*माझे बजेट तीन लाख रुपये आहे. मी नॅनो कार घेण्याच्या विचारात आहे; परंतु थोडा द्विधा मन:स्थितीत आहे, कारण नॅनो ट्विस्टमध्ये पॉवर स्टीअरिंग, सेंट्रल लॉकिंग, एसी, म्युझिक सिस्टम आहे, तर सीएनजी घेतल्यास एसीशिवाय काहीही सुविधा नाहीत. माझ्या घरापासून कंपनी सहा किमी दूर आहे. कंपनीकडून ३७ लिटर पेट्रोल मिळेल. महिंद्राचीही विजेरीवर चालणारी ई२० ही गाडी आहे, मात्र तिची किंमत पाच लाख रुपये आहे. काय करावे?
 – महेंद्र शहाणे, मोहोपाडा, खालापूर, जि. रायगड
*वस्तुत: तुमचे एकंदर बजेट पाहता तुम्हाला महिंद्राची ई२० परवडणारी नाही. शिवाय ही गाडी विजेरीवर चालणारी आहे. त्यामुळे ठरावीक अंतरानंतर तुम्हाला तिचे चार्जिग करावे लागेल. तशी सुविधा तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी असणे सध्या तरी अशक्य दिसते आहे. परिणामी तुम्ही सध्या तरी महिंद्रा ई२०चा विचार न केलेलाच बरा. आता दुसरा मुद्दा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्हाला कंपनीकडून ३७ लिटर पेट्रोल मिळेल. ते मासिक आहे की वार्षिक हे आधी तपासून घ्या. तुमच्या घरापासून कंपनीपर्यंतचे अंतर अगदीच किरकोळ आहे, त्यामुळे तुम्हाला नॅनो गाडी अगदी सहज परवडणारी आहे. म्हणून तुम्ही पेट्रोल व्हर्जनवर चालणारी नॅनो ट्विस्ट घ्यावी, जेणेकरून त्यातील सर्व सुविधा तुम्हाला मिळू शकतील. सीएनजीवर चालणारी नॅनो तुम्हाला नको आहे असे एकंदर तुमच्या पत्रातील मजकुरावरून वाटते.
*मारुतीची सेलेरिओ (सीएनजी व्हर्जन) घेण्याची माझी इच्छा आहे, मात्र मी असे ऐकले आहे की, तिचे इंजिन पेट्रोलच्या साह्य़ाने चालू होते आणि नंतर ती सीएनजी मोडमध्ये चालते. सीएनजी गाडी घेतल्यास ती नेहमी चालवणे भाग असते का? तसे न केल्यास तिचे नुकसान होते का?
– सूरज सोनुळे
*सीएनजीवर चालणारी गाडी चांगली नाही असे म्हणणे अयोग्य ठरेल, मात्र हे खरे की, तिचा मेन्टेनन्स राखणे आवश्यक असते; परंतु ती नेहमी चालवणे भाग असते किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे. तुम्ही सीएनजी किट बसवून देणाऱ्यांकडेच याची जास्त चौकशी करा, तेच योग्य होईल. सेलेरिओ सीएनजी हा एक चांगला पर्याय आहे.
*मला डाटसन गो कार घ्यायची आहे. तिच्याबद्दल काही सांगा. तसेच मुंबईत तिचे सव्‍‌र्हिस सेंटर्स आहेत का हेही सांगा. तसेच त्याच बजेटमधल्या इतरही कार सांगा..
– रघु मोर्ये
*डाटसन गो ही एन्ट्री लेव्हची हॅचबॅक कार आहे आणि ते निसान कंपनीचे जॉइंट व्हेंचर उत्पादन आहे. त्यामुळे निसानच्या कोणत्याही शोरूममध्ये ही गाडी उपलब्ध आहे. मुंबईत वरळी आणि अंधेरीला या गाडीचे शोरूम आहे. डाटसन ही बजेट कार असल्याने घ्यायला काही हरकत नाही. याच बजेटमध्ये तुम्हाला मारुतीची सेलेरिओही उपलब्ध होऊ शकते.
*मला प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करायचा आहे. माझे बजेट १२ लाख रुपये आहे. रोजचे साधारण ४०० किमी अंतर गाडी चालणार आहे. नऊ ते १२ आसनक्षमता असलेली कोणती गाडी घेऊ? – मोतीसागर सोनवणे, मुंबई
*तुम्हाला महिंद्राची क्रूझर गाडीच घ्यावी लागेल, कारण एवढी आसनक्षमता असलेली ती एक गाडी आहे, शिवाय तुमच्या बजेटातलीही आहे.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take any one at home
First published on: 28-08-2014 at 07:33 IST