चैतन्य प्रेम

खरा सद्गुरू आणि साक्षात्कारी सत्पुरुष यांनाच उत्तम भक्त म्हणता येईल. खरा सद्गुरू कोण आणि भोंदू गुरू कोण, यांच्यातला भेद आपण गेल्या वेळी पाहिला आणि स्वयंघोषित, लोकेषणेचा मोह असलेल्या कथित ‘सद्गुरू’ला उत्तम भक्ताची ही लक्षणं लागू नाहीत, असंच त्यातून सुचवायचं होतं. आता खरा सद्गुरू आणि साक्षात्कारी सत्पुरुष यांच्यात सूक्ष्म भेद आहे, असं म्हटलं. या भेदाचा संकेत सद्गुरुसंदर्भात दिला होता तो असा की तो अवतारी असतो आणि आपला अवतार कशासाठी आहे, आपलं जीवन कशासाठी आहे, याची त्याला पूर्ण कल्पना असते. साक्षात्कारी सत्पुरुषाची स्थिती मात्र तशीच असेल, असं नाही. जन्मानंतर साधनेनं आणि सद्गुरू कृपेनं त्यांच्यातील आत्मस्थ शक्ती जागृत होते आणि त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. असे साक्षात्कारी सत्पुरुषदेखील उत्तम भक्ताच्याच श्रेणीत येतात. याचं कारण त्यांचं अंतरंगही सद्गुरूमय झाल्यानं परम तत्त्वाशी सदैव एकरूप असतं. अवघ्या चराचरात ते भगवंतालाच पाहात असतात. ही ऐक्यदृष्टी कशी असते? एकनाथ महाराज फार सुरेख रूपक वापरतात. ते कवि नारायणाच्या माध्यमातून सांगतात, ‘‘जैशा धृताचिया कणिका। धृतेंसीं नव्हती आणिका। तेवीं भूतें भौतिकें व्यापका। भिन्न देखा कदा नव्हती।।६४८।।’’ तुपाच्या कण्या या जशा तुपाहून भिन्न नसतात, वेगळ्या नसतात त्याचप्रमाणे सर्व भूतमात्र आणि वस्तूमात्र एका भगवंतानंच व्यापून आहे, असं हे उत्तम भक्त अनुभवत असतात. उत्तम भक्ताची लक्षण सांगून झाल्यावर कवि नारायण आता मध्यम भक्तांची लक्षणं आणि त्यांची ‘भजनगती’ म्हणजे आंतरिक धारणा सांगतो. या मध्यम भक्तांची आंतरिक धारणा काय असते? कवि नारायण म्हणतो, ‘‘ईश्वर मानी उत्तमोत्तम। तद्भक्त मानी मध्यम। अज्ञान ते मानो अधम। द्वेषी ते परम पापी मानी।।६५०।।’’ ईश्वर हाच केवळ उत्तम आहे, त्याची भक्ती करणारे मध्यम आहेत, ज्यांना त्या भक्तीचं ज्ञानच नाही ते अधम आहेत आणि जे भगवंत, भक्त आणि भक्तीचा द्वेष करतात, विरोध करतात, ते पापी आहेत, असं हा मध्यम भक्त मानत असतो! नीट लक्षात घ्या, तूप आणि तुपाच्या कण्या जशा एकच असतात त्याप्रमाणे भगवंत जर सर्वव्यापी असेल, तर या चराचरातील यच्चयावत गोष्टींत तोच भरून आहे, अशी उत्तम भक्ताची धारणा असते. तर मध्यम भक्ताची दृष्टी ही भेद जपणारी असते! मग या सगळ्यांशी त्याची व्यवहारदृष्टी कशी असते? तर, ‘‘ईश्वरी ‘प्रेम’ पवित्र। भक्तांसी ‘मैत्री’ मात्र। अज्ञानी तो कृपापात्र। ‘उपेक्षा’ निरंतर द्वेषियांची।।६५१।।’’ ईश्वरावर त्याचं शुद्ध प्रेम असतं, भक्तांशी स्नेह असतो, जे अज्ञानी आहेत ते कृपेस पात्र आहेत, त्यांच्यावर कृपा केली पाहिजे, असं तो मानतो आणि जे द्वेष्टे आहेत त्यांच्याशी तो उपेक्षेनंच वागतो. इथं, ‘अज्ञानी तो कृपापात्र,’ हे फार सूचक आहे. ज्याला भक्तीची माहिती नाही तो कृपेस पात्र आहे, असं तो मानतो, पण ‘कृपा’ म्हणजे काय आणि ती करणार कोण, हे स्पष्ट नसतं. त्यामुळे अशा माणसाला भक्तीमार्गाची माहिती देणं, सजग करणं, त्याच्याशी आध्यात्मिक चर्चा करणं, हे तो स्वत:ची जबाबदारी मानतो. यात वाईट काही नाही. त्यातूनही काहीजण खरंच योग्य मार्गाला लागतात. पण यात धोका असतो तो हा, की दुसऱ्याला ‘ज्ञान’ देता देता त्या ‘ज्ञाना’चा अहंकार मनात उत्पन्न होऊ शकतो. मग ईश्वरावरील प्रेमातही खोट येऊ शकते.