चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

देह आणि मनाच्या पकडीत ‘मी’ जगत असला, तरी ‘देह म्हणजे मी नाही’ आणि ‘मन म्हणजे मी नाही’ ही सुप्त जाणीवही माणसाच्या बोलण्यातून प्रकट होते. एवढं असूनही देह आणि मन या उपकरणांचं खरं मोल, खरा लाभ त्याला उमगत नाही. ‘एकनाथी भागवता’च्या विसाव्या अध्यायात कृष्ण-उद्धव संवादात हा विषय मांडताना एकनाथ महाराजांनी अनेक रूपकांचा वापर केला आहे. त्यात कृष्ण सांगतो की, ‘‘परपारा अवश्य आहे जाणें। तेणें नाव फोडूनि भाजिजे चणे। कां पांघरुणें जाळूनि तापणें। हिंवाभेणें सुज्ञांनीं।।१८६।। तसें येथ झालें गा साचार। थित्या नरदेहा नागवले नर। पुढां दु:खाचे डोंगर। अतिदुस्तर वोढवले।।१८७।।’’ म्हणजे, ज्याला पलतीरी जायचं आहे, त्यानं भूक लागली म्हणून नाव तोडून तिचं लाकूड जाळून चणे खावेत किंवा थंडी फार वाजत असल्यानं एखाद्यानं आपले पांघरुण जाळून शेकोटी पेटवावी आणि तात्पुरत्या उबेचा आनंद मिळवावा; तसा माणूस नरदेहाचा वापर केवळ विषयसुखांसाठीच करतो आणि तात्पुरत्या सुखाभासांच्या ओढीत अनंत दु:खांनाच प्राप्त करतो. कृष्ण सांगतो की, ‘‘सकळ योनीं विषयासक्ती। सर्वासी आहे निश्चितीं। नरदेहीं तशीच विषयस्थिती। तैं तोंडीं माती पडली कीं।।१८८।। पावोनि श्रेष्ठ नरशरीर। जो नुतरेचि संसारपार। तो आत्महत्यारा नर। सत्य साचार उद्धवा।।१८९।।’’ विषयासक्ती तर सर्वच पशुयोनींत आहे. अर्थात सर्वच प्रकारचे पशू-पक्षी हे त्यांच्या त्यांच्या इंद्रियगत विषयसुखात आसक्त आहेत. मग त्याच विषयासक्तीत माणूसही गुंतला, तर त्याच्यात आणि पशूत काय फरक उरला? आता इथं ‘विषय’ म्हणजे केवळ कामविषय नव्हे, तर मागेच सांगितल्याप्रमाणे पाहणं हा डोळ्यांचा विषय आहे; रुची अर्थात पदार्थाचा आस्वाद घेणं, हा जिव्हेचा विषय आहे; ऐकणं हा कानांचा विषय आहे, आदी. तर शब्द, स्पर्श, गंध, रस आणि रूप या पाच विषयांत पशुयोनीही अडकून आहे, तसाच माणूसही अडकला तर काय उपयोग, असा हा सवाल आहे. आद्य शंकराचार्यानी ‘विवेक चूडामणि’मध्ये म्हटलं आहे : ‘शब्दादिभि: पञ्चभिरेव पंच पञ्चत्वमापु: स्वगुणेन बद्धा:। कुरङ्गमातङ्गपतङ्गमीनभृङ्गा नर: पञ्चभिरञ्चित: किम्॥’’ पारध्याच्या गाण्याला भुलून हरिण मागे धावतं आणि जाळ्यात अडकतं (शब्द), मादीच्या स्पर्शाला भुलून हत्ती धावतो आणि त्याला पकडण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ात अडकतो (स्पर्श), दिव्याच्या ज्योतीकडे झेपावून पतंग जीवन संपवतो (रूप), आमिषाला भुलून मासा गळाला अडकतो (रस) आणि कमळाच्या सुवासात गुंतून भ्रमरही पाकळ्यांमध्ये आबद्ध होतो (गंध). याप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच विषयांत एकेक पशुयोनी गुंतून आहे, मग हे पाचही विषय ज्या मनुष्ययोनीत समाविष्ट आहेत तिच्यासमोर या पाचही ओढींत गुंतण्याचा मोठा धोका आहे.