24 November 2020

News Flash

१७१. भक्तमय भगवंत

जो सर्व तऱ्हेच्या संकुचित मानसिक बंधातून सुटला आहे तोच निरभिमानी होतो.

जो सर्व तऱ्हेच्या संकुचित मानसिक बंधातून सुटला आहे तोच निरभिमानी होतो. असा अहंभावरहित भक्त लहानशा निरागस बालकाप्रमाणे आनंदात वावरत असतो. अशा भक्ताची ‘निजजननी’ होऊन भगवंत त्याचा कसा सांभाळ करतो? कवि नारायण सांगतो, ‘‘समूळ देहाभिमान झडे। तो देहीचि देवासी आवडे। ते भक्त जाण वाडेकोडें। लळेवाडे हरीचे।।७२२।।’’ ज्यांचा अभिमान, मीपणा समूळ झडून गेला आहे, तोच देवाचा लाडका होतो. मग, ‘‘ते जें जें मागती कौतुकें। तें देवोचि होय तितुकें। त्यांचेनि परम संतोखें। देव सुखावला सुखें दोंदिल होये।।७२३।। तो जिकडे जिकडे जाये। देव निजांगें तेउता ठाये। भक्त जेउती वास पाहे। देव ते ते होय पदार्थ।।७२४।।’’ अशा भक्ताच्या मनात जे जे येतं त्याची पूर्ती तो देव करतो, भक्ताच्या सुखानंच तो सुखावतो आणि पुष्ट होतो. तो जिकडे जाईल तिकडे देव त्याच्याबरोबर स्वत: जातो. भक्त ज्याची इच्छा करतो, वा जे जे पदार्थ पाहतो ते ते पदार्थ तो देव स्वत: होतो. आता याचा थोडा विचार करू. भक्ताच्या मनात काय येईल हो? त्याच्या मनात भौतिकाची इच्छा येत नाही. तर एखाद्याला भवदु:खात अडकलेलं पाहून भक्ताला दु:खं होतं. त्या संकटातून तो तरावा आणि त्याच्या उद्धाराची प्रक्रिया सुरू व्हावी, ही इच्छा भक्ताच्या मनात उत्पन्न होते आणि मग देव ती इच्छा पुरी करू लागतो. आता याचा अर्थ ते संकट तो दूर करून टाकतो का? तर नाही. संत सखूचं चरित्र पाहा.. अनंत संतांची चरित्रं पहा.. देवानं त्यांचे कष्ट बाह्य़रूपानं कमी केले नाहीत, पण त्यांच्या कष्टभोगात त्यांना साथ दिली, उमेद दिली. या कष्टानं त्रासून त्यांनी भगवंतालाच नावं ठेवली, तरी तीही त्यानं आनंदानं स्वीकारली. आईनं उचलून घेतलेलं लहान मूल कधी रागाच्या भरात हातपाय झाडतं, पण ते पाय आईला लागतात का? त्याला ती अपमान समजते का? तसा भगवंत ज्याला आपलं मानतो किंवा भक्त ज्याला आपलं मानतो त्याच्या मनात भवदु:खानं आलेली जी खदखद आहे ती स्वीकारतो आणि त्याच्या दु:खभोगात साथ देतो. त्या दु:खभोगात मनाची उमेद टिकवून ठेवतो. अशी माणसं अवतीभवती आणतो, असं काही वाचनात येतं, की माणसाच्या खचलेल्या मनाला आधार मिळतो. तर निराभिमानी भक्तानं ज्याला आपलं मानलं आहे त्याला भगवंतही आपलंच मानतो. भक्ताला ज्याच्याबद्दल कळवळा येतो त्याच्याबद्दल भगवंतालाही कळवळाच वाटतो. भक्त ज्या ज्या गोष्टींनी आनंदी होतो, त्या त्या गोष्टींनी भगवंतही तृप्त होतो. मग भक्त जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे भगवंतही धाव घेतो.  इतकंच नव्हे, ‘‘त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे। यालागीं देवो त्या पुढें मागें। त्यासभोंवता सर्वागें। भक्तीचेनि पांगें भुलला चाले।।७२५।।’’ जगात वावरणाऱ्या भक्ताला कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून देव त्याच्या मागे-पुढे, सभोवती चालत राहतो. आता हे ‘दृष्ट’ लागणं म्हणजे काय? तर त्याचा साधकासाठीचा अर्थ एवढाच की, ही दृष्ट आहे जगाची. हे जग आधी या भक्ताला प्रेमानं चिकटण्याचा प्रयत्न करतं आणि मग त्या भक्ताची भक्तीच ते शोषू लागतं! त्या जगापासून सद्गुरू भक्ताचा सांभाळ करीत असतो.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2019 1:59 am

Web Title: loksatta ekatmatayog 171
Next Stories
1 १७०. अकर्त्यांचं कर्तृत्व
2 १६९. सुवर्ण-श्वान!
3 १६८. पूर्णतृप्ती
Just Now!
X