चैतन्य प्रेम

जाग येताच स्वप्न भंग पावतं. त्या क्षणी स्वप्नात सत्य वाटत असलेल्या जगाचा खरेपणा संपतो. त्याचप्रमाणे सद्गुरू बोध अंत:करणात ठसल्यावर भवभान ओसरतं. अर्थात जगण्यातील भ्रम, मोहजन्य आसक्तीचं भान येतं. जगण्यातील मिथ्यत्वाचं भान येतं! अंतरिक्ष हे सर्व सांगून राजा जनकाला एक सावधगिरीचा सल्ला देतो! तो म्हणतो, ‘‘हे राजा, हा मायेचा खेळ, मायेची ही कारागिरी तू लक्षात घे!’’ (येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न। बोध जाहलिया मिथ्या भवभान। हें अवघें मायेचें विंदान। राया तूं जाण निश्चित॥) म्हणजे काय? तर, सद्गुरू बोध ऐकून जगण्यातील समस्त मिथ्यत्वाचं भान आलं तर खरं; पण हे भान आल्याचं वाटून त्या ज्ञातेपणाचा अहंकार उपजला, तर हासुद्धा मायेचाच खेळ आहे! म्हणजे जगाच्या मिथ्यत्वाची खरी धारणा वा पूर्ण आकलन नाही. हे आकलन निवडक आहे. स्तुती होताच ती मिथ्या वाटत नाही! विषयात जीव सदैव बुडालेला असतो. विषय म्हणजे दृश्य जगाच्या ओढी वा मनोचित्तवृत्तींचे आवेग ज्यायोगे उत्पन्न होतात, अशा कृतिप्रेरक स्मृती आणि स्मृतीजन्य कृती! अंतरिक्ष म्हणतो, ‘‘आतां जीवाची विषयावस्था। विषयरसीं विषयभोक्ता। एकधा दशधा विभागता। आईक नृपनाथा सांगेन॥ १०६॥’’ हे राजा, जीवाची अवस्था विषयानंच बरबटलेली आहे. माणसाच्या आंतरिक धारणेचं प्रतिबिंब त्याच्या जगण्यावर पडतं आणि माणसाच्या आंतरिक धारणेवर विषयांचा मोठा प्रभाव असतो. त्या विषयरसात भोक्ता बनून तो जगू पाहतो. म्हणजे अखंड विषयसुखाचा भोग घेता यावा, हेच त्याच्या जगण्याचं एकमेव उद्दिष्ट उरलेलं असतं. म्हणजेच मनाला जे हवंसं वाटतं, त्याच्या प्राप्तीनंच सुख लाभेल असा विचार दृढ असतो. त्या प्राप्तीसाठीच सगळी धडपड सुरू असते. त्यातून त्या जीवाची विभागणी होते. ती ‘एकधा’ आणि ‘दशधा’ आहे. एक आहे ते अंत:करण आणि दहा आहेत ती ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियं! ही सर्व परमात्म विचारानं उजळतात, तेव्हा जीवनमुक्तीची वाट उजळते. ही जेव्हा मायाप्रभावानं झाकोळतात, तेव्हा बंधनाची काटेरी वाट वाटय़ाला येते. ही विभागणी कशी आहे? तर, ‘‘एकधा भागें अंतकरण। स्वयें झाला जनार्दन। मन-बुद्धि-चित्त-अहंस्फुरण। चतुर्धा जाण विभागें॥१०७॥’’ या एका अंत:करणाचे- मन, चित्त, बुद्धी आणि अहंचं स्फुरण असे चार भाग होतात. हा जो ‘अहं’ आहे, त्यानंच मायेचा प्रभाव आणि देहबुद्धीची सत्ता दृढ केली आहे. अंतरिक्ष सांगतो, ‘‘जीव आपुल्या परिपूर्णता। ‘अहं’ म्हणे निजात्मसत्ता। तेथ मायेची अतिलाघवता। देहात्मता दृढ केली॥१०८॥’’ मग? ‘‘अहंकारु वाढवितां देहात्मता। विसरे आपुली चिद्रूपता। तो विसरू वाढवी विषयचिंता। तेचि ‘चित्त’ तत्त्वतां महामाया॥१०९॥’’ अहंकारानं देहतादात्म्यता वाढत गेली, की जीव आपली चिद्रूपता विसरतो. आपलं स्वरूपभान प्राप्त करण्याची संधी गमावतो. मग हे स्व-भानाचं जे विस्मरण आहे, ते विषयांचीच चिंता वाढवतं. म्हणजे विषयपूर्तीच्या साधनांच्या प्राप्तीची चिंता, ती साधनं टिकण्याची चिंता यांनी अंत:करण पोखरलं जात असतं. ही चिंता अहोरात्र जिथं चालते, ते ‘चित्त’! ही जी देहाची अहंता आहे ना, ती अतिशय चपळ आहे. अंतरिक्ष सांगतो, ‘‘देहअहंता अतिचपळ। तीतेंच म्हणती ‘मन’ चंचळ। नाना संकल्पविकल्पजाळ। वाढवी प्रबळ भय-शोक-दुख॥११०॥’’ ही जी चंचल देहअहंता आहे, तिलाच ‘मन’ म्हणतात!