म्हातारपण हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य टप्पा. तो कधी ना कधी येणारच हे सगळ्यांनाच माहीत असते. मग तो अधिकाधिक आनंददायी करण्यासाठी आपण काय करतो?

‘‘मी बावन्न वर्षांचा होतो तेव्हा माझ्या देशाने असे ठरवले की मला नोकरीवरून काढून टाकावे, माझ्या हातात पगार ठेवणे त्यांना गरजेचे वाटले नाही आणि अर्थात ही बातमी ऐकून मुले आणि पत्नी मला सोडून निघून गेले आणि हातात फक्त भेंडोळे उरले माझ्या पीएच.डी. पदवीचे! त्यानंतर मी देश सोडला, देशोधडीला लागलोच होतो.. पुढची अनेक वर्षे मी कचरा आणि मला वाहून नेणारा ट्रक चालवला आणि पुढे छोटे-मोठे व्यवसाय, नोकरी करत आता ७५ व्या वर्षी मी इथवर पोहोचलो आहे..’’ मी ऐकून सुन्न झाले, मी ज्या औषधांच्या कंपनीशी करार करायला रशियाला आले होते तिथल्या मालकाची ही हेलावून टाकणारी कथा ऐकून! पश्चिम आशियातल्या एका अतिशय प्रस्थापित व्यावसायिकाशी मी बोलत होते आणि मला एक क्षणदेखील असे वाटले नव्हते की मी असली काही कथा त्याच्याकडून ऐकेन! तरी माझा प्रश्न निराळाच होता, जर भारतातल्या कोण्या बावन्न वर्षीय माणसाला असले काही भोगावे लागले तर काय असेल त्याची प्रतिक्रिया? काय करेल तो? असेल का तो इतका सकारात्मक? इतका जिद्दी आणि इतका अधिक निश्चयी? उभे करेल तो निराळे विश्व, पुन्हा शून्यातून? बावन्नाव्या वर्षी? मला बरीच वर्षे हा प्रश्न पडत राहिला आणि गेल्या काही वर्षांत मी वृद्धांच्या संगोपन क्षेत्रांत काम करू लागले तसे तसे मला हा प्रश्न किती गहन आहे याची जाणीव अधिक झाली!

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

खरेच कसा आहे आपल्याकडला ५० वर्षीय इसम? काय आहे त्याची मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक परिस्थिती? आपले नामांकित सिनेकलाकार आहेत आता पन्नाशीत, मात्र सामान्य माणूस, स्त्री किंवा पुरुष, नेमका काय विचार करतो आहे आयुष्यातल्या या टप्प्याचा?

पुढील दहा वर्षांत आपण निवृत्त होणार आहोत, आयुष्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आपण गाठणार आहोत, याचा सखोल विचार कितपत करत आहोत आपण? पुढील आयुष्याचे कितीसे नियोजन करत आहोत किंवा आजवर केले नसेल तर ते कधी करणार आहोत, याचा तरी विचार झालाय का?

बदलत्या काळात पन्नाशी ही नवीन तिशी आहे वगरे बरेच ऐकू येत असते, मात्र हे कितपत खरे आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे! कारण कितीही वागणे, दिसणे बदलले तरी वय एक वेळ लपेल मात्र ते कमी होणार नाहीच आहे! त्याउलट जर आपण तयारी आणि नियोजन करू शकलो आपल्या निवृत्तीचे आणि निवृत्तीनंतरच्या काळाचे, त्याच्या विशिष्ट  गरजा समजून घेऊ शकलो तर अधिक बरे होईल असे वाटते!

या वयाच्या टप्प्यावर मला वृद्धत्व, त्याची मानसिक तयारी, स्वीकृती आणि त्यावर आपली स्वकृती हे सगळेच महत्त्वाचे वाटते. त्यात आपण काही विशिष्ट वर्गीकरण करू शकतो.

