चैतन्य प्रेम

संपूर्ण जीवनव्यवहार करताना इंद्रियं भगवद्भावानं कशी वर्तू लागतात, या ओव्यांचा उल्लेख केला. त्यांचं विवरण किंवा विश्लेषण मात्र केलेलं नाही. याचं कारण ते सर्व लिहिणं, वाचणं हे शाब्दिकतेच्याच उंबरठय़ाआड राहील. केवळ खऱ्या सद्गुरूच्या जीवनातच या ‘भजना’चा प्रत्यय येतो, एवढंच लक्षात ठेवू. अगदी फार विरळ साधक या स्थितीपर्यंत खऱ्या शुद्ध अर्थानं पोहोचतात.  जे पोहोचतात त्यांच्यासाठी यापुढची पायरी जी आहे, ती फार फार निसरडी आहे. जो सदोदित भगवंतमयच आहे त्याचा आधीचा ‘मी’ तर मावळला असतो, देहभाव लयाला गेला असतो आणि परमभावाची अशी उच्चावस्था आली असते की सर्व काही मीच आहे, सर्वत्र माझीच सत्ता आहे, सर्वत्र माझ्याशिवाय अन्य काही नाहीच, असा एक महाभाव उसळू लागतो. यालाच ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणतात! यातही अगदी सूक्ष्मातीसूक्ष्म अहं कायम आहे, पण त्या अहंचेच अर्पणही याच परमभावात होते, ही यातली मोठी गूढ गोष्ट आहे!  कवि सांगतो, ‘‘ऐसा मनें-कर्मे-वचनें। जो दृढावला भगवद्भजनें। तेंचि भजन अभिमानें। निजनिर्वाणें दृढ धरी।।३९४।।’’ मन, कर्म आणि वचनानं ज्याच्या अंत:करणात भगवद्भजन दृढ झालं असतं, तेच भजन तो परमअहंभावानं दृढपणे धारण करतो! मग इथं एक भव्य रूपक कविनारायण योजतात. हा परमअहंभाव सर्वत्र मीच आहे, या भावावर कसा स्थिर असतो? तर, ‘‘तरंग समुद्राआंतौता। म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां। जगातें निवविता जीवविता। तृषा हरिता चातकांची।।३९५।। माझेनि सस्यें पिकती। माझेनि सरिता उसळती। मागुती मजमाजीं मिळती। समरसती सिंधुत्वें।।३९६।।’’ समुद्राच्या आत एक तरंग असतो आणि तो म्हणतो की, आकाशातला मेघ खरं तर माझ्यामुळेच झाला आहे. त्या मेघाच्या जलवृष्टीनंच जगाची तहान शांत होते, ताप निवतो आणि चातकांचीही तृष्णा शमते. माझ्यामुळेच धान्य पिकतं, नद्या प्रवाहित होतात आणि अखेरीस माझ्यातच मिसळून समरस होऊन महासागर होऊन जातात! हे रूपक किती भव्य आणि मार्मिक आहे! या चराचरात जे काही जीवन नांदत आहे ते पाण्यामुळेच आहे ना? पण नुसतं पाणी असून काही उपयोग नाही. त्या पाण्याची वाफ होऊन आकाशात जावी लागते. तिला मेघरूपात परिवर्तित करावं लागतं. हे सूर्याच्या तेजाशिवाय शक्य आहे का? वाऱ्यांशिवाय हे मेघ वाहतील का? तेव्हा खरं पाहता पंचमहाभूतांमुळेच ही जीवसृष्टी नांदत आहे. तरीही समुद्रातल्या तरंगाला वाटतं की सारं काही मीच आहे, माझ्यामुळेच आहे आणि माझ्यातच विलीन होणारं आहे! आणि ते अगदी खोटंही नसतं. कारण तरंगदेखील पाण्याचाच असतो. पण तो पाण्याचा असला तरी तरंगरूपानं आपली वेगळी सत्ता मानत असतो आणि म्हणूनच कितीही परम पातळीचा का असेना, अहं उरला असतोच! संपूर्ण सद्गुरूमय झालेल्या शिष्याच्या मार्गातला हा एक मोठा धोका आहे की त्याच्यात इतकी निर्भयता आणि सार्वत्रिक समरसता येते की त्या परम भावाला व्यावहारिक जगाचा प्रतिसाद विपरीत असू शकतो! कारण त्याचं वर्तन, त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी, दुसऱ्याच्या भावनिक भययुक्त जगण्याला त्याच्याकडून मिळणारी प्रतिक्रिया या साऱ्यानं जग गोंधळून वा भांबावून जाऊ शकतं. कारण जगाच्या आडाख्यांना, आकलनाला छेद देणारं वर्तन त्याच्याकडून नकळत घडू शकतं!