22 April 2019

News Flash

२९. परमहंस

आपण प्रत्येक ओवीच्या अर्थाचा मागोवा घेणं स्थलकालाच्या मर्यादेच्या चौकटीत घेणं शक्य नाही.

आपण प्रत्येक ओवीच्या अर्थाचा मागोवा घेणं स्थलकालाच्या मर्यादेच्या चौकटीत घेणं शक्य नाही. नाहीतर कित्येक र्वष हे सदर सुरू राहील! तेव्हा काही महत्त्वाच्या आणि प्रातिनिधिक ओव्यांचाच आपण मागोवा घेणार आहोत. त्यामुळे आधीच एकदा केलेली विनंती परत करतो की, वाचकांनी मूळ ‘एकनाथी भागवत’ जोडीला वाचत जावे. ज्या ओव्यांचा मागोवा या सदरात नाही, त्यांचा अर्थ मात्र आपल्या विवरणाच्या क्रमानुसार लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा. एकप्रकारे हे आपल्या चिंतनक्षमतेला वाव देणारे निमित्तच ठरणार आहे. असो. तर जो भक्त तुला आवडतो त्याचं भवसाकडं, भवाचं संकट तू गणपती रूपानं सोडवतोस (भावें भक्त जो आवडे। त्याचें उगविसी भवसांकडें।). जो खऱ्या अर्थानं निरपेक्ष होऊन, थेट तुझाच होऊन तुझी भक्ती करीत आहे त्याचं सुख तूच वाढवतोस. त्याला परमानंदाचा मोदक देऊन तूच त्याला निववतोस, आत्मतृप्त करतोस, आत्मसंपन्न करतोस. (साच निरपेक्ष जो नि:शेख। त्याचें तूंचि वाढविसी सुख। देऊनि हरिखाचे मोदक। निवविसी देख निजहस्तें।।). या गणेशवंदनेनंतर आहे ती शारदेची अर्थात प्रज्ञेची वंदना. ती शारदादेखील आधीच सांगितल्याप्रमाणे  प्रज्ञासूर्य सद्गुरूचंच रूप आहे. तर त्या ओव्या अशा : आतां नमूं सरस्वती। जे सारासारविवेकमूर्ती। चेतनारूपें इंद्रियवृत्ती। जे चाळिती सर्वदा।। १७।। जे वाचेची वाचक। जे बुद्धीची द्योतक। जे प्रकाशा प्रकाशक। स्वयें देख स्वप्रभ।। १८।। हा जो सद्गुरू आहे तो खऱ्या अर्थानं विवेकमूर्ती आहे. सार काय आणि असार काय, याचा जो विवेक आहे, त्या विवेकाचा मूर्त अवतार म्हणजेच सद्गुरू आहे. चेतनारूपानं इंद्रियांच्या आधारे ज्या वृत्ती उफाळून येतात त्या वृत्तींची चाळण तो करीत असतो. म्हणजेच माझ्या अंतरंगात उफाळून येणाऱ्या वृत्तींची, त्या वृत्तीनुसार उठणाऱ्या आवेगांची आणि  विकारशरण भावनांची चाळण, छाननी हा सद्गुरू अंतरंगातच करीत असतो. त्यामुळे आपला आतला आवाजच आपल्या आतून विवेकाकडे वळवीत असतो. आपण कसे आणि कशामुळे अज्ञानात अडकून आहोत, कसे आणि कशामुळे भ्रममोहात गुंतून आहोत, हे आतूनच जाणवू लागतं. आणि जेव्हा आपल्यातलं अज्ञान कळू लागलं आणि ते प्रामाणिकपणे सलू लागलं, तेव्हा ज्ञानाचं मोल आपोआप उमगू लागतं. हा सद्गुरू वाचेचा वाचक आहे, बुद्धीचा द्योतक आहे, प्रकाशाला प्रकाशमान करणारा आहे. म्हणजे काय? तर वाचा आहे, पण तिला वाक् शक्तीची सुसंगत जोड नसेल, तर काय उपयोग? तेव्हा हा सद्गुरू वाचेचा उगम आहे. तो वाक् शक्तीचा आधार आहे. बुद्धीचा उगम आहे. प्रकाशाचा उगम आहे. तो स्वयंप्रकाशित आहे. पुढे एकनाथ महाराज म्हणतात : ते परमहंसीं आरूढ। तिसी विवेकहंस जाणती दृढ। जवळी असतां न देखती मूढ। अभाग्य दृढ अतिमंद।। २३।। हे जे सद्गुरूतत्त्व आहे ते परमहंसावर आरूढ आहे. हंस हा सार काय आणि असार काय, याचा निवाडा करतो. तसाच हा सद्गुरू तर परमहंस आहे! पण तरीही त्याच्या सहवासात येऊनही, तो जवळ असूनही त्यांना पाहू न शकणारा अर्थात त्यांचा उघड बोध ग्रहण करू न शकणारा जीव हा मूढ, भाग्यहीन आणि मतिभ्रष्टच असतो.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

 

First Published on February 8, 2019 1:30 am

Web Title: loksatta ekatmatayog 29