– चैतन्य प्रेम

जो अगदी आतला, जवळचा पुरुष आहे तो म्हणजे अंतरात्मा! त्याचा संग म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणिवेत स्थित होणं. दूरचा पुरुष म्हणजे आज ना उद्या दुरावणारं, पण तरीही कायम आधारभूत वाटणारं जग! हे सतत बदलणारं म्हणूनच मिथ्या असं जग मला नेहमी सुख देईल, असं पिंगलारूपी स्त्रीला म्हणजे जीवाला वाटत असतं. ‘स्त्री’मध्ये अर्धा ‘स’  आहे. ‘स’ म्हणजे सह, बरोबर, सोबत. पूर्ण आणि दीर्घ ‘त्री’ म्हणजे दृढावलेले पूर्ण त्रिगुण! जीव या त्रिगुणांच्या अर्धवट साथीनं जगात वावरत आहे. तो धड पूर्ण सत्त्वशील नाही, ना धड पूर्ण रजोगुणी आणि ना धड पूर्ण तमोगुणी. अशा आंतरिक विसंगत स्थितीत हा पिंगलारूपी जीव जगाकडून पूर्ण अनुकूलतेची, पूर्ण तृप्तीची अपेक्षा करीत असतो. पण पिंगला आता मोहभ्रमाचे पाश तुटल्यानं जागृत होत आहे. या जागृतीनं मोह विरतो, संशय मावळतो आणि स्वस्वरूपाची विस्मृती लोपून शुद्ध स्वरूपाचं स्मरण विलसू लागतं. ‘गीते’त ही स्थिती प्राप्त झाल्यावर अर्जुन म्हणतो, ‘‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मया अच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव।।’’ (अध्याय १८). पिंगलेचाही मोह मावळल्यावर ती म्हणते, ‘‘आपुला पूर्ण न करवे काम। ते मज केवीं करिती निष्काम। त्यांचेनि संगें मोहभ्रम। दु:ख परम पावले।।२२३।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). पिंगला म्हणते अतृप्त अशा मला पूर्णतृप्त करणाऱ्या पुरुषाची मी वाट पहात बसणं, हा मूर्खपणाच आहे. आपली सुखप्राप्तीची धडपड एकदा तटस्थपणे पाहावी. मग कळेल की आपणही अपूर्ण आहोत आणि दुसऱ्या अपूर्ण माणसाच्याच आधारे पूर्ण सुखी होऊ, या आशेवर जगत आहोत. जे अशाश्वत आहे त्याआधारे शाश्वत सुख मिळवू पाहात आहोत. आता जो सकाम आहे तो निष्काम व्हायला शिकवूच शकत नाही. ज्या गुरूचाच मोह, भ्रम गेलेला नाही तो निष्काम भजन कसं शिकवील? स्वत: जो चिखलगाळात पुरता रुतला आहे, तो मला त्यातून बाहेर कसा काढील? जो स्वत:च मायापाशात बद्ध आहे तो मला कसा मुक्त करील? पिंगलेला जाणवलं आणि वाटलं की, या असत् संगतीपेक्षा मी सत्पुरुष, परमपुरुष, पूर्णपुरुष अशा परमात्म्याची कामना केली तर तो अगदी जवळ असल्यानं त्याची कृपा तत्काळ होईल आणि मी निष्काम होईन! ती म्हणते, ‘‘संतपुरुषाची प्राप्ती। जवळी असतां नेणे आसक्ती। ज्यासीं केलिया रती। कामनिवृत्ति तत्काळ।।२१९।।’’ या पूर्णपुरुष परमात्म्याची प्राप्ती झाली की आसक्ती लयाला जाते आणि कामनांचाही तत्काळ निरास होतो. हा परमात्मा कसा आहे? तर, ‘‘सकळ ऐश्वर्य निजपदेंसी। संतोषोनि दे रतीसी। रमवूं जाणे नरनारींसी। रमणू सर्वासी तो एकू।।२२१।।’’ तो स्वत: संतुष्ट आहे आणि संतोषानं निजपदाचं ऐश्वर्यही देतो. हे प्रेम लाभलं तर आनंदाशिवाय जीवनात काही उरतच नाही. आणि वर हा परमात्मा कसा आहे? तर तो स्त्री-पुरुष भेदच पुसून सर्वाना आपल्या प्रेमात सारखंच रममाण करतो, रमवतो! मग आजवर आपल्याला केवळ कामसुखाधीन पुरुषांचा संग घडला, याचं तिला वैषम्य वाटलं. त्यांची निंदा करीत ती स्वत:लाही दूषणं देऊ लागली. ज्यात आपण इतके आसक्त आहोत, तो देह अस्थी, रक्तामांसाचा गोळा आहे, ही जाणीव तिला झाली. ‘एकनाथी भागवता’च्या आठव्या अध्यायातील २३३ ते २४१ या ओव्यांत शरीराची अंतर्रचना नाथांनी ज्या सहजतेनं वर्णिली आहे तिला तोड नाही.

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?