आठ टॉपच्या कार कंपन्यांच्या लोगोमागे दडलेला अर्थ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएमडब्लू
‘बव्हेरियन मोटर वेर्क्‍स’ अर्थातच बीएमडब्लू हा जर्मनीतीलच नाही, तर जगातील एक मोठा ऑटोमोबाइल ब्रँड! पांढऱ्या-निळ्या रंगसंगतीतील गोल आणि त्या गोलाच्या वर दिमाखात झळकणारी बीएमडब्लू ही अक्षरं,        हा लोगो भल्याभल्यांच्या पसंतीला उतरला आहे. निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर गरागरा फिरणारं चाक, असाही या लोगोचा अर्थ काढला जातो. मात्र तो अर्थ पूर्णपणे बरोबर नाही. बीएमडब्लूने आपली सुरुवात एअरक्राफ्ट इंजिन बनवण्यापासून केली. त्या वेळी ती कंपनी ‘आरएपीपी’ या नावाने ओळखली जायची. या कंपनीचा लोगोही आकर्षक होता. काळ्या कडा असलेल्या एका गोलात पांढऱ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर एका घोडय़ाची काळी आकृती, असा हा लोगो होता. मात्र बीएमडब्लूने आपला लोगो तयार करताना हा गोल कायम ठेवून त्यात बव्हेरियाचे मानाचे रंग म्हणजेच पांढरा आणि आकाशी निळा यांची सांगड घातली. तसेच पूर्वी आरएपीपी ही अक्षरे काळ्या गोलाच्या बरोबर वर होती. बीएमडब्लू ही अक्षरेही अशीच येतील, याची काळजी कंपनीने घेतली आहे.

टोयोटा
या कंपनीच्या कोणत्याही गाडीवर एका वर्तुळात एकमेकांमध्ये गुंतलेले दोन अंडाकृती गोल आणि त्यामागे पोकळी, हा लोगो हमखास दिसतो. हा लोगो तयार करण्यासाठी पाच वष्रे लागली होती. या लोगोमागे अर्थही तसाच दडला आहे. हे अंडाकृती गोल म्हणजे ग्राहकाचे हृदय आणि टोयोटाचा आत्मा. तर त्यामागील पोकळी म्हणजे तंत्रज्ञानातील हजारो-लाखो शक्यता! यांची सांगड घालून टोयोटाने हा लोगो तयार केला. या कंपनीने जगभरात आपला विस्तार करायला सुरुवात केल्यावर या लोगोचा कंपनीला प्रचंड फायदाच झाला. मात्र खूपच कमी जणांना या लोगोमागील अर्थ माहिती आहे.

मर्सिडीज
ऑटोमोबाइल कंपन्यांमधील सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणजेच मर्सिडीज. एमिल जेलिनेक, गॉटलिब डाइम्लेर आणि कार्ल बेन्झ यांनी एकत्र येत १९२६मध्ये या कंपनीची स्थापना केली. त्याआधी मर्सिडीज आणि बेन्झ अशा वेगवेगळ्या कंपन्या होत्या आणि त्यांचे लोगोही अस्तित्वात होते. त्यानंतर ही मंडळी एकत्र आल्यावर त्यांनी आपल्या आधीच्या लोगोचा आधार घेत मर्सिडीजचा तारा विकसित केला. हा लोगो अत्यंत सोपा आणि तेवढाच अर्थपूर्ण आहे. आम्ही आकाश, पाणी आणि जमीन या तिन्ही प्रकारच्या वाहतुकीत अग्रेसर आहोत, असे तीन टोकांचा हा तारा ध्वनित करतो.

पोर्श
ऑटोमोबाइल क्षेत्रातील अत्यंत प्रभावी कंपन्यांपकी एक असलेल्या पोर्शचा लोगोही तसाच उठावदार आहे. हा लोगो थेट जर्मन देशाचेच प्रतिनिधित्व करतो. जर्मनीतील श्टय़ुटगार्ट शहराचे प्रतिनिधित्व या लोगोमध्ये आहे. श्टय़ुटगार्ट हा शब्द जर्मन भाषेतील श्टय़ुटेनगार्टेन या शब्दावरून तयार झाला आहे. श्टय़ोटेन म्हणजे घोडय़ांचे ब्रिडिंग आणि गार्टेन म्हणजे उद्यान. त्यामुळे या लोगोचा प्रमुख घटक घोडा आहे. या लोगोतील लाल-काळ्या पट्टय़ा किंवा काळ्या रंगातील शिंगं हे व्युर्टेम्बेर्ग साम्राज्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे हा लोगो खऱ्या अर्थाने जर्मनी या देशाचे प्रतिनिधित्व करतो.

