चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

संत एकनाथ महाराज यांच्या ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथाच्या आधारे आपलं हे चिंतन गेले सव्वा वर्ष सुरू आहे. सद्गुरूशी ऐक्यभाव कसा स्थापित होऊ  शकेल, याचा ‘एकनाथी भागवता’च्या बोधप्रकाशात वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात यदु-अवधूत संवादाच्या निमित्तानं आपण चराचरांतील गुरुतत्त्वाच्या दर्शनापासून एका सद्गुरूपर्यंत पोहोचविणारा आणि त्याच्याशी ऐक्यता स्थापित करणारा मार्ग जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर गेल्या भागात म्हटलं की, योगी चातुर्यानं ऐक्य साधतो. (‘ऐक्यता साधावी चतुरीं। ते वायूच्या ऐसी दोहींपरी। बाह्य़ आणि अंतरीं। ऐक्यकरीं वर्तावें।।’). आता हे ऐक्य तो कोणाशी साधतो, हे पटकन लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की, तो बाह्य़ जगाशी ऐक्य साधतो असंच इथं अभिप्रेत असावं. पण हे ऐक्य दुहेरी आहे! म्हणजे बाह्य़ जगाशी तर तो ऐक्यभाव दाखवतोच, पण खरं आणि साधक जीवनातील महत्त्वाचं ऐक्य वेगळंच आहे. हे आंतरिक, सूक्ष्म ऐक्य आहे ते परमात्म्याशी, म्हणजेच परमात्म्याशी एकरूप झालेल्या सद्गुरूशी! बाहेरच्या जगात वावरतानाही सद्गुरूशी जी आंतरिक ऐक्यता असते, ती योगी विसरत नाही! आता सद्गुरूशी आंतरिक ऐक्यता असते म्हणजे तरी काय? तर ती त्यांच्या बोधविचाराशी ऐक्यता असते. जो त्यांचा विचार तोच माझा विचार, जो त्यांचा निर्णय तोच माझा निर्णय, असं ते आंतरिक ऐक्य असतं. त्यामुळे जगात वावरतानाही योगी जगात गुंतत नाही. जगाकडून अपेक्षा बाळगत नाही. त्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी लाचारीनं ताटकळत वा तळमळत नाही. जगात आसक्त होत नाही. जगाशी तो समत्वानं वागतो; पण मायामोहाच्या गाळात रुतवणारं ममत्व जोपासत नाही. जगाप्रतिची सर्व कर्तव्यं तो पार पाडतो; पण त्या कर्तव्याच्या बदल्यात जगाकडून मोबदल्याची अपेक्षा बाळगत नाही. अंतरंगातील त्याची सद्गुरूमयता, सद्गुरू शरणता, सद्गुरू भावमयता कधीच भंगत नाही. गंमत अशी की, ही गोष्ट तो जगाला कळूही देत नाही! बाहेरून जगातच वावरत असताना, जगरहाटीनुसारची कामं करीत असतानाही सद्गुरू ऐक्यतेचा दोर तुटत नाही आणि म्हणूनच ‘ऐक्यता साधावी चतुरीं’ हे सूत्र त्याच्या जगण्यात लपलेलं असतं. अर्थात, जगात वावरूनही जगाला न चिकटण्याचा हा गुणही तो वायूकडूनच शिकतो. अवधूत सांगतो, ‘‘वायु सर्वातें स्पशरेनि जाये। परी अडकला कोठें न राहे। तैसें विषय सेवितां पाहें। आसक्तु नव्हे योगिया।।४२४।।’’ वायू सर्वत्र स्पर्श करतो, पण अडकत कुठेच नाही! तसा योगी विषय सेवन करतानाही दिसतो, पण त्या विषयभोगात आसक्त कधीच होत नाही. मग अवधूत म्हणतो, ‘‘असोनि इंद्रियांचेनि मेळें। तो विषयांमाजीं जरी खेळे। तरी गुणदोषआसक्तिमेळें। बोधू न मळे तयाचा ।।४२५।।’’ योगी इंद्रियांच्या संगतीत राहून विषयात वावरताना जरी दिसत असला, तरी गुण व दोष पाहण्याच्या वृत्तीनं त्याचं आत्मज्ञान कधीही मलिन होत नाही. म्हणजे तो डोळ्यांनी पाहतो; पण अमुकच एखादी गोष्ट पाहावी, या भावनेत अडकून त्याचं चित्त मलिन होत नाही.