शारीरिक तयारी :

लहानपणापासून आपण अनेक अवयव गृहीत धरत आलेलो असतो. आपण कायम नीट बघू शकू, सांधे नीट साथ देतीलच, मेंदू कायम तल्लख राहीलच, पचनक्रिया उत्तम राहीलच, सर्व दात शाबूत राहतील, त्वचा तुकतुकीत राहील आणि हृदय सतत धडधडत राहीलच! मात्र चाळिशीत कामाच्या व्यापात जे चट्कन जाणवत नाही ते पन्नाशीत हमखास जाणवते, अचानक दम लागू लागतो, खाली कधी बसलोच तर उठताना हात जमिनीशी नेऊन मग उठावे लागते. दूरवरून येणारी गाडी जरा धुरकट धूसर दिसून जाते एखाद्या क्षणी आणि वाटेत भेटणारी व्यक्ती अनोळखी आहे अशी खात्री असते, मात्र ती व्यक्ती अतिशय आदराने, प्रेमाने बोलत राहते! तिशीपासून डाय करून लपवलेले केस आता अधिक अधिक करडे होऊ लागलेले असतात. रात्रीचे जागरण आता अजिबात सहन होत नसते आणि मुलांचे वाद आणि प्रतिवाद तर अजिबात नाही! अमेरिकन मध्यमवयीन व्यक्ती या टप्प्यावर साधारण तब्येतीची सर्वात जास्त काळजी घेऊ लागते. पुढली सर्व वाटचाल साधारण लक्षात आलेली असते आणि इथून पुढे जर नियमित व्यायाम, इतर आरोग्यदायी सवयी अंगीकारल्या नाहीत तर धडगत नाही असे काहीसे उमजून शारीरिक मेहनत अधिक करू लागते. लोक व्यायामाचा सराव करू लागतात, काही जुन्या सवयी सुधारून पाहतात नाही तर नवीन जोडतात, एकंदरीत एक निराळे महत्त्व देतात पन्नाशीला. जपानी आणि युरोपीय व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात तसेच करताना दिसतात. भारतात देखील आता अशा प्रकारचे आरोग्यदायी चित्र हळूहळू दिसू लागले आहे. पन्नाशी हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे, इतपत तरी विचार करून शरीरस्वास्थ्य राखण्याकडे कल हवा. जो आजवर गृहीत धरला त्या देहाची निगा कसोशीने राखणे, पन्नाशी गाठली त्याबाबत एकंदरीत शरीराचे आभारी असणे आणि इथून पुढल्या वाटचालीसाठी सज्ज होणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

आर्थिक तरतूद

वैद्यकशास्त्राची प्रगती हे मानवजातीला जणू वरदान मिळाले आहे, आज मनुष्य सहज ८०-८५ पर्यंत जगतो, याचाच अर्थ असाही होतो की साधारण ३५ वर्षे नोकरी केली तरी साठीच्या पुढे किमान पंचवीस वर्षे शिल्लक आहेत आणि त्या सर्व वर्षांची तरतूद नेमकी कशी केलेली आहे आपण? पन्नाशीच्या आसपासच्या व्यक्तींना मुले असल्यास मुलांची शिक्षणे, लग्न असले मोठे खर्च होत असतात. वाढती महागाई, घटते व्याजदर अशा बाबी तर आल्याच मात्र काही बाबी माहीत असून आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो, जसे की दुर्धर आजार, प्रलंबित इस्पितळ वारी किंवा अचानक येणारे आíथक, राजकीय, नसíगक किंवा कौटुंबिक संकट. यातील बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असू शकतात हेच कधी कधी आपण विसरतो. शरीर स्वास्थ्य राखले, तर पुढे उद्भवणारा रुग्णसेवेचा खर्च निश्चित कमी असेल. योग्य तपासण्या करून घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. जगात सर्वत्र हेच दिसते की लोक जास्त विचारपूर्वक खर्च करतात. पुन:पुन्हा तपासून आíथक नियोजन करतात आणि सावध पवित्रा घेतात, खर्चात आणि एकूण सर्वच आíथक व्यवहारात. कुठे तरी पन्नाशीपर्यंत जर आíथक नियोजनाचे गणित सुटले नसेल तर मात्र शेवटच्या क्षणाची धडपड थोडी अधिक तापदायक होऊ शकते हे निश्चित. आपल्या गरजा कमी करायच्या, का आहे त्या आíथक स्तरात तितकाच खर्च करत वावरत राहायचे या मूलभूत प्रश्नाचे उत्तर आपापल्यापुरते मिळाले तरी इथून पुढला मार्ग अधिक सुकर होऊ शकेल हे निश्चित.

