– चैतन्य प्रेम

आपल्या देहाचा आपल्याला जन्मापासून संग आहे. पृथ्वीवर अवघी जीवसृष्टी नांदत आहे. त्या पृथ्वीच्याच आधारानं आपलंही जीवन घडत आहे. वायुप्रवाहामुळे आपला श्वासोच्छ्वासही सुरू आहे. आकाशाचे छत्र आपण अनेकदा अनुभवलं आहे. अन्नपाण्यावर आपलं शरीर पोसलं जात आहे. त्यामुळे पाण्याचं मोल आपण जाणतोच. चंद्र आणि सूर्याचा उदयास्त आपण जन्मापासून अनुभवत आहोत. थोडक्यात, चराचरांतल्या या अनंत गोष्टी आपण जन्मापासून पाहात आलो आहोत. पण तरी त्यातून, अवधूताला आकळला तसा परमतत्त्वाचा बोध काही आपल्याला जाणवलेला नाही. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, समुद्र, माशी, मधमाशी, मासा, बालक आणि आपला नरदेह आदी, अशा याच चराचरांतील २४ गोष्टी अवधूताच्या गुरू ठरल्या. पण त्या अनंत वेळा पाहूनही आमच्या मनावर त्यातल्या गुरुतत्त्वाचा ठसा उमटलेला नाही. ती जाणीव अवधूताचा बोध वाचताना होते. प्रथम डोळे उघडून भोवताली पाहिलं तरी प्रत्येक गोष्ट काही ना काही बोध करीत आहे हे जाणवेल, हाच अवधूताच्या सांगण्याचा मथितार्थ आहे. एकदा चराचरांतील वस्तू बोधरूप आहेत, हे जाणवू लागलं की मन सूक्ष्म होऊन- चराचरांत एक सद्गुरू तत्त्वच भरून आहे, हेदेखील जाणवू लागेल. एकनाथ महाराजांनाही चराचरांत सद्गुरूच दिसत असे. ‘एकनाथी भागवता’च्याच नवव्या अध्यायात एकनाथ महाराज म्हणतात की, ‘‘मी जरी नाठवी जनार्दनासी। परी तो विसरों नेदीच आपणासी। हटें देतुसे आठवणेंसी। अहर्निशीं सर्वदा।।४५०।।’’ म्हणजे मी जरी जनार्दन महाराजांची आठवण काढली नाही, तरी ते मला त्यांचा विसर पडूच देत नाहीत. सदासर्वकाळ त्यांचंच स्मरण व्हावं, असं ते घडवतात. म्हणजे काय करतात? ‘‘जिकडे जिकडे मी पाहें। तिकडे तिकडे तोचि होऊनि राहे। मी जरी त्याकडे न पाहें। तें न पाहणेंहि होय तो माझें।४५१।।’’ म्हणजे मी जिथं जिथं पाहतो तिकडे तिकडे तोच असतो. म्हणजे कुठलीही वस्तू वा गोष्ट पाहिली तरी ती त्याचंच स्मरण साधून देते. आकाशाकडे, समुद्राकडे पाहावं तर सद्गुरूच आठवतो! आकाशाची व्यापकता पाहताना सद्गुरूचं सर्वव्यापकत्व आठवतं. समुद्राची विशालता पाहून त्यांच्या अंत:करणातील विराटता स्मरते. आणि जेव्हा मी डोळे मिटून घेतो ना, तेव्हाही बंद डोळ्यांआडच्या पडद्यावर त्यांचीच प्रतिमा साकारते! मग म्हणतात, ‘‘दृश्य मी देखावया बैसें। तंव दृश्या सबाह्य़ जनार्दनु दिसे। श्रवणीं ऐकतां सौरसें। शब्दीं प्रवेशे जनार्दनु।।४५५।।’’ म्हणजे जगाकडे पाहावं, तर जगात सर्वत्र माझा सद्गुरूच भरून राहिल्याचं दिसतो; काही ऐकावं, तर त्या शब्दांतूनही सद्गुरूच काही सांगत आहे, असं जाणवू लागतं, असं एकनाथ महाराज सांगतात.

chaitanyprem@gmail.com