– चैतन्य प्रेम

अग्नितत्त्वाला आपण गुरू का मानलं, हे सांगताना अवधूत अग्नी आणि सत्पुरुषातील समान लक्षणं प्रकट करीत आहे. अग्नीमध्ये जे काही टाकावं त्याचं अग्निरूपातच दर्शन घडावं, हा विशेष सांगून झाल्यावर तेच सूत्र पकडून अवधूत म्हणतो, ‘‘चंदन सुवासें दरुगधधुरें। निंब कडू ऊंस गोडिरे। तें जाळूनि आकारविकारें। कीजे वैश्वानरें आपणाऐसीं।।४९२।। तैसा योगी जें अंगीकारी। तें आत्मदृष्टीं निर्धारी। दोष दवडूनियां दुरीं। मग स्वीकारी निजबोधें।।४९३।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). म्हणजे, सुगंधी चंदन असो वा दरुगधित पदार्थ असो, कडुनिंब असो की गोड ऊस असो; अग्नी सर्वाचा आकार-विकार म्हणजे गुण-दोष जाळून टाकतो आणि त्या सगळ्यांना आपल्यासारखं करतो. तसंच सत्पुरुषापाशी कोणीही जावो; मग त्याच्या सत्कर्माचा सुगंध दरवळत असो की त्याच्या कुकृत्यांची दुर्गंधी सुटली असो, कडुनिंबाप्रमाणे त्याच्यात अहंभावानं कडवटपणा भरला असो की उसातल्या गोडीप्रमाणे गोड अशी सहृदयता त्याच्या अंत:करणाच्या पेरा-पेरांत साठली असो; सत्पुरुष त्या सगळ्यांचा स्वीकार करतो आणि त्यांना आपल्यासारखं करून टाकतो! कदाचित सुगंधी चंदन जळताना जो धूर निघेल तो सुवासिक असेल आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ जळताना दुर्गंधीयुक्त धूर सुटेल, पण मागे राहील ती केवळ एकसमान राख! तसं एखाद्याचं सत्कर्मानी घडलेलं पुण्य स्वाहा होताना काही काळ त्याच्या मधुर चरित्राचा गंध आसमंतात दरवळत राहील, तर कुकृत्यांनी घडलेली पापं भस्मसात होताना दुष्कृत्यांच्या स्मृतींचा दरुगध काही काळ पसरेलही; पण अखेर सगळंच स्वाहा झालं, तर एकसमान होऊन जाईल. पण ते ‘स्वाहा’ मात्र झालं पाहिजे. स्वाहा म्हणजे ‘स्व’भावाची संपूर्ण समिधा आहुती म्हणून आत्मज्ञानाच्या यज्ञकुंडात पडणं! तर योगी किंवा सत्पुरुष हा त्याच्यापाशी आलेल्या सगळ्यांचा त्यांच्यातील बऱ्यावाईटासकट स्वीकार करतो आणि आत्मदृष्टीनं निर्धारपूर्वक त्यांच्यातील दोष जाळून टाकून, निजबोध रुजवून आपलंसं करतो! अर्थात स्वयंमान्य ‘सज्जन’ जे असतात ना, त्यातील बहुतेकांना ‘दुर्जनां’ना सत्पुरुषानं थारा दिलेला रुचत नाही. पांगरे येथील स्वामी शिवानंद यांचं फार मनोज्ञ असं चरित्र श्रीधर आगाशे यांनी लिहिलं आहे. त्यात आपलीच एक आठवण आगाशे यांनी लिहिली आहे ती चित्तात ठसणारी आहे. स्वामींच्या दर्शनाला एकदा एक मोठा सरकारी अधिकारी आला होता. नोकरीत आपल्यावर नाहक आळ आला आहे, हा त्याचा पवित्रा होता. पण स्वामींच्या अंतर्यामित्वाची जाणीव होताच तो नरमला. आपण खरेच लाच घेतली होती आणि त्यामुळे सरकारी महसुलाचीही हानी झाली, हे त्यानं कबूल केलं. या संकटातून भगवंतानं वाचवावं, अशी त्याची विनवणी होती. त्याचं बोलणं ऐकून आगाशे मनातून संतापले होते. त्याचा तिरस्कार करू लागले होते. स्वामी मात्र त्या गृहस्थाला देव्हाऱ्यापाशी घेऊन गेले आणि सर्व कुकृत्यांचा पाढा मूर्तीसमोर म्हणवून घेतला. परत असे घाणेरडे कृत्य न करण्याची शपथ घ्यायला लावली. मग प्रसाद देऊन ‘संकटमुक्त होशील’, असा आशीर्वाद दिला. ते गृहस्थ आनंदून परतले, पण आगाशे यांचं मन अस्वस्थ झालं होतं. ज्या माणसाला भर चौकात फटके मारले पाहिजेत, ज्याची मालमत्ता जप्त केली पाहिजे त्याचा भगवंत पाठीराखा होऊच कसा शकतो, हा प्रश्न त्यांच्या मनात धुमसत होता. त्यावर स्वामींनी दिलेलं उत्तर अंतर्मुख करणारं आहे.