प्रत्येक कर्म भगवद्भावानं आणि भगवंतासाठीच घडू लागतं तेव्हा प्रत्येक कर्म हे पूजेतलं सुमनच जणू होतं. नाथ म्हणतात, ‘‘साकरेचें कारलें प्रौढ। तें देठू-कांटेनशीं सर्वही गोड। तेवीं इंद्रियकर्मगूढ। स्वादिष्ट सदृढ ब्रह्मार्पणें ब्रह्मीं।। ४४२।।’’ साखरेचं अगदी मोठं कारलं केलं, तरी ते देठापासून गोडच असणार ना? त्या कारल्यावरील काटेही गोडच असणार ना? त्याप्रमाणे इंद्रियांद्वारे होणारी सर्व लहान-मोठी र्कम जेव्हा ब्रह्मार्पण भावानंच घडतात, तेव्हा ती सगळीच गोड म्हणजे ब्रह्मरूपच होऊन जातात! पण त्या कर्माचा कर्तेपणा मनाला चिकटत नाही. ‘‘कर्मकलापु आघवा। आचरोनि आणी गौरवा। परी कर्तेपणाचिया गांवा। अहंभाव स्पर्शेना।। ४४३।। मजपासून झालें सत्कर्म। माझा आचार अति उत्तम। म्यां निरसिलें मरणजन्म। हा स्वभावें देहधर्म। उठोंचि नेणे।। ४४४।।’’ म्हणजे तो समस्त कर्मकलाप करतो, त्याच्या आचरणातूनच त्या कर्माचा गौरव होत असतो, पण त्यामुळे तो कर्तेपणाच्या गावात पाऊलसुद्धा ठेवत नाही की त्याच्या मनाला अहंभावही स्पर्श करीत नाही. ‘माझ्यामुळेच सत्कर्म घडले, माझंच आचरण अत्यंत उत्तम आहे, मीच जन्म-मरणाच्या चक्रातून यथास्थित सुटलो आहे,’ असा स्वाभाविक देहधर्म त्याच्यात उत्पन्नच होत नाही. कठपुतळीचा खेळ उत्तम झाला, तर त्यासाठी कठपुतळ्यांचं कौतुक कुणी करीत नाही, तर कठपुतळ्या जो नाचवतो त्याचं कौतुक करतात. तसं जे जे काही कर्म आपल्याकडून होतं ते सद्गुरू कृपेनुसार आणि प्रेरणेनुसार होतं, हे जाणून ते कर्म उत्तम झालं तरी तो त्याचं श्रेय स्वत:कडे घेत नाही. तर सद्गुरूंनाच देतो. तसंच कर्म पूर्णत्वास गेलं नाही, तर आपल्या बाजूनं प्रयत्नांमध्ये काही त्रुटी राहिली का, याचा विचार करून पुन्हा अचूकतेनं कर्म करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या प्रयत्नांना यश येवो वा अपयश; ती भगवंताचीच इच्छा मानून त्याचा स्वीकार करतो. त्याची वृत्ती कशी असते? तर.. ‘‘देहसंगें तरी वर्तणें। परी देहधर्म धरूं नेणे। देहस्वभाव लक्षणें। ब्रह्मार्पणें विचरती।।४४५।।’’ तो देहाच्या आधारावर जगात वावरत असतो, पण देहभाव धरून नसतो. त्याची देहगत स्वभावाची सर्व लक्षणे ब्रह्मभावातच म्हणजे व्यापक तत्त्वातच समर्पित होऊन गेलेली असतात. ‘‘परिसाचे कसवटीवऱ्हें। जें जें लागे तें तें साडेपंधरें। तेवीं निपजे जें जें शरीरें। तें तें खरें परब्रह्म।। ४४८।।’’ परिसाचा ज्या ज्या लोखंडाला स्पर्श होतो, त्याचं सोनं होतं. त्याप्रमाणे अशा भक्ताच्या देहानं जे जे घडतं, मग ते त्याच्या हातून होणारं कर्म असो, त्याचं बोलणं असो; ते सर्व परमतत्त्वाचाच संस्कार घडवितं. आता या सर्व ओव्या या सद्गुरू किंवा सद्गुरूमय शिष्यालाच लागू होणाऱ्या आहेत. आपण त्यांचा फक्त शब्दानंद घेऊ. नाथ म्हणतात, ‘‘त्याचा खेळु तेंचि महापूजन। त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन। त्याचे स्वभावीं स्वानंदपूर्ण। श्रीनारायण सुखावे।।४४९।। तो जेउती वास पाहे। आवडीं देवो तेउता राहे। मग पाहे अथवा न पाहे। तरी देवोचि स्वयें स्वभावें दिसे ।।४५०।।’’ त्याचा खेळ जणू महापूजा असते, त्याचं अवांतर बोलणंही  भगवंतासाठी प्रिय स्तवन ठरतं, त्याच्या स्वाभाविक कर्मानं स्वानंदपूर्ण भगवंतही सुखी होतो. तो ज्या वाटेकडे पाहतो त्या वाटेकडे देव आनंदानं उभा असतो; मग त्यानं पाहिलं किंवा न पाहिलं, तरी त्याला स्वाभाविकपणे भगवंतच दिसतो.

– चैतन्य प्रेम