चैतन्य प्रेम

विशाल समुद्राच्या लाटा उसळत भूप्रदेशाला स्पर्श करीत परतत असतात. मानवस्पर्शित प्रदेशाकडे उसळत धाव घेत पुढे येणं आणि त्याच वेगानं आपल्या जलनिधी स्वरूपाकडे माघारी परतणं हा त्यांचा खेळ अविरत सुरूच आहे. त्यांच्या स्पर्शानं वालुकामय प्रदेशाचा जो पट्टा ओलाव्यानं पसरलेला असतो, त्याला आपण किनारा म्हणतो. मग लाटांच्या नर्तनातून पसरलेली पुळण म्हणजे जणू समुद्राकाठच्या मऊसूत पायघडय़ाच भासतात. त्यावर आपली पावलं किती सहज उमटतात! शंख-शिंपल्यांची वेलबुट्टीगत नक्षीही विखुरलेली असते. त्या किनारी लहान मुलं वाळूची चिमुकली घरं उभारतात.  पण भरती येते. आक्रमक लाटा किनारी गर्जत धडकू लागतात आणि माघारी परतताना ती घरं, ते शंख-शिंपले आपल्या पोटात घेत पुन्हा अथांग जलस्वरूपात विलीन होतात.. पावलांच्या ठशांची नक्षीही किती अलगद पुसली जात असते! लाटांच्या काही तडाख्यांतच सारं दृश्य अदृश्यात विलीन होतं. जणू किनाऱ्यावर ते भावविश्व उमललंच नव्हतं, ती पदचिन्हं उमटलीच नव्हती..

समुद्र अनंत काळापासून दररोज जीवनाची ही अशाश्वतता शिकवत आहे. आपणच बांधलेली चिमुकली घरं जेव्हा त्या लाटा उद्ध्वस्त करीत परततात, तेव्हा मुलं मौज वाटून हसतही असतात. पण मोठेपणी काळाच्या लाटांचं जीवनाला पुसून टाकणारं नर्तन माणसाला सोसवत नाही! जीवनाची अशाश्वतता जाणवूनही जीवाची जगण्याची ओढ मात्र शाश्वतच असते. काळाच्या ओघात आपल्या जीवनाचा प्रवाह अस्तंगत होणार आहे, हे माहीत असलं तरी माणसाचा अशाश्वतात सुरू असलेला शाश्वताचा शोध कधीच थांबत नाही. जगणं अशाश्वत आहे, पण जीवन तर शाश्वत आहे! माझ्या जन्माआधीही हे जग होतं आणि मृत्यूनंतरही ते राहील.. म्हणजेच ‘मी’ काल नव्हतो, उद्या नसेन, पण आज तर आहे! मग या ‘आज’चं, आजच्या आपल्या अस्तित्वाचं खरं मोल का जाणून घेऊ नये? जगण्याच्या संधीचा खरा लाभ का घेऊ नये?

जे. कृष्णमूर्ती ब्रिटनला असताना त्यांच्या प्रवचनांना मोठी गर्दी होत असे. त्यात एक ब्रिटिश नागरिक असा होता, ज्याला कर्करोगानं ग्रासलं होतं. तो रोग अखेरच्या टप्प्यात होता. जेव्हा मृत्यूचं सावट गडद होत जातं ना, तेव्हा काही वेळा माणसाला तत्त्वज्ञानाची भाषा रुचत नाही. त्या बोधानं मन शांत होण्याऐवजी अंत:करणाची तडफड वाढू लागते. या गृहस्थाचंही असंच झालं आणि असह्य़ भावनेनं उभा राहून तो उद्वेगानं हताशपणे ओरडू लागला, ‘‘सर, आय अ‍ॅम डाइंग! आय अ‍ॅम डाइंग!!’’ कृष्णमूर्ती तात्काळ उद्गारले, ‘‘नो सर नो! यू आर लिव्हिंग! यू आर लिव्हिंग!!’’ नाही हो, तुम्ही जगत आहात.. जगत आहात!! तेव्हा कोणत्याही स्थितीत का असेना, आपण जगत आहोत हे वास्तव काय कमी महत्त्वाचं आहे? मला जगवणारी जी जीवनशक्ती आहे ती अमर आहे, शाश्वत आहे. मग त्या जीवनशक्तीच्या आधारावर जे शाश्वत आहे, अमर, अजर आहे त्याचं भान का जोपासू नये? कालतटावरचं जगणं अशाश्वत असेलही, पण जीवनाच्या पावलांचा ठसा तर अमीटच आहे!!

chaitanyprem@gmail.com