निराधारांचा आधार घेण्यापेक्षा, जो शाश्वत परमाधार आहे त्याचाच आधार का घेऊ नये, असा प्रश्न गेल्या भागात केला. आता हे जे आधार घेणं आहे, ते मानसिक पातळीवरचंच आहे. आधाराची गरज कधी पडते? तर एखादं संकट आलं तर. संकटात आपण भगवंताचा आधार घेतो, म्हणजे काय करतो? तर त्या संकटाची जी काळजी असते ती त्याच्यावर सोडण्याचा प्रयत्न करतो. त्या संकटातून तो तारील, असा विश्वास मनात जपण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष संकट दूर करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, ते आपणच करतो. त्यासाठी इतरांची मदत लागली तरी ती घेतो. मग कुणी म्हणेल, की ही निराधारांचीच मदत नव्हे का? तर इथं थोडा भेद आहे. भगवंताची इच्छा असेल, तरच दुसऱ्याची मदत मिळू शकते किंवा त्या मदतीचा फायदा होऊ शकतो, अशी मनाची धारणा असते. म्हणजे मनाला मुख्य आधार भगवंताचाच असतो. तेव्हा आपल्या मनातली चिंता भगवंताच्या भरवशावर सोडण्यात निष्क्रियतेला वाव नाही. उलट मन चिंतामुक्त करण्यास, मनाची उमेद आणि धैर्य वाढवण्यास वाव आहे. पूर्वी कर्म करण्याआधी, कर्म करताना आणि प्रत्यक्ष कर्म झाल्यावर मनात अनिश्चितता असे. म्हणजे एखादी गोष्ट करावी की करू नये, केली तर कशी करावी, ही चिंता मनात असते. मग ती गोष्ट करीत असताना- आपण करतोय ते बरोबर आहे ना, त्यानं योग्य तो लाभ होईल ना, ही चिंता सतत घोंगावत असते. मग कर्म झाल्यावर जे फळ मिळतं ते आवडीचं असेल, तर ते टिकेल ना आणि ते जर नावडतं असेल, तर ते का मिळालं, ही चिंता मन पोखरत असते. थोडक्यात काय, तर माणूस कर्म करतानाही चिंतेपासून मोकळा नसतो. जेव्हा भगवंतावर भार सोडून कर्म केलं जातं तेव्हा मनातली भीती ओसरत जाते. मन पूर्ण निर्भय होणं आणि मग ते अभय होणं, या अखेरच्या पायऱ्याही भगवंतावर सर्व चिंतांचा भार सोडून कर्तव्य करीत राहण्याच्या ‘भजना’नं साध्य होतात. म्हणूनच नाथही सांगतात,  ‘‘यापरी भगवद्भजनपथा। भय नाहीं गा सर्वथा। ‘अभय’ पुशिलें नृपनाथा। तें जाण तत्त्वतां भजनें होय।।४५४।।’’ अभय जे आहे ते भगवंताच्या अशा कृतिशील भजनानं, भगवंताच्या कृतिशील भक्तीनंच लाभतं. यात कृती आपण करीत असतो, पण कर्तेपण भगवंताकडे असतं. ते त्याचं कर्म असल्यानं ते जास्तीतजास्त अचूक केलं जातं आणि त्यात त्या कर्माच्या फळाबद्दल आसक्तीही नसते. भगवंताबाबतचं सर्व अज्ञान या भजनामुळेच मावळतं आणि आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. उलट जे ज्ञानी पंडित म्हणून मिरवतात त्यांच्या डोक्यात  ग्रंथांच्या शब्दज्ञानाचंच ओझं असतं. शाब्दिक ज्ञानानं त्यांचा अहंकार फुलून येत असतो. त्यामुळे ते मायेच्या पकडीत असतात. नाथ सांगतात, ‘‘अज्ञानाचें मूळ माया। जे ब्रह्मादिकां न ये आया। गुणमयी लागली प्राणियां। जाण ते राया अति दुस्तर।।४५९।।’’  ब्रह्मादिकांनाही न आवरणारी मायाच अज्ञानाचं मूळ आहे. ती तीन गुणांच्या पकडीत असून जीवाची तिच्यापायी फरपट सुरू असते. ती पार करणं अतिशय कठीण! या मायेचा उगम कुठं आहे तर, ‘‘ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण। ते स्वरूपीं स्फुरे जें मीपण। तेंचि मायेचें जन्मस्थान। निश्चयें जाण नृपनाथा।।४६१।।’’ विराट जीवनप्रवाह परिपूर्ण आहे, त्याचाच अंश असलेल्या जिवाच्या मनात जेव्हा त्या पूर्णापासून फारकत घेणारी ‘मी’ची ओळख उत्पन्न होते, त्या  ओळखीतच मायेचं स्फुरण असतं.

– चैतन्य प्रेम