जो परम तत्त्वापासून कधीच विभक्त नसल्यानं सद्गुरूचा अनन्य भक्त आहे, तो मिथ्या जगात वास्तविक निर्भयतेनं आणि नि:शंक वृत्तीनं वावरतो! तो जगाला अव्हेरत नाही, पण जगाच्या भ्रामक अपेक्षांचं ओझंही वाहत नाही, की जगाच्या चालीनं चालत नाही. कर्तव्यं टाळत नाही, पण मुख्य कर्तव्य जो आत्माभ्यास तो विसरत नाही. त्यातूनच त्याच्या सहज वावरण्यात वेगळीच तृप्ती, निर्भयता, नि:शंकता, निश्चिंतता विलसत असते आणि तिचा सूक्ष्म संस्कार त्याच्या सहवासात जे जे येतात त्यांच्यावर झाल्याशिवाय राहात नाही. पण ही झाली ‘भक्ता’ची गोष्ट. खरा भक्त होणं सोपं का आहे? मग सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात ही निर्भय, नि:शंक स्थिती नाहीच का? तर नाथच दिलासा देतात की, सामान्य माणसालाही ही स्थिती अभ्यासानं सुगम साध्य आहे! नाथ महाराज म्हणतात, ‘‘हे अगाध निष्ठा परिपूर्ण। भोळ्याभाळ्या न टके जाण। यालागीं सुगम साधन। सांगेन आन तें ऐक।। ५२।।’’ भक्ताची जी अगाध आणि परिपूर्ण निष्ठा आहे, ती सर्वसामान्य माणसाला आवाक्याबाहेरची वाटते. तेव्हा त्यांच्यासाठी जे सुगम साधन आहे, ते आता सांगतो! मग हा सुगम मार्ग उलगडताना नाथ महाराज सांगतात की, ‘‘तरावया भाळेभोळे जन। मुख्य चित्तशुद्धीच कारण। जन्मकर्म हरीचे गुण। करावे श्रवण अत्यादरें॥ ५२५॥’’ आपल्याच भावनिक आसक्ती आणि मोहामुळे माणूस भवसागरात गटांगळ्या खात असतो. त्या भवसागरात बुडायचं नसेल आणि तरून जायचं असेल, तर त्याला एकच उपाय आहे तो म्हणजे- चित्तशुद्धी! ती होण्यासाठी काय करावं? तर, ‘जन्मकर्म हरीचे गुण। करावे श्रवण अत्यादरें॥’ जन्म- म्हणजे हरीचा अवतार कशासाठी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, कर्म- म्हणजे जन्माला येऊन त्यांनी कोणकोणत्या लीला केल्या आणि त्याचे कोणकोणते गुण आहेत, हे सर्व अतिशय आदरानं ऐकायचं आहे. हे कशा ओढीनं ऐकायचं आहे, हे सांगताना नाथ महाराज फार सुंदर रूपक वापरतात. ते म्हणतात, ‘‘चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता। जेणें सादरें ऐके माता। तेणें सादरें हरिकथा। सार्थकता परिसावी॥ ५२६॥’’ आपल्या हरवलेल्या मुलाच्या शोधाची माहिती आई ज्या तळमळीनं, आतुरतेनं आणि आदरपूर्वक ऐकेल, त्याच तळमळीनं हरिकथा ऐकली पाहिजे! किती सुंदर आहे हे! मग कुणाला वाटेल की, भगवंताचे इतके अनंत अवतार झाले आहेत, त्याच्या लीला इतक्या अनंत आहेत आणि गुणही अगणित आहेत की ते वाचावेत तरी कुठे? ऐकावेत तरी कुठे? त्यावरही नाथ उपाय सांगतात. ते म्हणतात, ‘‘हरीचीं जन्मकर्मे अनंत गुण। म्हणाल त्यांचें नव्हेल श्रवण। लोकप्रसिद्ध जें जें पुराण। तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें॥ ५२७॥’’ सुरुवातीला जी लोकप्रिय अशी पुराणं आहेत ती श्रद्धापूर्वक आणि संपूर्ण ऐकावीत! इथं ‘संपूर्ण’ हा शब्दही अनेक गोष्टी सुचवतो. काही वेळा आपण हौसेनं एखादा ग्रंथ वाचायला घेतो, पण थोडा वाचल्यावर तो अर्धवट तसाच बाजूला ठेवतो. त्यामुळे होतं काय की, त्यातला महत्त्वाचा असा बोधाचा भाग वाचलाच जात नाही. ‘संपूर्ण’चा दुसरा अर्थ म्हणजे, जसं लिहिलंय तेवढंच वाचून थांबू नका, तर त्यातून जे सूचित होत आहे तेदेखील ‘वाचण्याचा’ प्रयत्न करा!

– चैतन्य प्रेम