09 April 2020

News Flash

२८८. गुण आणि दोष

एखाद्याचा गुण हा प्रेरणा देऊ  शकतो आणि त्यामुळे त्याच्यातील गुरुत्व ओळखता येतं,

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

गुरूशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाविना मुक्ती नाही. पण हेदेखील खरं की, खरा गुरू प्राप्त होणं हीदेखील दुर्लभच गोष्ट आहे. पण ज्याच्या मनात अशाश्वताच्या पकडीतून सुटका व्हावी, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली आहे, त्यानं मनाचे, चित्ताचे आणि बुद्धीचे डोळे उघडे ठेवून जगाकडे नीट लक्ष दिलं, तर या चराचरातील प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकता येतं. अवधूत हेच यदु राजाला सांगत आहे. प्रत्येक व्यक्तीत आणि वस्तुमात्रात कोणता ना कोणता गुण व्याप्त आहे. त्या गुणाकडे लक्ष दिलं, तो गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती वा वस्तू गुरुरूपच ठरते. यायोगे संपूर्ण जगच गुरुरूप झालं. अवधूत सांगतो, ‘‘जो जो जयाचा घेतला गुण। तो तो गुरु म्यां केला जाण। गुरुसी आले अपारपण। जग संपूर्ण गुरु दिसे।।३४१।।’’ मग तो म्हणतो, ‘‘ज्याचा गुण घेतला। तो सहजें गुरुत्वा आला। ज्याचा गुण त्यागरूपें घेतला। तोही गुरु झाला अहितत्यागें॥३४२॥’’ एखाद्याचा गुण हा प्रेरणा देऊ  शकतो आणि त्यामुळे त्याच्यातील गुरुत्व ओळखता येतं, हे आपल्याला पटतं. पण एखाद्यातील दोष कसा काय गुरू होऊ  शकतो? तसंच असंही काहींना वाटतं की, साधकाकडे दोषदृष्टी नसावी. म्हणजे इतरांच्या वागण्यातल्या दोषांकडे त्यानं पाहू नये, अन्यथा त्या दोषांचच चिंतन होतं. श्रीगोंदवलेकर महाराज तर म्हणतात की, इतरांमध्ये दोष दिसतो याचा अर्थ तो स्वत:मध्येही आहेच. तर.. एक गोष्ट खरी की, इतरांचे दोष पाहू नये हे खरं असलं तरी, दोष दिसत असतील तर त्या दोषदर्शनाचा लाभ कसा घ्यावा, ते दोषही मार्गदर्शक कसे ठरतात, हे अवधूत सांगत आहे. अवधूत म्हणतो, ‘‘ज्याचा गुण त्यागरूपें घेतला। तोही गुरु झाला अहितत्यागें॥’’ म्हणजेच कोणते दुर्गुण त्यागले पाहिजेत, हे इतरांमधील दुर्गुणांवरून उमगतं. मग त्या अहितकर दुर्गुणांचा त्याग करण्याची प्रेरणाही गुरू बनते. म्हणजेच अवधूत सांगतो की, ‘‘ज्याचा मी गुण घेतला तो माझा गुरू झालाच, पण ज्याचा दोष पाहून मी तो माझ्यातूनही टाकला तोदेखील माझा गुरू झाला. कारण दोषांचा त्याग करणं त्या गुरूमुळेच सुचलं.’’ मग अवधूत सांगतो, ‘‘एवं त्यागात्यागसमतुकें। दोहींसी गुरुत्व आलें निकें। राया तूं पाहें पां विवेकें। जगचि असकें गुरु दिसे॥३४३॥’’ म्हणजे कशाचा त्याग करावा आणि कशाचा त्याग होऊ  देऊ  नये, हे उमजून तसं आचरण घडलं तर गुण आणि दोष या दोघांना गुरुत्व लाभतं आणि मग अवघं जगच गुरू ठरतं! पण त्यासाठी या जगामागे वाहवत जाता कामा नये, तर या जगाकडे सावकाश, निर्लिप्तपणे पाहिलं पाहिजे. अवधूत सांगतो, ‘‘ऐसें पाहतां सावकाशीं। गुरुत्व आलें जगासी। हेंचि साधन जयापासीं। तोचि परमार्थासी साधकु॥३४४॥’’ जर जगाकडे या दृष्टीनं पाहिलं, तर जगालाच गुरुत्व लाभतं. ज्याला हे साधन साधतं, तोच परमार्थाचा खरा साधक ठरतो!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:26 am

Web Title: loksatta ekatmyog article 288 zws 70
Next Stories
1 २८६. आज आणि आत्ताच!
2 २८६. जगत्-गुरू!
3 २८५. मनोभ्यास
Just Now!
X