चैतन्य प्रेम

एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जेवीं रुपासवें दिसे छाया। नाशितां नातुडे नाशावया। तेवीं स्वरुपीं मिथ्या माया। अतिदुर्जया देवांसी॥२१४॥ जेवीं देहासवें मिथ्या छाया। तेवीं ब्रह्मीं मिथ्या माया। कल्पनायोगें वाढली वायां। यालागीं ‘अजया’ वेदशास्त्रें म्हणती॥२१५॥’’ देहासोबत देहाची सावली असते. ती सावली काही खरी नसते. देहावाचून तिला स्वतंत्र अस्तित्व नसते. तशी माया ही परमात्म्याची सावली आहे. पण कल्पनाबळानं ती इतकी बलिष्ठ झाली की, देवांनाही तिला जिंकता आलं नाही. ती माया साधकाला जिंकायची आहे आणि त्यासाठीचा मार्ग एकनाथ महाराज सांगत आहेत. या मायेतून कसं पार व्हावं, असा प्रश्न जनक राजानं विचारला आणि नवनारायणांतील अंतरीक्षाचा धाकटा भाऊ  प्रबुद्ध सांगू लागला. त्याच्या नावाचा उपयोग करून नाथ खुबीनं सांगतात की, ‘‘मुख्य मायेचें तरण। प्रबुद्धचि जाणे पूर्ण। प्रबुद्ध जाहलिया आपण। मायेचें विंदान न तरतां तरती॥२२९॥’’ मायेच्या पकडीतून कसं सुटावं, हे जो ‘प्रबुद्ध’ झाला- म्हणजे खऱ्या अर्थानं जागा झाला, तोच पूर्णपणे जाणू शकतो. आता हे जागं होणं, म्हणजे नेमकं काय? कोणती जाग नाथांना अपेक्षित आहे? आणि ‘जो जागा झाला’ असा उल्लेख नाथ करतात तेव्हाच- ‘जो निद्रिस्त आहे तो मायेतून तरू शकत नाही,’ हेदेखील अभिप्रेतच आहे. मग ही ‘निद्रा’ कोणती? तर ही मोहनिद्रा आहे! या मोहनिद्रेतून जो जागा झाला, तोच खरा प्रबुद्ध आहे! या मोहनिद्रेचं लक्षण काय? नाथ सांगतात, ‘‘मनीं विषयाचा छंदु। तो केवळ महाबाधु। विषयत्यागी तो प्रबुद्धु। तोचि विशदु भावो आइका ॥२३०॥’’ ज्याच्या मनात विषयाचा छंद आहे, विषयांचा ओढा आहे, तो छंद, ती ओढच मोठी बाधक आहे आणि ज्यानं मनातून त्या ओढीचा त्याग केला आहे, तोच केवळ प्रबुद्ध आहे! मग मोठा प्रश्न निर्माण होतो तो ‘विषय’ म्हणजे नेमकं काय, हा! या प्रश्नाचं उत्तर जाणून घेताना हे लक्षात ठेवलं पाहिजे, की इथं विषयावर टीका नाही, तर विषयातिरेकावर टीका आहे! कारण विषय स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत; त्यांचा अतिरेक मात्र अस्वाभाविक आहे. इतकंच नव्हे, तर तो मनुष्यदेहासारख्या अनमोल लाभाचा अत्यंत बेपर्वा आणि कृतघ्न वापरदेखील आहे. आता विषय म्हटलं की, पटकन कामविषयच गृहीत धरला जातो. पण विषय म्हणजे कामविषय नव्हे. प्रत्येक इंद्रियाचे वेगवेगळे विषय आहेत. जसं डोळ्यांचा विषय आहे पाहणे! म्हणजे डोळ्यांनी पाहण्याची जी क्रिया घडते ती स्वाभाविक आहे; पण पाहिलेल्या एखाद्या गोष्टीशी मन जेव्हा आसक्त भावानं स्वत:ला जखडून घेतं आणि त्या भ्रामक कल्पनेत गुरफटून जातं, तेव्हा तोच विषय ‘बाधक’ होतो! हीच गत सर्व इंद्रियांची आणि त्यांना संलग्न विषयांची आहे. उदाहरणार्थ, खाणं आणि बोलणं हा मुख या इंद्रियाचा विषय असला, तरी अतिरेकी खाणं आणि परनिंदा तसंच निर्थक बडबड हा ‘विषयातिरेक’ आहे! ऐकणं हा श्रवणेंद्रियांचा स्वाभाविक विषय आहे. पण परनिंदा, अशाश्वताशी जखडलेलं निर्थक बोलणं ऐकण्यात गोडी वाटणं हा कानांचा विषयातिरेक आहे! मनुष्याचा देह फार मोलाचा आहे. त्या देहाच्या क्षमता दुर्लभ आहेत. त्याचा वापर शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी न करता अशाश्वतापासून शाश्वत सुख मिळविण्यासाठी करीत राहणं यापेक्षा मनुष्यजन्माचा मोठा दुरुपयोग नाही. ते सुखच नंतर आपलं दु:खरूप उघड करतं!