पृथ्वीकडून अवधूतानं कोणते गुण स्वीकारले, आत्मसात केले, अंगी बाणवले, ते अवधूत सांगत आहे. पृथ्वी अखंड आहे, पण माणसानं तिचे तुकडे पाडले. त्या तुकडय़ांबाबत आसक्त होऊन तो ‘हे माझं शेत, ही माझी जमीन, ही माझी मालमत्ता, हे माझं वैभव’ असं म्हणून त्यांना कवटाळून जगत राहतो. इतकंच कशाला? अवधूत म्हणतो, ‘‘येथ भूतीं पृथ्वी पूजिली। नातरी विष्ठामूत्रीं गांजिली। हर्षविषादा नाहीं आली। निश्चळ ठेली निजक्षांतीं॥३६७॥’’ म्हणजे, या पृथ्वीची कोणी नारळ वाढवून पूजा करो की विष्ठा-मूत्रानं ती मलिन करो; तिला त्या पूजेनं ना आनंद होतो, ना मलिन झाल्याचं दु:ख होतं. पुढे अवधूत म्हणतो, ‘‘आतां पृथ्वीची अभिनव शांति। ते सांगेन राया तुजप्रती। जे शांति धरोनि संतीं। भगवद्भक्ती पावले॥३७०॥’’ अवधूत म्हणतो की, हे राजा, पृथ्वीची शांती ही खरंच अद्भुत आहे. संतांनी ती स्वीकारल्यानं त्यांच्या जगण्यात सहज शांतीचा प्रत्यय येतो. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या अंत:करणावर त्या शांतीचा संस्कार झाल्याशिवाय राहत नाही. या शांतीमुळेच हे संत भगवंताच्या भक्तिप्रवाहात आकंठ बुडाले. मग अवधूत सांगतो, ‘‘पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली। नांगर घालूनि फाळिली। लातवरीं तुडविली। तोडिली झाडिली पैं भूतीं॥३७१॥ तो अपराधु न मनूनि क्षिती। सवेंचि भूतांतें प्रसन्न होती। तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती। तृप्ति देती भूतांतें॥३७२॥’’ म्हणजे, या पृथ्वीला आगीनं भाजतात, नांगरानं जमीन नांगरतात, कुदळीनं तिच्यावर घाव घालतात, लाथेनं तुडवतात, झोडपतात.. पण तरीही ही धरणी राग मानत नाही. उलट अन्नधान्य, फळं-फुलं आणि भाज्या भरभरून पिकवते. माणसाला तृप्त करते. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘एकें अपराधु केला। दुजेनि उगाचि साहिला। इतुकेनि शांतु केवीं झाला। उपेक्षिला अपराधी॥३७४॥’’ एकानं अपराध केला आणि दुसऱ्यानं तो मुकाटय़ानं सहन केला, पण एवढय़ानं तो शांत झाला, असं म्हणता येणार नाही! कारण वरकरणी तो शांत दिसला तरी त्याच्या चित्तात त्या क्षणी अशांती, अस्वस्थता असू शकते! कदाचित निर्बलतेमुळे तो शांत बसलेला दिसू शकतो. पण सामर्थ्य असूनही जो अपराध सहन करतो, त्याची शांती लक्षणीय असते. पण या सर्वापलीकडे  लक्षणीय शांतीपणा तो असतो, जेव्हा समर्थ असूनही तुम्ही तुमच्या बाबतीतला अपराध सहन करताच; पण ज्यानं अपकार केला त्याचं हितच जे साधतात, ते खरे शांतिब्रह्म! मात्र, इथं जो ‘अपराध’ म्हटला आहे, तो खून, चोरी, दरोडा, बलात्कार यांसारखा सामाजिक अपराध नव्हे! सामाजिक अपराधांविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. पण इथं अभिप्रेत असलेला अपराध हा बराचसा माझ्या जीवनात मी माझ्या मानलेल्या माणसांच्या वर्तनातून घडणारा आहे. तो मानसिक अधिक आहे. यात अपमान, उपेक्षा, पक्षपात यांसारख्या गोष्टीही आहेत. आणि आपली खरी शांती तिथंच तर डळमळीत होत असते!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com