मूर्ती पूज्य आहेतच, पण एकनाथ महाराजांना त्याच पूज्यभावानिशी माणसाला सद्गुरूपर्यंत नेऊन सोडायचं आहे! त्यासाठी ते मूर्तीहून ब्राह्मण, त्याहून वेदवेत्ता म्हणजे वेदातलं ज्ञान सांगणारा ब्राह्मण आणि त्याहून वेदशास्त्रसंपन्न म्हणजेच वेदातलं ज्ञान ज्याच्या अनुभूतीत सामावलं आहे असा ब्राह्मण श्रेष्ठ आहे, असं सांगतात. आता ‘ब्राह्मण’चा अर्थ जातीय निकषावर अभिप्रेत नाही. ‘ब्राह्मण’ शब्दाचा खरा अर्थ जो ब्रह्म जाणतो तो, असा आहे. त्या व्यापक अर्थाचाही इथं संकेत नाही. मग इथं ब्राह्मण, वेदवेत्ता ब्राह्मण आणि वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण; या शब्दांतून नाथांना नेमकं काय अभिप्रेत आहे? तर ज्ञान परंपरेचा वारसा असलेला, पण त्या ज्ञानाचा अनुभव नसलेला प्राथमिक पातळीवरचा जाणकार, त्यापुढे ते ज्ञान सांगता येणारा, पण त्याचा अनुभव नसलेला दुसऱ्या पातळीवरचा जाणकार आणि त्या ज्ञानाचा अनुभव असलेला तिसऱ्या पातळीवरचा जाणकार; अशी क्रमवारी नाथांना अभिप्रेत आहे. मूर्तिपूजेत स्थिर होत असलेल्या माणसाला भाव अनुभूतीच्या क्षेत्राकडे अग्रेसर व्हायचं असेल, तर त्या वाटचालीत आधीपासूनच सहभागी असलेल्यांचा वाढता सहवास लाभणं सुरू व्हावं, ही इच्छा त्यामागे आहे.

असं समजा सरकारी कार्यालयात आपलं काही काम आहे. तर आपण प्रथम काय करू? त्या कार्यालयातील कोणाशी तरी ओळख काढून त्याला भेटू. का? तर त्याला थोडं तरी काही सांगता येईल, असं वाटतं म्हणून. ही झाली अध्यात्म्याच्या वाटचालीतील पहिल्या पातळीवरील माहीतगार भासत असलेल्या जाणकाराची भेट! आता तो ओळखीचा कर्मचारी ज्या विभागात हे काम आहे त्या विभागात त्याच्या ओळखीच्या माणसाकडे पाठवतो. हा झाला दुसऱ्या पातळीवरचा जाणकार! जसा तिकडचा वेदवेत्ता, वेदांची चांगली तोंडओळख असलेला. मग तो कर्मचारी हे काम जो निश्चित करू शकेल, त्याच्याकडे मला पाठवतो. त्याला हे काम नेमकेपणानं माहीत असतं, त्या कामाचा अनुभव असतो. हा झाला ज्ञानाची अनुभूती असलेला तिसऱ्या पातळीवरचा जाणकार. पण इथंच ज्ञानाची परंपरा थांबते. कारण ज्ञानाचा अनुभव असला तरी तो इतर कुणाला देण्याची पात्रता असतेच असं नव्हे! त्यामुळे भावाची अनुभूती हवी असेल, तर भावतन्मय भक्त आणि अखेरीस भावाचार्य सद्गुरू, यांच्याकडेच जावं लागेल!

म्हणून नाथ महाराज सांगतात, ‘‘त्यांहीमाजीं जे भागवत। भागवतधर्मी नित्य निरत। जे निष्कम्रेसीं भगवद् भक्त। ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णीं॥ ५७४॥ ज्यांसी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ। ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ। ऐसे जे भगवद्भक्त। ते पूज्य निश्चित निजभक्तां॥ ५७५॥’’ नाथ म्हणतात, ज्यांचा प्रपंचसुद्धा परमार्थच झाला आहे, भगवंतकेंद्रित जाणिवेनं जे संसारात वावरत आहेत, परमात्म्याशी जे अनन्य आहेत आणि ज्यांच्या सर्व भावना दिव्य जाणिवेत एकवटल्या आहेत अशा भक्तांचा सहवास हा ज्ञान्यांच्या सहवासापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्ञान्याला अहंकाराचा स्पर्श होऊ शकतो. पण जो खरा भक्त आहे तो स्वत:ला सामान्याहून सामान्य मानत असतो. खरा कर्ता भगवंतच आहे, ही त्याची जाणीव पक्की झाली असते. त्यांचा सहवास हा अमीट असा भावसंस्कार करणारा असतो. त्यांच्या सहज वागण्या-बोलण्यातून भक्तीची मुळाक्षरं प्रकट होत असतात. – चैतन्य प्रेम