जो चिंतनीय आहे तो सद्गुरू, त्याचं चिंतन आणि ते जिथं चालतं ते चित्त; या तिन्हींमध्ये एकसमानता, एकरूपता येते आणि जिथं अशी एकसमानता असते तिथं सगळी विसंगती मावळली असते. जिथं विसंगती नसते तिथं समाधानच असतं. तर असं या तिन्हीं गोष्टींत समाधान भरून गेलं आणि मग तेदेखील कृष्णार्पणच झालं! म्हणजे काय? तर ते चिंतन साधण्यातही माझं कर्तृत्व नाही आणि त्या चिंतनानं समाधान गवसण्यातही माझं कर्तृत्व नाही, असंच भक्त अगदी प्रामाणिकपणे मानत असतो. आणि त्यामुळेच हे सगळं ज्या भगवंतानं म्हणजेच सद्गुरूंनी दिलं त्यांनाच ते अर्पण केलं जातं. ही अर्पण प्रक्रिया मानसिक पातळीवरची आहे. म्हणजेच या जगात जी माणसं, ज्या वस्तू माझ्या वाटय़ाला आल्या आहेत आणि जी परिस्थिती मग ती अनुकूल असो वा प्रतिकूल असो, चांगली असो वा वाईट असो, ते सर्व भगवंताच्याच इच्छेनं आलं आहे, या धारणेतून जो जे आहे त्याचा स्वीकार करतो आणि प्रेरणा झाली तरच ते बदलण्यासाठीही निरपेक्ष भावानं प्रयत्न करतो त्याच्या मनावर भोवतालच्या परिस्थितीनं परिणाम होत नाही. तो सदैव सहजभावात, समाधानातच असतो. कृष्णार्पण वृत्तीनं जे जवळ आहे ते त्यानं  मनानं भगवंतालाच अर्पण केलं असतं. तर असा जो भक्त आहे तो सद्गुरूशी समरस होऊन जगात केवळ कर्तव्यभावनेनं वावरतो आणि असा भक्त सदैव सहज समाधीत असतो, असं मोठं सूत्र कवि नारायण सांगतात. अशा भक्ताची अंतर्बाह्य़ स्थिती मांडताना ते म्हणतात, ‘‘ऐसिया भगवद्भजनविधीं। भजनशील झाली बुद्धी। तैं सकळ कर्मी समाधी। जाण त्रिशुद्धी स्वयें झाली।। ४२३।।’’ ज्याची आंतरिक स्थिती हीच अशी सदैव भगवंताच्या भजनाचा विधी झाली, त्याची बुद्धीही भजनशील होते! मग तो जे जे काही कर्म करतो त्या त्या कर्माद्वारेही समाधीस्थितीच प्राप्त होत असते आणि त्यातून त्रिशुद्धी आपोआप होत असते. जीवनात अनेक तऱ्हेच्या तीन पातळ्या कायम असतात. सत, रज आणि तम, कायिक, वाचिक आणि मानसिक, तन, मन आणि धन, वैचारिक आणि भावनिकतेची उच्च, मध्यम आणि निम्न पातळी.. तर या पातळ्या आणि त्यानुसारच्या पातळीनुसारची मनोवृत्ती अशा त्रिमितींमध्ये माणूस जन्मभर भिरभिरत असतो. पण एका सद्गुरूच्याच ध्यानात सदोदित रममाण झाल्यानं आणि त्याच्या बोधानुरूप अज्ञानजन्य र्कम ओसरल्यानं जी र्कम घडतात ती त्यांच्याशीच समरसून होतात आणि मग त्यामुळे सत, रज, तम, कायिक, वाचिक आणि मानसिक.. अशा सर्व त्रिमितींचं शुद्ध आकलन होतं आणि अवधानपूर्वक जगू लागल्यानं अनवधानानं या तिन्ही पातळ्यांवर होणारी भिरभिर थांबते आणि गुंता कमी होतो. पण यासाठी एक फार मोठी आवश्यकता कवि नारायण सांगतात ती ही की, आपली बुद्धी भजनशील झाली पाहिजे! अगदी आंतरिक स्थिती ही भगवंताच्या भक्तीच्या विधीला पोषकच असली तरीही बुद्धी भजनशील बनणं अनिवार्य आहे! याचं कारण आंतरिक स्थिती कधी कधी उच्च पातळीवर जाते खरी, पण मन आणि बुद्धी भजनशील नसेल, तर ती प्रत्येक परिस्थितीबद्दल विकल्प निर्माण करू शकते! जर बुद्धी भजनशील असेल तर मात्र मनाची धारणाही अभंग राहते. आता बुद्धी भजनशील असणं म्हणजे काय? ते जाणण्यासाठी याच अध्यायात भजनाचा जो खरा अर्थ सांगितला आहे, तोच डोळ्यासमोर ठेवावा लागेल!