News Flash

५१. अंताची सुरुवात

श्रीकृष्णाचं अवतरण होण्यामागचं एक कारण म्हणजे दुष्प्रवृत्त राजांच्या अधर्मभारानं पृथ्वी त्रासली होती.

चैतन्य प्रेम

श्रीकृष्णाचं अवतरण होण्यामागचं एक कारण म्हणजे दुष्प्रवृत्त राजांच्या अधर्मभारानं पृथ्वी त्रासली होती. तिची आळवणी ऐकूनच श्रीकृष्णानं धाव घेतली होती. नाथ सांगतात : ‘‘ज्यांचेनि अधर्मभारें क्षिति। सदा आक्रंदत होती। जिच्या साह्य़ालागीं श्रीपति। पूर्णब्रह्मस्थिति अवतरला।। २०१।।’’ अधर्मभारानं क्षिति म्हणजे पृथ्वी सदा आक्रंदत होती. हा जीवही जगातल्या वाईटानं, अनाचारानं, दुराचारानं, प्रतिकूलतेनं होत असलेल्या जाचानं आक्रंदत असतो आणि त्याच्या साह्य़ासाठीच तो परमात्मा पूर्णब्रह्मस्थितीत अर्थात सद्गुरू स्वरूपात अवतीर्ण होतो! त्यात मेख अशी की जगातल्या वाईटानं, अनाचारानं, अधर्माचरणानं, दुराचारानं जीव गांजला असतो, पण तो वाईटपणा, तो अनाचारीपणा, अधर्माचरण, दुराचरण त्याच्याही आतमध्ये असतंच की! तेव्हा सद्गुरूंचा अवतार केवळ जगातल्या वाईटाच्या अंतासाठी नाही, तर अंतर्जगतातील वाईटाच्या अंतासाठीही आहे. मग कृष्णानं काय केलं? तर, स्वत: बलरामाला बरोबर घेऊन शूर अशा यादवांना एकत्र करून अनेक दुष्टांचा संहार केला. पण ज्यांचा नि:पात करणं यादवांच्याही आवाक्यात नव्हतं, त्यांच्यासाठी कृष्णानं निराळीच युक्ती केली. त्यानं त्या बलाढय़ दुष्ट राजांचेच मित्र, आप्तस्वकीय, भाऊबंद, सगेसोयरे यांच्यात घोर कलह उत्पन्न केला. नाथ सांगतात, ‘‘दुष्ट अकर्मीअतिघोर। ज्यांची सेना धराभार। ते वधार्थ करावया एकत्र। कलहाचें सूत्र उपजवी कृष्ण।। २०६।।’’ इतकंच नाही तर सत्प्रवृत्त पांडवांच्या अंत:करणातही क्षोभ उत्पन्न करून कौरवांचा पृथ्वीवरील पापभार नाहीसा केला.   अधर्माचरण करणारे राजे आणि त्यांच्या बलाढय़ सेना यांचा मोठय़ा प्रमाणात संहार झाल्यावरही पृथ्वीचा भार खऱ्या अर्थानं उतरला आहे, असं कृष्णाला वाटेना. याचं कारण, ज्या यादवांच्या योगानं दुष्प्रवृत्तीचा नाश घडवला गेला होता, त्याच यादवांच्या अंत:करणात आता दुष्प्रवृत्तीनं शिरकाव केला होता. नाथ सांगतात, ‘‘यादव करून अतुर्बळ। नाना दुष्ट दमिले सकळ। परी यादव झाले अतिप्रबळ। हें न मनीच केवळ श्रीकृष्ण।।२२१।। नव्हतां यादवांचें निदान। नुतरे धराभार संपूर्ण। ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण। कुलनिर्दळण तो चिंती।। २२२।।’’ इथं नाथ कापुराचं एक उदाहरण योजतात, पण ते अगदी वेगळ्या अर्थानं. ते म्हणतात, ‘‘अग्नि कर्पूर खाऊनि वाढे। कापुरांतीं अग्निही उडे। तैसें यादवांचें अतिगाढें। आले रोकडें निदान।।२२३।।’’ आग कापूर खात वाढते आणि अखेरीस कापूर संपताच आगही संपते, तसे यादव शक्तीच्या जोरावर वाढले आणि आता ती शक्ती ओसरताच यादवांचंअस्तित्वही ओसरणं क्रमप्राप्त होतं! आगीनं कापूर पेटवला जातो, पण आगीमुळे कापूर पेटतो की कापरामुळे आग भडकते? थोडक्यात दोघं परस्परावलंबी असतात आणि दोघांच्या समन्वयाची अखेर एकाच वेळी होत असते. तसे शक्तीसंपन्न यादवांची शक्ती आणि यादवांचं अस्तित्व संपणं क्रमप्राप्त होतं आणि तो श्रीकृष्णांचा संकल्प होता! कारण आपण अवतारकार्य संपवताच आपल्याच बळानं प्रबळ झालेले हे यादव पृथ्वीवर त्यांच्या बळाच्या जोरावर अधर्माचरणात रत होतील. (‘मज गेलिया निजधामा। हेचि प्रवर्तती अधर्मा। ) नाथ म्हणतात, ‘‘हे मद्बळें अतिप्रबळ। अतिरथी झाले सकळ। यांसि अप्रतिमल्ल दिग्गमंडळ। यांतें दमिता मी एकु।। २२९।।’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 12:20 am

Web Title: loksatta ekatmatayog 51
Next Stories
1 ५०. चांगल्यातून वाईट!
2 ४९. संगेचि सोडिला संगु
3 ४८. गुण-दुर्गुण
Just Now!
X