– चैतन्य प्रेम

भगवंताला धरतीवर येऊन अवतार घेऊनही जे साधलं नाही ते, दुष्टांत परिवर्तन करण्याचं कार्य सत्पुरुषालाच साधतं, हे मोठं रहस्य आहे! आता यात काही प्रमाणात भगवान श्रीकृष्णांचा आणि प्रभु श्रीरामांचा अपवाद केला पाहिजे. कारण ते सद्गुरू स्वरूपही होते! पण तरीही त्या लीलाचरित्रांतलं गूढ माधुर्य असं की, ते इतक्या सख्यभावानं वावरले की त्यांचं खरं अलौकिकत्व कित्येकदा लपूनही गेलं. त्यामुळेच तर भगवान कृष्णांनी शिशुपालाच्या शंभर अपराधांना माफी जाहीर केली असली, तरी शिशुपालाच्या बुद्धीत पालट झाला नाही! उलट अपराधांची सवय जडून तो उन्मत्तच झाला. दुर्योधनाच्या बुद्धीतही भगवंताला पालट करता आला नाही. तेव्हा प्रत्यक्ष अवतार घेऊनही दुष्टांना सुस्पष्ट होण्याची प्रेरणा देणं, तशी तळमळ त्यांच्या मनात निर्माण करणं सोपं नव्हे. पण सत्पुरुष ‘खळांची व्यंकटी’ सांडावी हाच प्रयत्न वारंवार करतो. कारण एक दुष्ट सुधारला तर शेकडो लोकांचं जगणं आनंदाचं होतं. एखाद्याचा नि:पात करून वा एखाद्याला केवळ कठोर शासन करून समाज सुधारत नाही. कारण हत्येला फाशीची वा जन्मठेपेची शिक्षा आहे, हे कुणाला माहीत नाही का? तरीही हत्या घडतातच ना? मग त्या घडविण्यासाठी मनाच्या ज्या ऊर्मी कारणीभूत होतात त्या ऊर्मीना, त्या मनाला वळण लावण्यात समाजाचं अधिक हित नाही का? कैद्यांना योगाभ्यासाची गोडी लावणारे योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या ‘आनंदयोग’ या पुस्तकात अट्टल गुन्हेगारांचे अनेक अनुभव आहेत. एका चुकीच्या क्षणी मनाचं पाऊल चुकीचं पडलं आणि गुन्हा घडला. त्याची जाणीव साधनेनं झाली आणि शिक्षा भोगत असतानाही सकारात्मकता जोपासली गेली ती योगबळानंच! कदाचित शिक्षा भोगूनही गुन्ह्य़ाचा शिक्का जगानं कधीच पुसला नसता. मग पुन्हा गुन्हा न घडण्याची तरी काय शाश्वती? सत्पुरुष हे दुष्टचक्र तोडण्याची प्रेरणा देतात. चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्गानं जीव जेव्हा वाटचाल सुरू करतो तेव्हाच आणि त्याप्रमाणात समाजात स्थैर्य वाढत असतं. तेव्हा जो चुकला आहे, तसंच ज्याला चुकीची जाणीव आणि खरा पश्चात्ताप झाला आहे, त्याला आवश्यक ती सजा भोगू देऊन योग्य मार्गावर चालण्याची संधी केवळ खरा सत्पुरुषच देऊ शकतो. त्याच्या या निर्णयात भगवंतदेखील हस्तक्षेप करीत नाही. कारण दुष्टाला सुधारणं भगवंताला प्रत्यक्ष अवतार घेऊनही साधलेलं नाही. रावण, कंस, दुर्योधन, शिशुपाल अशी अनेक उदाहरणं आहेत. पण संतांना ते उत्तम साधलंय. विसोबा खेचरांसारखे विरोधक नंतर साक्षात्कारी संतही झाले. हाच या वास्तवाचा दाखला नाही का? तर.. ही चर्चा ज्या मुद्दय़ावरून सुरू झाली होती तो मुद्दा म्हणजे, ‘‘योगी वा सत्पुरुष त्याच्यापाशी आलेल्या सगळ्यांचा त्यांच्यातील बऱ्यावाईटासकट स्वीकार करतो आणि आत्मदृष्टीनं निर्धारपूर्वक त्यांच्यातील दोष जाळून टाकून, निजबोध रुजवून त्यांना आपलंसं करतो!’’ म्हणून अवधूताचं निमित्त करीत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘चंदन सुवासें दरुगधधुरें। निंब कडू ऊंस गोडिरे। तें जाळूनि आकारविकारें। कीजे वैश्वानरें आपणाऐसीं।।४९२।। तैसा योगी जें अंगीकारी। तें आत्मदृष्टीं निर्धारी। दोष दवडूनियां दुरीं। मग स्वीकारी निजबोधें।।४९३।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा).