चैतन्य प्रेम

आपल्या शालेय जीवनात एक कविता आपण अनेकदा वाचली आहे, ऐकली आहे आणि बहुदा कित्येकदा गायलीदेखील आहे. ही कविता आहे श्रीतुकडोजी महाराज यांची. कवितेच्या काही कडव्यांचा आपण आध्यात्मिक अंगानं मागोवा घेणार आहोत. कवितेचं पहिलं कडवं असं आहे :

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या।।

इथं दोन रूपकं आली आहेत. ‘महाल’ आणि ‘झोपडी’. वरकरणी ती श्रीमंती आणि गरिबीचं सूचन करतात, असं वाटतं. उलट ‘महाला’त गरिबी आहे आणि ‘झोपडी’त श्रीमंती आहे, असंच महाराज सुचवत आहेत. हे भजन म्हणजे गरिबीचं उदात्तीकरण नव्हे! मग हा महाल कोणता? ही झोपडी कोणती, ही गरिबी कोणती आणि श्रीमंती कोणती? पहिल्या ओळीत म्हटलं आहे की, ‘‘राजाला महालात कधी कधी जे सौख्य मिळतं ना ते या झोपडीत सदैव असतं! पाहा बरं.. इथं ‘कधी’ हा मोठा सूचक शब्द वापरला आहे. म्हणजे महालात सर्व सुखसोयी सदैव हजर असतात, पण याचा अर्थ सौख्य सदैव हजर असतं, असं नव्हे! राजेशाहीच्या जोरावर जी काही सुखसाधनं मिळवली त्यानं क्वचितच सौख्य लाभतं. पण साधकहो, या झोपडीत मात्र ती सुखं सदैव हजर असतात! मग हा ‘महाल’ कोणता आहे? तर कितीही मिळालं तरी ज्याची हाव संपत नाही, स्वार्थ हाच ज्याचा प्राणवायू आहे असं अहंकारयुक्त अंत:करण हाच तो ‘महाल’ आहे! आणि कर्तव्यकर्मरत असूनही फळाची बाजू भगवंतावर सोडून जे प्रसन्नतेनं आणि भक्तिभावानं भरून गेलेलं अंत:करण आहे ती ‘झोपडी’ आहे! ज्या अंत:करणात हाव नाही, लालसा नाही, परिश्रमपूर्वक, स्वप्रयत्नानं केलेल्या कर्मातून जे प्राप्त होत आहे त्यात समाधान आहे, त्या अंत:करणातच तृप्ती आहे, सौख्य आहे. मात्र ज्याची हाव कधीच संपत नाही त्याला कर्माचाही, प्रयत्नांचाही खरा आनंद कधीच घेता येत नाही. खरं पाहता प्रयत्नांनी जे प्राप्त होतं त्या प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद कोणत्याही पटींत मोजताच येऊ नये इतका मोठा असतो. खऱ्या शिक्षकाला शिकविण्याच्या कर्माचं फळ म्हणजे जो पगार, त्याचा आनंद असतोच. पण त्यापेक्षा प्रत्यक्ष शिकवताना लाभणारा आनंद अवर्णनीय असतो. आपल्या शिकवण्यानं हजारो मुलांचा जो बौद्धिक, भावनिक विकास होताना तो अनुभवतो, त्या आनंदाला तोड नसते. हीच स्थिती प्रत्येक क्षेत्रातील कर्मयोग्याची असते. संशोधकाला प्रत्यक्ष संशोधनात गढल्यावर, लेखकाला शब्द कागदावर उतरू लागल्यावर, शिल्पकाराला दगडातून मूर्ती घडू लागल्यावर, चित्रकाराला कोऱ्या कॅनव्हासवर रंगरेषा साकारू लागल्यावर जो आनंद होतो त्या आनंदाची सर ती कृती पूर्णत्वास गेल्यावर मिळणाऱ्या मान आणि धनाला येत नाही.

तेव्हा ‘महाला’त अहंकारानं माखलेल्या अंत:करणात कर्तृत्वाची ऐट मोठी आहे, पण तरीही अतृप्ती आणि अपूर्णता आहे, लोकेषणेची आस आहे. स्वकर्तव्यपरायण आणि भक्तिमय ‘झोपडी’त मात्र कर्माआधी, प्रत्यक्ष कर्म करताना आणि कर्म झाल्यावरही तृप्तीच तृप्ती आहे! कारण खरा कर्ता भगवंत आहे, आपण निमित्त आहोत, हा भाव आहे.

chaitanyprem@gmail.com