फोर्ड
अमेरिकन ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे फोर्ड. वास्तविक या फोर्डचा लोगो इतर कंपन्यांच्या लोगोच्या तुलनेत एवढा आकर्षक नाही. पण या लोगोतील ‘फोर्ड’ या शब्दांची रचना १९०९मध्ये सी. हॅरॉल्ड विल यांनी केली होती. तेव्हापासून या कंपनीच्या लोगोमध्ये अनेक बदल झाले, पण ही शब्दरचना आहे तशीच आहे. फोर्ड कंपनीचा सध्या अस्तित्वात असलेला लोगो १९७६मध्ये निश्चित करण्यात आला. तोपर्यंत या कंपनीने आपल्या लोगोमध्ये सहा वेळा बदल केला होता. यातील अंडाकृती गोल म्हणजे अत्यंत विश्वसनीय आणि जनसामान्यांना परवडणारे वाहन, याचे द्योतक आहे. तर यात असलेला नेव्ही ब्लू कलर खरं तर काहीच सांगत नाही. पण तो उठावदार दिसतो, एवढं नक्की!

रोल्स रॉइस
गाडय़ांच्या जगातील सम्राज्ञी कोण, असा प्रश्न विचारला तर रोल्स रॉइस हे उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. बघताक्षणी कोणाचंही लक्ष वेधून घेणाऱ्या या गाडीचा लोगोही तसाच आहे. एकदा बघितल्यावर हा लोगो विसरणं शक्यच नाही. या लोगोत एकावर एक कोरलेले दोन ‘आर’ आहेत. हे दोन्ही ‘आर’ म्हणजे रोल्स आणि रॉइस या दोन कंपन्यांचे प्रतीक आहेत. या दोन भागीदारांमधील सामंजस्य या लोगोमधून दिसून येतं. त्याशिवाय रोल्स रॉइसच्या गाडय़ांवर दिसणारी ‘फ्लाइंग लेडी’ हेदेखील या गाडीच्या बाबतीतलं लोकांचं कुतूहल आहे. गाडी सुरू झाल्यानंतर बॉनेटमध्ये लपलेली ही बाहुले अलगद वर येते आणि भल्याभल्यांचे डोळे विस्फारतात. मात्र या ‘फ्लाइंग लेडी’चा वापर कंपनीतर्फे खूपच कमी वेळा केला जातो.

ऑडी
हे नाव उच्चारल्याबरोबरच ऑलिम्पिकच्या लोगोप्रमाणेच एकमेकांमध्ये गुंतलेल्या चार िरगा डोळ्यासमोर येतात. प्रत्यक्षात या िरगांचा अर्थ, ऑडी कंपनीचा भाग असलेल्या चार वेगवेगळ्या कंपन्यांचे सहकार्य, असा आहे. ऑगस्ट हॉर्ख या संस्थापकाच्या हॉर्ख या आडनावाचे लॅटीन भाषांतर म्हणजे ऑडी! तर या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘ऐका’ असा होतो. तर ही कंपनी स्थापन करण्याआधीच्या भागीदार कंपन्या, म्हणजेच ऑडीच्या लोगोमधील चार िरगा म्हणजेच ऑडी, हॉर्ख, डाम्प-क्राफ्ट-वागेन (डीकेडब्लू) आणि वांडरर या चार जर्मन कंपन्या.

वोल्व्हो
या कंपनीच्या लोगोचा अर्थ अत्यंत प्राचीन काळात दडलेला आहे. प्राचीन संस्कृतीत या लोगोची खूण लोखंड या अर्थाने वापरली जात होती. एक गोल आणि ऊध्र्व दिशेला असलेले बाणाचे टोक हा लोगो मंगळ ग्रह दाखवण्यासाठीही वापरला जातो. तसेच रोमन सम्राट या लोगोचा वापर युद्धदेवतेचे प्रतीक म्हणून करत असत. या लोगोचा अर्थ आताच्या काळात ‘पुरुष’ किंवा नर या खुणेसाठीही केला जातो. पण वोल्व्हो कंपनीचा विचार केल्यास ही स्विडिश कंपनी आहे. स्विडनमध्ये सापडणारे लोखंड हे अधिक मजबूत आणि टिकावू मानतात. या कंपनीला आपल्या लोगोमधून नेमकं हेच ध्वनित करायचं होतं.

-रोहन टिल्लू

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car companies logos
First published on: 15-05-2015 at 09:29 IST