चैतन्य प्रेम

सद्गुरू बोधानुसार आचरण साधणं ही सोपी गोष्ट नाहीच आणि हा साधनाभ्यास सतत करायचा आहे. तो सदासर्वदा सर्वकाळ करायचा आहे (एका जनार्दनीं लाहो करा बळें। सर्वदा सर्वकाळें लाहो करा॥). साधना ही ठरावीक काळासाठी केली जाते, असं आपण मानतो. पण आंतरिक पालटाची ही जीवनसाधना आहे. ती सदोदित करायची अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करायची आहे! या उपासनेनं मनातल्या समस्त विसंगतींचा जेव्हा उपसा होईल तेव्हा भगवंताशी सुसंगत असं जगणं सुरू होईल. भगवंतापासून विभक्त होणं थांबेल आणि खरी भक्ती सुरू होईल. याच भक्तीची आणि भक्ताची महती हरी नारायण राजा जनकाला सांगत आहे. जे हरीच्या चरणाशी अनन्य असतात त्यांच्याशी हरीही अनन्य असतो, हे भक्तच वैष्णवांत अग्रगण्य आणि भागवतोत्तम आहेत, असंही हरी सांगतो. आता हे ‘हरीच्या चरणांशी अनन्य होणं’ म्हणजे काय? तर ज्या मार्गावरून हे चरण विचरण करतात, त्या भक्तीप्रेमाच्या मार्गानंच दृढ विश्वासानं जाणं, त्यांच्यानुरूप आचरण करणं म्हणजेच चरणांशी अनन्य होणं! मग हरी नारायण राजा जनकाला मोठय़ा भावप्रेमानं सांगतो की, ‘‘गौण करुनी चारी मुक्ती। जगीं श्रेष्ठ भगवद्भक्ती। त्या उत्तम भक्तांची स्थिती।

संक्षेपें तुजप्रती बोलिलों राया॥७९०॥’’ हे राजा ज्यांनी चारही मुक्तींना भक्तीसमोर तुच्छ मानलं, त्यांची आंतरिक भावस्थिती मी तुला सांगितली. या चार मुक्ती कोणत्या ते आपण मागे पाहिलंच आहे. मी ज्या जगात राहात आहे ते जग त्या एका भगवंताचंच आहे, ही झाली सलोकता मुक्ती, तो भगवंत सदैव माझ्याबरोबर आहे, माझ्या पाठीशी आहे, ही झाली समीपता मुक्ती. मी त्याचाच अंश मात्र आहे, मी तोच आहे, ही झाली सरूपता मुक्ती आणि मी आणि तो असं काही भिन्न नाहीच, सर्व काही तोच आहे, ही अभेद स्थिती म्हणजे झाली सायुज्यता मुक्ती! पण हा जो भक्तोत्तम आहे ना, त्याला या चारही मुक्तींचीदेखील ओढ नाही, पर्वा नाही. कारण बंधनात असो की मुक्तावस्थेत त्याचा आंतरिक संग सदैव भगवंतमय सद्गुरूपाशीच आहे! अशा भक्तांची खरी आंतरिक स्थिती पूर्णपणे सांगण्याचं सामर्थ्य कोणातच नाही. हरी नारायण सांगतो, ‘‘पूर्ण भक्तीचें निरुपण।

सांगतां वेदां पडले मौन। सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण। थकोनि जाण थोटावें॥७९१॥

ते भक्तीची एकांशता। तुज म्यां सांगितली हे कथा। यावरी परिपूर्णता। राया स्वभावतां तूं जाणशी॥७९२॥’’ खरंच आहे! भक्ताची आंतरिक प्रेमावस्था, भावावस्था कोण वर्णू शकणार? कोण सांगू शकणार? वेददेखील भक्तीचं निरूपण करता करता मौनावले. सहस्रमुखधारी शेषाचीही जिव्हा तोकडी पडली अन् थकून गेली. हरी नारायण सांगतो, राजा जनका, त्या भक्तीचा अवघा एकांश भागच मी जेमतेम सांगितला. हे राया पूर्ण भक्तीचं खरं स्वरूप प्रत्यक्षात केवळ तूच स्वभावत: जाणतोस! इथं ‘स्वभावत:’ हा मोठा मार्मिक शब्द आपल्या अवधानाच्या कक्षेतून पटकन निसटून जातो. हा शब्द म्हणजे राजा जनकाच्या पूर्णावस्थेचाच संकेत करतो. अपार वैभव पायाशी लोळत असतानाही पूर्ण विरक्त राजा जनकाचं लक्ष केवळ आणि केवळ आत्मवैभवाकडेच होतं. आत्महितापासून त्याचं लक्ष कोणत्याही क्षणी कणमात्रही ढळलंदेखील नाही. त्याचा प्रत्यय राजा जनकाच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून वारंवार लाभतो.