परम तत्त्वाच्या प्राप्तीची साधना केवळ नरदेहाच्या योगेच शक्य आहे. म्हणून या देहाची इच्छा देवाधिकांनाही आहे. भगवान कृष्ण हे रहस्य परम सखा उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणतात, ‘‘उद्धवा काय सांगों गोष्टी। बहुत शरीरें सृजिलीं सृष्टीं। मज नरदेहीं आवडी मोठी। उठाउठीं मी होती॥२४२॥’’ (अ. ७). कृष्ण प्रेमभरानं सांगत आहे की, ‘‘सख्या उद्धवा तुला किती म्हणून सांगू! या सृष्टीत मी अनंत प्रकारची शरीरे निर्माण केली, पण मला नरदेहाचीच फार आवड! कारण तो देह धारण करणारेच केवळ साधनेनं मद्रूप होऊ शकतात!’’ भगवंत सांगत आहेत, ‘‘केलीं एकचरणी शरीरें। दोंपायांचीं अपारें। तींपायांचीं मनोहरें। अतिसुंदरें चतुष्पदें॥२४३॥ सर्पादि योनींच्या ठायीं। म्यां चरणचि केले नाहीं। एकें चालती बहु पायीं। केलीं पाहीं शरीरें॥२४४॥’’ म्हणजे, मी एका पायापासून ते चार पायापर्यंतची पशू-पक्ष्यांची अपार शरीरं निर्माण केली. सर्पयोनीत तर बिनपायाची शरीरंही उत्पन्न केली, असं भगवंत सांगत आहेत. हे सांगणं अगदी गूढ आहे बरं का! कारण पाय हे गतीचं सूचन करतात. मार्गाचं आणि ध्येयशिखरापर्यंतच्या वाटचालीचं सूचन करतात. इथं पाय असूनही आणि नसूनही या पशू-पक्ष्यांना ‘चालण्याची’ क्षमता आहे, पण परम तत्त्वापर्यंत पोहोचण्याची क्षमता नाही, हेच भगवंताला सांगायचं आहे! म्हणूनच भगवान कृष्ण पुढे म्हणतात, ‘‘ऐशीं शरीरें नेणों किती। म्यां निर्माण केलीं ये क्षितीं। मज कर्त्यांतें नेणती। मूढमति यालागीं॥२४५॥’’ अरे उद्धवा, अशी कित्येक शरीरं मी निर्माण केली, पण ती कर्त्यां ईश्वराला जाणू शकत नाहीत, कर्त्यां ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, म्हणून त्यांची मती मूढ आहे! मग भगवंत सांगतो की, माझी प्राप्ती ज्या देहात राहून सहजसाध्य आहे तो मानवदेहच आहे! मला प्राप्त करून घेण्याचं सर्व ज्ञान मी त्या देहात घातलं आहे! (मज कर्त्यांची प्राप्ति। होआवयालागीं निश्चितीं। स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती। पौरुषी प्रकृति म्यां केली॥२४६॥). त्यामुळेच ज्या देहाच्या योगे माझ्यापर्यंत पोहोचता येतं त्या देहावर माझं प्रेम आहे. श्रुतिही त्या देहाची थोरवी गातात आणि देवांनादेखील त्या देहाची वांछा असते.(जेणें देहें मज पावती। त्या देहाची मज अतिप्रीति। यालागीं श्रुति नरदेह वर्णिती। देव वांछिती नरदेहा॥२४७॥). आता हा देह ढोबळपणे दोन प्रकारचा आहे. स्थूल आणि सूक्ष्म. ‘देहच मी’ या दृढ भावनेनं जगत असताना, आपला स्थूल देह तर आपल्या मनात असतोच, पण सूक्ष्म जाणिवेच्या रूपानंही त्याचं अस्तित्वभान असतं. या स्थूल आणि सूक्ष्म देहांपासूनही निíलप्त असं आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला सदैव सहज आत्मभान आहे. स्थूल आणि सूक्ष्म देहजाणिवेत वावरत असतानाही माणसाच्या रोजच्या जीवन व्यवहारात देहातीत असं परम ज्ञान झळकून जातं, पण त्याला ते उमगतही नाही, असंही भगवंत सांगतो! (जीव उभय देहीं वर्ततां। प्राणियांसी देहातीतता। स्फुरत असे सर्वथा। तोचि तत्त्वतां नेणती॥२५६॥). हे ज्ञान कसं प्रकटतं? भगवंत सांगतो, ‘‘म्हणे ‘माझा डोळा दुखों लागला’। परी न म्हणे ‘मीचि दुखों आला’। ‘माझा पावोचि मोडला’। परी ‘मी मोडला’ हे न म्हणे ॥२५७॥ (अ. १०).’’ म्हणजे, ‘देहच मी’ या भावनेत दृढपणे स्थित असूनही, डोळा दुखू लागला, तर ‘मी’ डोळा होत नाही! ‘माझा डोळा दुखतोय’ असं तो म्हणतो. म्हणजेच, वेदनेची जाणीव असणारं काही वेगळं तत्त्व विद्यमान आहे, याचंच ते नकळत सूचन असतं. – चैतन्य प्रेम