जीवाला विषयांची ओढ असते आणि बाह्य़ जगातच विषयसुख लाभेल, असं त्याला पक्केपणानं वाटत असतं. त्यामुळे या विषयसुखाचा आधार असलेल्या बाह्य़ जगाकडे त्याची सतत धाव असते. आणि जिथं बाह्य़ाकडे धाव आहे तिथं आंतरिक गती खुंटतेच, हे नारदांना सांगायचं आहे.  साधकानं या बोधाचं चिंतन करून त्याचा आपल्या जीवनात पडताळा घेतला पाहिजे. आपण इतकी साधना करतो, पण तरीही आध्यात्मिक प्रगती का नाही? ती का मंदावते? तर साधना करीत असतानाही अवधान बाह्य़ाचंच असतं, धाव बाह्य़ाकडेच असते आणि म्हणून आंतरिक जागृतीची प्रत्येक संधी आपण अनवधानानं गमावत असतो. म्हणजे काय? तर तोंडानं जप सुरू आहे तो नामाचा, पण मनात स्मरण  घोळत आहे ते बाह्य़ जगाचं, मग जागृती कुठून येणार? अवधान आलं तर निर्थक इच्छांचा ओघ आटेल आणि मग अंतर्यात्रेची गती कायम राहील, हेच नारदांना सांगायचं आहे. या नवांचा सर्वत्रसंचार कसा होता? तर, ‘‘जेथें मनाचा प्रवेशु नाहीं। त्यांची पायवाट ते ठायीं। ऐसे स्वइच्छा विचरतां मही। आले ते पाहीं कर्मभूमीसी।।१९१।।’’ जिथं मनसुद्धा प्रवेश करू शकत नाही, त्या ठिकाणी या नवांची पायवाट होती! पायवाट म्हणजे पायानं मळलेला रस्ता, वहिवाटीचा रस्ता. तर जिथं मनदेखील जाऊ शकत नाही तिथं हे नऊजण सहज जाऊ शकत होते आणि त्यानुसार स्वइच्छेनं ते महीवर, कर्मभूमीवर आले. म्हणजेच मृत्यूलोकात आले. कारण या मृत्यूलोकातच केवळ कर्म करण्याची संधी आहे, कर्म करण्यास वाव आहे. सत्कर्म करून पुण्यप्राप्तीनं स्वर्ग आणि दुष्कर्म करून पापसंचयानं नरक जसा या मर्त्यलोकातील कर्मानुसारच लाभतो त्याचप्रमाणे सद्गुरूबोधानुसार अहंभाव सोडून त्वम्भावात अर्थात भगवंत चिंतनात निष्काम होऊन कर्म करण्याची कलाही याच मर्त्यलोकात साधता येते. अशाच निष्काम कर्मानी जीवन्मुक्तीचा लाभ होतो. तर अशा या मर्त्यलोकात हे नऊजण आले आणि तेव्हा जनकाच्या राजधानीत मोठा यज्ञ सुरू होता. त्या यज्ञस्थानी या नवांना पाहून ऋषीमुनी आणि आचार्यासह जनक राजाही भावतन्मय झाला. या नवांचं दर्शन कसं घडत होतं? तर, ‘‘अमित सूर्याचिया कोटी। हारपती नखतेजांगुष्ठीं। तो भगवंतजिंहीं धरिला पोटीं। त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक।।१९६।। त्यांचिया अंगप्रभा। सूर्य लोपताहे उभा। जिंहीं प्रभेसी आणिली शोभा। चैतन्यगाभा साकार।।१९७।।’’ अर्थात, ज्याच्या अंगठय़ाच्या नखाच्या तेजात कोटय़वधी सूर्याचं तेज लोपून जातं त्या भगवंताला ज्यांनी हृदयात साठवलं होतं त्यांच्या अलौकिक तेजाचं वर्णन काय करावं?  या नवांच्या अंगकांतीपुढे सूर्यही दिपून जात असे. आपल्या अंगतेजानं सूर्याची शक्ती असलेल्या प्रभेलाच शोभा आणणारे हे नऊजण म्हणजे जणू चैतन्याचा गाभाच होते! ‘‘ते भगवद्भाववैभव। भगवंताचें निजगौरव। भक्तीचे भाग जे नव। ते हे जाण सर्व मूर्तिमंत।।१९८।।’’ ते भगवद्भावाचं वैभव होते, भगवंताचा आत्मगौरव होते आणि भक्तीच्या ज्या नऊ पायऱ्या सांगतात, त्या नवविधाभक्तीचे साकार रूपच होते! या नवांच्या हृदयातील ब्रह्मज्ञानच इतकं प्रकाशमान होत होतं की त्यांना अन्य अलंकाराची गरजच नव्हती! ‘‘निजहृदयींचें ब्रह्मज्ञान। परिपाकें प्रकाशलें पूर्ण। तेंचि निजांगा मंडण। इतर भूषण त्यां नाहीं।।२०७।।’’आत्मज्ञानापुढे भौतिक जगातल्या सगळ्याच गोष्टी फिक्या पडतात, हेच खरं.

– चैतन्य प्रेम