– चैतन्य प्रेम

आपल्याकडे आलेला माणूस बरावाईट कसाही असो, सत्पुरुष त्याचा स्वीकार करून त्याला सन्मार्गाला आणतात. या सूत्राच्या अनुषंगानं पांगरे येथील स्वामी शिवानंदांच्या चरित्रातला एक प्रसंग आपण पाहात आहोत. त्यात भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या एका अधिकाऱ्याकडून पुन्हा ते पाप न करण्याचं वचन घेऊन स्वामींनी संकटमुक्तीची ग्वाही दिली, हे आपण पाहिलं. मात्र अशा भ्रष्ट माणसाची पाठराखण देव कशी काय करू शकतो, असा प्रश्न चरित्र लेखक श्रीधर आगाशे यांच्या मनात धुमसत होता. स्वामींनी त्यांची ही आंतरिक अस्वस्थता ओळखली. ‘‘का रे, गप्प का झालास?’’ या स्वामींच्या प्रश्नानं, एखादा पूर्ण भरलेला फुगा टाचणीचा स्पर्श होताच फुटावा, तसा आगाशेंच्या मनातला राग प्रकट झाला. मनातली खदखद व्यक्त करून ते म्हणाले की, ‘‘देव अशांचा कसा काय पाठीराखा होऊ शकतो, हा न्याय योग्य आहे का, आपण जे केलंत ते योग्य होतं का, याचा विचार करतोय!’’ स्वामी म्हणाले, ‘‘त्याच्यावर दया दाखवणं, देवानं त्याला क्षमा करणं योग्य नाही. हा सामाजिक गुन्हेगार आहे. याला शासन झालंच पाहिजे, असं तुला वाटतं ना? पण मग देवानं दया करायला योग्य कोण, हे तरी सांगू शकशील का? माझे भक्त म्हणविणारे किंवा तू स्वत:ही कृपायोग्य आहात, असं तुझं म्हणणं आहे का? मग तू किंवा तुम्ही सर्वसाक्षी परमेश्वराला माहीत नाही, असा कोणताही सामाजिक गुन्हा कधीही केलेला नाही, असे म्हणू शकता का? तुम्ही केलेले अपराध अजून जगजाहीर झालेले नाहीत म्हणूनच तुम्ही सज्जन ना? सांग की तू किंवा तुम्ही काया-वाचा-मनोभावे करून कोणतेही अनैतिक, गैरकृत्य केलेलं नाही म्हणून?’’ मग स्वामी म्हणाले, ‘‘मग परमेश्वराच्या दरबारात खरं तर तो अधिकारी आणि तुम्ही सारखेच! फक्त तू स्वत:ला दयेला पात्र मानतोस, त्याला नाही! अरे, अधोगती हा निसर्गधर्म आहे. त्यातून काही चांगलं निर्माण करायचं असेल, तर त्याला शक्तिसंचय, सत्प्रवृत्तीची जोड देऊन, पश्चात्तापाने पावित्र्य आणून त्याची आत्मिक उंची वाढविणे, वरच्या स्तरावर त्याला नेणे, हाच त्यावरचा उपाय नाही का? नाही तर वाल्याचा वाल्मीकी कधी होऊच शकला नसता. अधोगतीकडे जात असलेल्याला आणखी एक धक्का देऊन अधिक  खाली ढकलण्यासाठी तुमची कुणाची गरज नाही. जरुरी आहे ती वर येऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची. जरुरी आहे ती चांगलं घडावं, व्हावं, असं वाटतं त्यांची. आणि अशांना परमेश्वरानं दया दाखवायची नाही, दुष्टाचा सुष्ट बनवायचा प्रयत्न करायचा नाही, तर मदत कुणाला करायची? ज्या क्षणी संकटातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरी कृपेशिवाय मार्ग नाही, अशी खात्री पटून पश्चात्तापाने याचना करण्यासाठी तो प्रवृत्त झाला, परमेश्वराच्या दरबारात आला त्याचक्षणी तो दयेला पात्र झाला, हे खरं ना?’’ आपली मुलं लहान आहेत. आपण तुरुंगात गेलो, तर त्यांची परवड होईल; ते संकट टळावं, अशी त्या गृहस्थाची प्रार्थना होती. त्यावर, ‘‘मुलांचं अन्न आणि इभ्रत वाचेल,’’ असं स्वामींनी सांगितलं होतं. त्याची चौकशी झाली. आरोप सिद्ध झाले नाहीत, पण जेवढय़ा रकमेचं सरकारचं नुकसान झालं, ती रक्कम त्याला भरावी लागली. नोकरीही सोडावी लागली, पण तुरुंगवास झाला नाही. अन्य व्यवसाय उत्तम करून तो प्रपंच करू लागला. हा प्रसंग आणि स्वामींचं उत्तर, या पार्श्वभूमीवर मनात अनेक प्रश्न निर्माण झालेच असतील. त्यांचा आता विचार करू.