भावनिक जडणघडण

वय वाढते तसे तसे लोक अधिक हळवे, संवेदनशील होत जातात. कुठे तरी अमर्त्य असण्याचा आव असतो तो गळून पडतो आणि वास्तव दिसू लागते. त्याचबरोबर मुलांचे शिक्षण, नोकरीनिमित्त घरातून बाहेर पडणे होत असते. भारतातदेखील शहरी आणि ग्रामीण भागात हे चित्र आता सर्रास बघायला मिळते. तर अशा वियोगानंतर पती-पत्नी दोघे एकमेकांना पुन्हा वेळ देऊ शकतात, पुन्हा एकमेकांचे नाते अधिक निराळ्या पद्धतीने जाणून घेऊ शकतात, फुलवू शकतात. पन्नाशी असाही एक टप्पा आहे, जिथून पुढे जाताना नियोजन असल्यास वाट सुकर होऊ शकते. या वाटेवर सुसंवाद हवा, मत्री हवी आणि स्वच्छ जाणीव हवी स्वत:च्या शक्ती आणि मर्यादांची! पन्नाशी जसा म्हातारपणाचा पहिला टप्पा तसाच तो कुठे तरी पूर्ततेचादेखील सुरेख टप्पा आहेच. स्वत:ची, स्वत:च्या कुवतीची अधिक स्पष्ट जाणीव झालेली असते. भलेबुरे दिवस, लोक आणि सभोवताल आपण अनुभवलेले असते आणि त्या प्रत्येक बाबतीत आपले असे काही ठाम आणि आपल्यापुरते मत तयार झालेले असते. आपल्याला नक्की कुठवर ताणता येते आणि कुठे सोडून द्यायचे तेही पक्के उमगते तो निर्णायक टप्पा म्हणजे पन्नाशी. एक समंजस भान आजूबाजूचे आणि एक प्रौढ आत्मभान आल्याचा हा टप्पा जिथून पुढे लोक काय म्हणतात, लोकांना काय वाटेल याची भीती किंवा संकोच वाटेनासा होतो. अमेरिकेत लोक या टप्प्यावर टोकाचे निर्णय घेताना दिसतात, लोकलज्जेस्तव जपलेला संसार सोडून देतात, कुणी नवे सहचर शोधतात तर कुणी आपली लैंगिक ओळखदेखील बदलून टाकतात, कोणी नवे व्यावसायिक धाडस स्वीकारतात, तर कोणी एखादी जुनी इच्छा किंवा छंद जोपासतात. कुठे तरी समाजाचा जो अनामिक जाच असतो किंवा भासतो त्या पलीकडले आपले अस्तित्व तपासून ते स्वीकारू पाहतात. युरोपमध्येदेखील या टप्प्यावर लोक नवे छंद, ध्यास किंवा व्यवसाय, नवीन नाती शोधू लागतात किंवा असलेल्या नात्यांची नवीन परिभाषा समजून घेतात. जपानमध्ये लोक जास्त कामात गर्क दिसतात आणि एकंदर एकलकोंडा समाज असल्याने एकटेपणात अधिक मग्न होतात. ते तितकेसे चांगले नाहीच, कारण इथून पुढे माणसे अधिक महत्त्वाची, शेवटी माणसाची ओळख त्याच्या नोकरीतून नाही तर त्याने जोडलेल्या लोकांनी बनते, हे कुठे तरी पटू लागते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे जगण्याचे भान आलेले असते त्याचे आपण काय करतो हे निर्णायक ठरते. आता काय वय झाले, म्हणून खचणारी मंडळी असतात, तर काही अजून कुठे सरले आहे वय, म्हणून वास्तव नाकारणारी मंडळी असतात. मात्र हे दोन्ही पर्याय तितकेसे योग्य नाहीत. योग्य पर्याय आहे आयुष्याशी मत्री करणे, इथून पुढची वाटचाल जर  एव्हरेस्ट शिखर सर करण्यासारखी मानली तर पन्नाशी हा बेस कॅम्प आहे, इथवर यायलादेखील खूप कष्ट पडतात निश्चित; मात्र याहून अधिक अडथळे येतील, मनाचा निश्चय खचेल, मात्र सकारात्मक विचारांची, आयुष्यातल्या मोजक्या अनुभवांची शिदोरी असेल तर नक्कीच पुढची सर्व हिमशिखरे आपण सर करू शकतो!

प्राजक्ता पाडगावकर – response.lokprabha@expressindia.com