चैतन्य प्रेम

समाज निरोगी असला पाहिजे, याबाबत सध्या सामूहिक सजगता आली आहे. पण हा समाज माणसांनीच बनला आहे. माणूस हा या समाजाचा लघुत्तम साधारण घटक आहे. त्यामुळे माणसाच्या निरोगीपणावर समाजाचं निरोगीपण अवलंबून आहे. हे निरोगीपण केवळ शरीरावर अवलंबून नसतं. ते मनावर अधिक अवलंबून असतं. माणूस शरीरानं सुदृढ असेल, पण मनानं रोगट असेल तर त्याला खऱ्या अर्थानं निरोगी म्हणता येणार नाही. त्यापुढची महत्त्वाची गोष्ट ही की, मन जर रोगट असेल, नकारात्मक विचार, भीती, नैराश्य, दडपण यांनी भरलेलं असेल, तर अशा माणसाच्या शारीरिक आरोग्यावरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुदेव रानडे यांच्या सत्संग बैठका होत. त्याला ते ‘सीटिंग्ज’ म्हणत. त्या सत्संगातील टिपणांचं संकलन ‘ती ही समर्थकृपेची वचने’ या पुस्तकाद्वारे प्रकाशित आहे. त्यात गुरुदेवांचं एक वचन आहे : ‘शरीरास आरोग्य संभवनीय आहे, पण अंत:करणास आरोग्य होणे कठीण आहे. पण नामस्मरणाने ही कठीण गोष्ट सुलभ होते.’ या वचनाच्या प्रकाशात शारीरिक आणि आंतरिक आरोग्याविषयी थोडं चिंतन करू. सर्वसाधारणपणे शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य, हे दोन भेद प्रचलित आहेत. गुरुदेव इथं ‘मनाचं आरोग्य’ म्हणत नाहीत, तर ‘अंत:करणाचं आरोग्य’ म्हणतात. त्यायोगे ते आंतरिक आरोग्याकडे अधिक व्यापकतेनं पाहण्याची दृष्टी देतात. हे आंतरिक आरोग्य जितकं मनाचं आहे, तितकंच बुद्धीचं, चित्ताचं व अहंजाणिवेचंही आहे! आता आपल्या मनात येईल की, अंत:करण या चार घटकांचं असलं तरी अखेरीस त्या सर्वावर मनाचाच अंमल चालतो. चित्तात त्याच गोष्टीचं चिंतन चालतं, जी गोष्ट मनाला चिंतावीशी वाटते! बुद्धी त्याच गोष्टीत शिरते, रमते आणि बोधग्राहक व वाहक होते, ज्या गोष्टी मनाला रुचतात. मन आणि अहं म्हणजे जणू बिंब-प्रतिबिंबवत! तेव्हा एक मन सुधारलं, तर बुद्धी, चित्त आणि अहंजाणीवही शुद्ध होईल, असं आपल्याला वाटतं. पण इथं गुरुदेव एकाच वेळी या चारही घटकांना शुद्ध करणारा उपाय सांगत आहेत, तो आहे ‘नामस्मरण’! हाच उपाय गुरुदेव का सांगतात? तर तो गुरुदेवांचा आत्मसिद्ध साधनामार्ग आहेच, पण सार्वत्रिक, सर्वमान्य आणि सहजसाध्य भासणारा प्रभावी उपायही आहे. इथं ‘नामस्मरणा’चा अर्थ आपल्याला बाह्य़ प्रभावातून निर्लिप्त करीत अंतर्मुख करणारी कोणतीही साधना, इतका व्यापक घेता येईल. म्हणजेच शरीराचं आरोग्य हे औषध, पथ्य आणि व्यायामानं सांभाळता येतं, तसंच आंतरिक आरोग्य हे साधना, अनुसंधान आणि सद्गुरू-बोधानुरूप आचरणानं सांभाळता येईल, असं गुरुदेवांना सांगायचं असावं. तेव्हा माणसानं कोणती ना कोणती साधना मनापासून सुरू करावी. सद्विचारांच्या मनन, चिंतन व आचरणाची जोड तिला देत अंतर्मुखता साधावी. ती साधली की, आंतरिक संवाद आणि बाह्य़ सुसंवाद सहजतेनं होऊ लागेल. अंत:करण अतृप्त असेल, तर जगात तृप्ती मिळणार नाही. अंत:करण तृप्त असेल, तर जगातली अतृप्ती मनाला शिवणार नाही!

sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

chaitanyprem@gmail.com