चैतन्य प्रेम

भगवंत म्हणजे काय, भगवंताला जाणणं म्हणजे काय आणि त्या जाणण्याचा मार्ग कोणता; या प्रश्नांचा विचार आपण करीत आहोत. त्या अनुषंगानं कृष्णचरित्रालाही आपण स्पर्श केला. त्याचं कारण ओघानं स्पष्ट होईलच. पण पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे वळू. तो प्रश्न असा की, ‘भगवंत किंवा ईश्वर म्हणजे काय?’ ‘उपनिषदांचा अभ्यास’ या ग्रंथात तत्त्वचिंतक नामयोगी बाबा बेलसरे यांनी- ‘ईश्वर म्हणजे मूर्त ब्रह्म आहे,’ असं म्हटलं आहे. त्यांनी ब्रह्म आणि ईश्वर या दोन संकल्पनांचा उपनिषदांच्या आधारावर विचार केलेला आहे. ब्रह्म म्हणजे काय, याचा मागोवा घेताना ते म्हणतात, ‘‘हे दृश्य आणि अवाढव्य विश्व ज्याच्यापासून निर्माण होते, ज्याच्यामुळे आणि ज्याच्यामध्ये जगते आणि अखेर ज्याच्यातच ते लीन होते, असे मूलतत्त्व कोणते, त्याचा शोध ऋषी जन्मभर करीत राहिले. हा शोध करता करता जगाला जन्माला घालत असलेल्या आणि त्याचे धारणपोषण करीत असलेल्या चित् शक्तीचा साक्षात्कार त्यांना झाला. त्याचप्रमाणे माणसाच्या बुद्धीला सतत प्रेरणा देणारे आणि त्याच्या मनाला व इंद्रियांना अहोरात्र टवटवीत ठेवणारे मूलतत्त्व कोणते, हे शोधण्यासाठी काही ऋषी जन्मभर एकांतवासात ध्यानमग्न झाले. ध्यान खोलवर गेल्यावर अखेर अंतर्यामी आत्मरूपाने स्फुरत असलेल्या स्वयंप्रकाश चैतन्याचा साक्षात्कार त्यांना झाला. इतकेच नव्हे, तर विश्वाला सतत गतिमान ठेवणारे आणि माणसाला जिवंत ठेवणारे चैतन्य मुळात एकरूपच आहे, असा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला. माणसासकट सर्व विश्वाला अंतर्यामीपणाने व्यापून पुन्हा शिल्लक उरणाऱ्या या चैतन्याला ‘ब्रह्म’ असे म्हणतात.. ब्रह्म केवळ सत् किंवा अगदी शुद्ध अस्तित्व आहे. अर्थात, जे जे काही आहे त्याच्या असणेपणाला आधार देणारे जे केवळ असणेपण ते ब्रह्म समजावे. ब्रह्म आहे म्हणून सर्व आहे. ब्रह्म नसेल तर काहीच असणे शक्य नाही.’’ पुढे बाबा बेलसरे सांगतात की, ‘‘उपनिषदांमध्ये ब्रह्माची मूर्त आणि अमूर्त अशी दोन रूपे सांगितली आहेत. केवळ सन्मात्र ब्रह्म ते अमूर्त समजावे. ब्रह्माला आपल्या ब्रह्मपणाची जाणीव झाली, की ते ईश्वर होते. ईश्वर म्हणजे मूर्त सगुण ब्रह्म! ते अभिन्नपणाने सर्व जाणते. स्वसंवेद्यपणा हा ईश्वराच्या ज्ञानाचा प्रधान गुण आहे, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे.’’ थोडक्यात, या समस्त दृश्य आणि अदृश्य चराचराचा जो आधार आहे, हे चराचर ज्यातून उत्पन्न झालं आणि ज्यात विलीन होणार आहे, अशा सर्वव्यापी चैतन्यतत्त्वाला ब्रह्म म्हणतात. हे सर्वाधार, सर्वव्यापी परम ब्रह्म जेव्हा स्वत:ला जाणू लागते, तेव्हा मूर्त, सगुण होते आणि तोच भगवंत आहे, हे बाबांच्या विवेचनाचं सार आहे. त्याच्या पुष्टीसाठी ‘भगवान’ या शब्दाचा अर्थही लक्षात घेऊ. ‘भगवान्’ हा मूळ शब्द ‘भग्’ धातूपासून बनला आहे. ‘भग्’च्या अनेक अर्थछटा आहेत. त्या म्हणजे पूर्ण ज्ञान, पूर्ण सामर्थ्य, पूर्ण यश, पूर्ण सौंदर्य आणि पूर्ण त्याग! तेव्हा भगवान म्हणजे ही समस्त गुणवैशिष्टय़े ज्याच्यात अंतर्भूत आहेत तो. अर्थात, भगवंत हा सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. तोच खरा कर्ता, त्राता, नियंता आहे. तो ‘मधुराधिपती’ आहे. अर्थात, समस्त माधुर्याचा उगम आहे आणि त्याचबरोबर पूर्ण कर्ता असूनही कर्तेपणाचा त्याग करणारा तो अकर्ता आहे! पण भगवंताचे गुण एवढेच नाहीत. ‘भागवत’च म्हणते की, एकवेळ पृथ्वीवरचे सर्व धूलीकण मोजता येतील, पण भगवंताचे गुण मोजता येणं महाकठीण! कारण हरी अनंत आहे, तसंच त्या गुणातीताचे गुणही अनंत आहेत!