चैतन्य प्रेम

पुराणातल्या अनेक कथा या आजच्या काळातील ज्ञानाशी विसंगत भासू शकतात. मात्र तरीही त्या पुराणकथांमध्ये ज्ञानाचा अंश असतोच. आपण आवरण असलेली औषधाची गोळी घेतो. ती पोटात जाते तेव्हा त्या आवरणाचं विघटन होऊन जातं, पण औषध काम करू लागतं. तसंच रंजकतेचं आवरण असलेल्या पुराणकथांचं श्रवण होतं तेव्हा त्या कथा जेव्हा मनात झिरपतात तेव्हा त्यातील रंजकता कालानुरूप स्मरणातून ओसरते, पण जो ज्ञानांश असतो त्याचा सूक्ष्म संस्कार चित्तात संग्रहित होतो. या पुराणकथांवरच युगानुयुगं भारतीय मनाचं भावपोषण झालं आहे. त्या कथांचं हे सूक्ष्म संस्करकार्य मात्र सहसा लक्षात येत नाही. पुराणकथांमधील रंजकता, चित्रमयता प्राथमिक पातळीवर माणसाला आकर्षित करते. आता मत्स्य, वराह, कूर्म आदी दशावतारांची कथा सांगणारी पुराणं जशी आहेत तशीच अन्य देवी—देवतांचीही पुराणं, उपपुराणं आहेत. यातील एकेक पुराण हे एकेका देवाचं लीलावर्णन करणारं असतं. त्यातही काही गैर नाही कारण एका देवाची भक्ती दृढ करण्याची प्रक्रिया त्यातून साधली जात असते. अर्थात तो अवतारच मूळ आहे, पूर्ण आणि सर्वसमर्थ आहे; हे बिंबवलं जात असतं. म्हणजे गणपतीच कसा सर्वशक्तीमान आणि सिद्धीमान आहे, हे  ‘गणेश पुराण’ बिंबवत असतं. दुर्गाच कशी शक्तीचं मूळ आहे, हे ‘दुर्गा पुराण’ सांगत असतं. शंकर हाच कसा एकमेव तारणहार आहे, हे ‘शिव पुराण’ मांडत असतं. जे दैवत माणसाला मनातून भावत असतं, ज्या दैवतावर त्याची श्रद्धा जडली असते त्याचंच पुराण माणूस वाचतो आणि मग त्या दैवताविषयीचा त्याच्या मनातला भाव दृढ होण्यास ते पुराण साकारी बनत असतं.

एकदा भाव दृढ झाला की माणूस स्वस्थ बसत नाही. त्या दैवताच्या ‘कृतीशील ’  भक्तीची ओढ त्याला लागते. मग त्यानुसारची पारायणं, उपवास आणि व्रतं, जपजाप्य, तीर्थयात्रा तो करू लागतो. या वाटचालीतच मग या देवांच्याही पलीकडे असलेल्या व्यापक परम तत्त्वाकडे लक्ष जाऊ लागतं. त्यासाठीही ही पुराणंच साभूत होऊ लागतात!

या पुराणांना धरून एक मोठी गूढ गोष्ट नाथ सांगतात. ते म्हणतात, ‘ बहु देव बोलिले पुराणीं। तेही लागती ज्याचे चरणीं। तो समर्थ चक्रपाणी। जो वेदपुराणीं वंदिजे ॥ ५२८॥  त्याचीं जीं जीं जन्में अतिअद्भुत। जीं जीं कर्मे परमार्थयुक्त। स्वमुखें बोलिला भगवंत। तीं तीं ज्ञानार्थ परिसावीं॥ ५२९॥’ अहो हे देवदेखील ज्याच्या चरणांचं गुणगान करतात आणि वेदपुराणंही ज्याला वंदन करतात त्या समर्थ सद्गुरूच्या चरित्र आणि कार्याचं श्रवण करा! आणि हे श्रवण कसं करायचं आहे? तर, ‘जें जें केलें पुराणश्रवण। तें तें व्यर्थ होय मननेंविण। यालागीं श्रवण—मनन। सावधान करावें ॥ ५३०॥ ’ जे जे ऐकाल त्याला मननाची जोड नसेल, तर ते व्यर्थ आहे. आता गंमत अशी की श्रवणाला मननाची जोड देऊन नुसतं थांबायचं नाही, तर हे श्रवण आणि मनन दोन्ही  ‘सावधान’ करायचं आहे म्हणजेच हे श्रवण आणि मनन दोन्ही अत्यंत अवधानपूर्वक करायचं आहे. या श्रवण आणि मननानं आपण सावध झालं पाहिजे! आता आपणच वाचत असताना मनाच्या कानांनी जे ऐकणं त्यालाच ‘श्रवण’ म्हटलं आहे, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा मनाचे कान करून आपण ऐकू तेव्हाच खरं श्रवण आणि खरं मनन होईल, हे लक्षात ठेवा!