थोडं विषयांतर आहे, पण आवश्यकही आहे. ते असं की, काही जण म्हणतात, भगवंत नेमका कसा आहे आणि मुळात तो आहे की नाही, ते काही आम्हाला माहीत नाही. आपण चांगलं वागावं, दुसऱ्यांशीही चांगलं वागावं, कर्तव्यं नीट करावीत, दुसऱ्यांना मदतही करावी, एवढंच आम्ही जाणतो. हेसुद्धा चांगलंच आहे बरं का. समाजासाठी निरपेक्ष सेवा करणारे अनेक जण आहेत. ते देव-धर्म मानत नाहीत, पण तरीही ते आस्तिकच आहेत. कारण समाजातील चांगुलपणाच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास असतो आणि ते अस्तित्व टिकावं, वाढावं यासाठी ते आयुष्यभर स्वत:ला झोकून देतात. बरं, जे असा दुसऱ्याच्या हिताचा विचार करतात, समाजाच्या हिताचा विचार करतात तेसुद्धा मनानं व्यापक होत जातातच. पण इथं एक धोका मात्र असतो तो हा, की समाजासाठीची तळमळ प्रत्येकाच्याच मनात सारखीच असते असं नव्हे. त्यामुळे या सामाजिक कार्यासाठी जेव्हा काही लोक एकत्र जमतात तेव्हा कालांतरानं जो मूळ सद्हेतू असतो त्याला नखही लागण्याचा संभव असतो. अहंभावाचा शिरकाव होण्याचा आणि त्यातून अंतर्गत राजकारणाला वाव मिळून मूळ कार्याला हानी पोहोचण्याचाही धोका असतो. लोकेषणा म्हणजे नावलौकिकाची हौस चिकटू शकते. मात्र भक्तीचा जो मार्ग आहे त्यात केवळ भक्त आणि भगवंत, हे दोघंच असतात. या मार्गावर ‘मी’मध्ये आंतरिक परिवर्तन घडत जातं आणि हळूहळू ‘मी’ पूर्ण मावळून जातो. समाजात परिवर्तन झालंच पाहिजे, पण त्या जोडीनं माझ्यातही परिवर्तन झालं पाहिजे. भक्तीचा मार्ग हा या आंतरिक परिवर्तनाचा मार्ग आहे. व्यक्तीच्या बाह्य़ रूपात एकवेळ परिवर्तन घडणं, स्थूलात परिवर्तन घडणं तुलनेनं सोपं आहे. माणूस बाह्य़ रूपात बदल करून साधूचं सोंग वठवू शकतो, पण ते काही खरं परिवर्तन नव्हे. सूक्ष्मात जोवर परिवर्तन घडत नाही, तोवर स्थूलातलं परिवर्तन पक्व होत नाही. त्यामुळे अंतरंगात जोवर क्रांती होत नाही, तोवर दृश्यातही पालट होत नाही. भक्तीचा मार्ग हा अंतरंग घडवण्याचा आहे. बरं, हा मार्ग अगदी सामान्यातल्या सामान्यालाही सहजप्राप्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना? ‘सकळांसी येथे आहे अधिकार’! या मार्गावरून चालण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हा मार्ग आणि हे चालणं काय? तर जीवनातली कर्तव्यं पार पाडत असताना सद्गुरू बोधानुरूप वा संत-सत्पुरुषांच्या बोधानुरूप व्यापक जगण्याचा अभ्यास करीत जाणं. स्वत:च्या नावलौकिकात आणि तो लौकिक वाढवण्यात अडकलेल्या माणसाला संकुचिताच्या खोडय़ातून सोडवण्यासाठी भगवंताचं नाम मनात सदोदित स्मरायला हा मार्ग सांगतो. मोठमोठे ग्रंथ वाचणं एकवेळ जमणार नाही, खरा निरपेक्ष कर्मयोगही साधणं कठीण, खऱ्या योगसाधनेसाठीची क्षमता आणि धारणा प्राप्त करणं आणि टिकणंही कठीण; पण भगवंताचं नाम घेण्यात काहीच अडचण नाही. ते घ्या, असं संतही सांगतात. त्या नामस्मरणात मन रंगलं, तर भौतिकाचा मनावरचा प्रभाव आणि त्याचं आपापल्या भ्रमासक्तीनुसारचं आकलन ओसरत जाईल. मुख्य गोष्ट अशी की जो खरी भक्ती करतो, तो समाजहितासाठी पूरकच होतो. तो स्वत: भवबंधनातून मुक्त झाला असल्यानं इतरांनाही अंतर्मुख करतो, त्यांनाही व्यापक जगण्याची आणि चिंतामुक्त मनानं कर्तव्यर्कम करण्याची नकळत प्रेरणा देऊ लागतो, त्याच्या नुसत्या सहवासातून अनेकांना मानसिक आधार लाभतो.

– चैतन्य प्रेम