पंचवीस वर्षांपूर्वी मी प्रथम जेव्हा गाडी शिकले तेव्हा आमच्याकडे फियाट कार होती. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन, गाडी चालविण्याचा सराव करून गाडी शिकले. प्रथम घाबरत घाबरत गाडी चालवू लागले. त्यानंतर सराव झाल्यावर मात्र सफाईदारपणे कार चालवू लागले. नंतरच्या वर्षांत आम्हीपण अनेक कार बदलल्या, त्यामुळे मारुती व्हॅन, व्ॉगनार, मारुती ८००, इंडिका अशा सर्व प्रकारच्या गाडय़ा चालवल्या व गेली १० वर्षे होंडासिटी गाडी चालवते आहे. पुणे शहरात तर दररोजच, पण पुण्याबाहेरही हायवेवर चालविण्याचा भरपूर सराव आहे. अनेकदा मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आम्ही तिघींनीही लांबचा प्रवास केलेला आहे. अर्थात माझ्या यजमानांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासानेच मी आत्मविश्वासाने कार चालवू शकते. त्यामुळे गाडी चालवण्याचा खूप अनुभव आहे.
साधारणपणे पाच वर्षांपूर्वीची घटना आहे. मी, माझी मैत्रीण व दोन जावा अशा चौघी जणी कारने पुणे-अकलूज असा प्रवास सोलापूर हायवेवरून केला. अकलूज-पुणे अशा परतीच्या प्रवासात मी गाडी चालवीत होते. सोलापूर रस्ता त्या वेळी खूप अरुंद होता. मुख्य रस्त्याकडेच्या शेतांपेक्षा तीन फूट उंचीवर होता. त्यामुळे डावीकडे मुख्य रस्त्यावरून थोडीसुद्धा गाडी खाली उतरविणे शक्य नव्हते. अशात समोरून एक इंडिका गाडी भरवेगात ट्रकला ओव्हरटेक करून माझ्या गाडीपुढे आली. डावीकडे गाडी घेण्याचा प्रश्नच नव्हता, कारण रस्ताच नव्हता. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून मी सावधपणे गाडी उजवीकडे घेतली. इंडिका गाडी मी सफाईदारपणे चुकवली होती. इंडिका गाडी तर पास झाली, पण त्या प्रयत्नात मी मात्र पूर्ण रस्त्याच्या उजवीकडे मध्यावर होते. ज्या ट्रकला ओव्हरटेक करून इंडिका माझ्यापुढे आली होती, तो ट्रक समोर यमासारखा येत होता. मी तत्परतेने पुन्हा गाडी डावीकडे घेतली. या एका मिनिटात माझ्या काळजाचा ठोका चुकलाच होता, कारण माझ्याबरोबर अजून तीन जणींचे जीव धोक्यात आले असते. आम्ही चौघीही आपण मोठा अपघात होण्यापासून वाचलो, असा विचार करत असतानाच मी डावीकडे गाडी थांबवली. आम्ही सर्व जणीच घाबरलो होतो. नेमके काय झाले व या प्रसंगातून आपण कसे बाहेर पडलो यावर बोलू लागलो. मी त्या वेळी नेमकी गाडी कशी चालवली हे मला कळलेच नाही; पण माझ्या अनेक वर्षांच्या गाडी चालविण्याच्या अनुभवामुळे माझ्याकडून नकळतपणे योग्य निर्णय घेऊन कृतीपण झाली होती.
माझ्याबरोबर असलेल्या मैत्रिणीलाही गाडी चालविता येत होती. तिने मला विचारले की, ‘मी गाडी चालवू का?’ तेव्हा मी थोडा विचार करून तिला म्हणाले, ‘नाही, ५ ते १० मिनिटे थांबून मग आपण निघू.’ कारण त्या क्षणी मी खूप गोंधळले होते. मन स्थिर होण्यासाठी तेवढा वेळ मला पुरेसा होता. तेव्हा मला असे वाटले, जर मी आता तिला गाडी चालवायला दिली तर माझा गाडी चालविण्याचा आत्मविश्वास कमी होईल व पुन्हा हायवेवरून गाडी चालवताना मला भीती वाटू शकेल म्हणून मीच पुण्यापर्यंत गाडी चालवली. अजूनही तो प्रसंग आठवला की, माझ्या अंगावर काटा येतो व माझे प्रसंगावधानही आठवते.
आज वाहनांची संख्या वाढली आहे व चालविण्यात बेशिस्तपणाही दिसतो. या बेशिस्तपणामुळे लोकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम लक्षात घेऊन वाहन चालवावे व स्वत:बरोबर दुसऱ्याचाही जीव वाचवावा.
प्रा. विद्या कचरे, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा.
ls.driveit@gmail.com

Web Title: Car driving with confidence
First published on: 22-05-2015 at 02:57 IST